थायलंडमधल्या सर्वात मोठ्या गुहेत अडकलेल्या १२ मुलांना बाहेर काढण्याची खडतर मोहीम रविवारी (८ जुलै) सकाळी सुरू झाली आहे. या मुलांनी सुखरूप बाहेर यावं यासाठी जगभरातील लोकांनी प्रार्थना केल्या आहेत. या मुलांना त्यांचा २५ वर्षांचा शिकाऊ प्रशिक्षक एकापोल चँनथावाँग गुहेत घेऊन गेला होता. खरं तर या चुकीसाठी एकापोलनं पालकांची माफीही मागितली आहे पण त्याचबरोबर या सगळ्यांची काळजी घेईन, सगळ्यांना स्वत:च्या प्राणापेक्षाही अधिक जपेल असं आश्वासनही दिलं आहे. या मुलांना एकापोल गुहेत घेऊन गेला असला तरी आज ही १२ ही मुलं केवळ एकापोलमुळेच जिवंत आहेत.

Thai rescue operation : सुटकेसाठी धडपड! बाहेर येण्यासाठी ‘या’ आव्हानांचा समाना करावा लागणार

एकापोल हा प्रशिक्षक असला तरी तो पूर्वी बौद्ध भिक्खूदेखील होता. तीन वर्षांपूर्वी त्यानं मठ सोडला. एकापोल १० वर्षांचा असताना त्याच्या आई वडिलांचा मृत्यू झाला. मठ सोडल्यानंतर एकापोल ‘वाईल्ड बोअर’ टीमचा शिकाऊ प्रशिक्षक म्हणून रुजू झाला. ब्रिटीश पाणबुड्यांनी गेल्या आठवड्यात या मुलांचा शोध घेतला तेव्हा ही मुलं अत्यंत वाईट परिस्थितीत होती. सुदैवानं ही सारी मुलं अशक्त असली तरी त्यांचं मनोधैर्य खचलं नव्हतं. या १३ जणांच्या टीममध्ये सगळ्यात अशक्त एकापोलच आहे. गेल्या १५ दिवसांपासून तो लहान मुलांची काळजी घेत आहे. फारच थोडं खाणं घेऊन ही मुलं गुहेत शिरली होती. मुसळधार पावसामुळे ही मुलं गुहेतच अडकली होती. त्यामुळे आपला शोध घेत कोणी येत नाही तोपर्यंत हे १३ जण पुरवून अन्न खात होती. एकापोल स्वत: उपाशी राहून आपल्या वाट्याचं खाणं या मुलांना देत होता.

इतकंच नाही तर कठीण परिस्थितीत डगमगून न जाता, कसं शांत राहावं याचं प्रशिक्षण त्यानं मुलांना दिलं. कमीत कमी शक्ती कशी खर्च करावी, या परिस्थितीतही कसं स्थिर राहावं हे एकापोलनं नऊ दिवसांत मुलांना शिकवलं होतं. त्याच्याचमुळे ही मुलं जिवंत आहेत असं या मुलांचे प्रशिक्षकही म्हणाले. मुलांचं आयुष्य धोक्यात घातलं म्हणून एकापोल स्वत:ला दोष देत आहे त्यानं चिठ्ठी लिहून सर्व पालकांची माफीही मागितली आहे. मात्र आज ही मुलं सुखरुप आहेत ते एकापोलमुळे असं म्हणत पालकांनी त्याचे आभारही मानले आहे.