नोटाबंदीच्या निर्णयानंतर इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये रस्त्यावर भीक मागणा-या एका भिका-याच्या हातात चक्क स्वाइप मशीन होते. नोटाबंदीनंतर अनेकांकडे पैसे नव्हते, तेव्हा आपल्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी हा भिकारी हातात कार्ड स्वाइप मशीन घेऊन फिरत होता, असे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले होते. मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर भारत डिजिटल होत आहे असे सांगत हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पण, यामागचे सत्य काही वेगळेच आहे.

VIDEO : राहुल, लालू, केजरीवालांची नक्कल घेऊन पुन्हा आलाय ‘श्याम रंगीला’

नोटाबंदीच्या निर्णय जाहीर केल्यानंतर सुट्या पैशांचा तुटवडा जाणवू लागला. यानंतर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. सिग्नलला उभ्या असणा-या एका गाडीशेजारी भिकारी येतो आणि भीक मागतो. पण गाडीत असलेली महिला आणि तिचा सहकारी या भिका-याला भीक द्यायला नकार देतात. इच्छा असूनही सुटे पैसे नसल्याने आपण मदत करू शकत नाही असे ते या भिका-याला सांगतात. त्यावर हा भिकारी आपल्या झोळीतून स्वाइप मशीन बाहेर काढतो आणि कार्ड स्वाइप करून पैसे देण्यास सांगतो. असा हा व्हिडिओ होता. नोटाबंदीनंतर आता भिकारी देखील कॅशलेस व्यवहार करु शकतात असे सांगून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता.

पण या व्हिडिओमागचे सत्य समोर आले असून हा व्हिडिओ आताचा नसून २०१३ मधला आहे. हैदराबादमधल्या ‘न्यूमेरो ग्राफिक्स क्रिएटीव्ह सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीने नोव्हेंबर २०१३ मध्ये एका हा  व्हिडिओ बनवला होता. १६ जानेवारी २०१४ मध्ये हा व्हिडिओ युट्युबवर टाकण्यात आला होता. तेव्हा नोटाबंदीच्या निर्णयाचा आणि या व्हिडिओचा दूरदूरपर्यंत संबंध नसून हा व्हिडिओ देखील खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. एका जाहिरातीसाठी रस्त्यावरच्या भिका-याला आपण स्वाइप मशीन देऊन अभिनय करण्यास सांगितले होते असेही या कंपनीने सांगितले.

वाचा : अरेरे! कष्ट करून मिळवलेल्या पैशांचे ‘चीज’ झाले