डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यावर तरी आपला आक्रस्ताळेपणा (आणि वेडेपणा) कमी करतील अशी आशा होती. पण आता तीही आशा दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. आधीपासूनच विनोदाचा विषय झालेले ट्रम्प आता थट्टामस्करीचा विषय़ ठरणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. याआधी जाॅर्ज बुश यांची अमेरिकेचा सर्वात वाईट अध्यक्ष म्हणून गणना केली जाय़ची. त्यांच्यावरही जाम जोक्स मारले जायचे. पण आता डाॅनल्ड ट्रम्प हे त्यांनाही मागे टाकतील अशी चिन्हं आहेत

जगातल्या सर्वात शक्तिमान महासत्तेच्य़ा अध्यक्षांनी आता अमेरिकन कोर्टांनाच कोर्टांना खेचण्याची धमकी ट्विटरवरून दिली आहे. आणि यावरून ट्विटरवर कल्लोळ उडालाय. जगभरातले आणि अमेरिकेतलेही ट्विटर यूझर्स अमेरिकन अध्यक्षमहोदयांची खिल्ली उडवत आहेत.

वाचा ट्रम्प यांचं ट्वीट

“तुम्हाला कोर्टातच पाहून घेतो”

आणि त्यावर अध्यक्षांची कीव करणारी ही ट्वीट्स

“राष्ट्राध्यक्ष कोर्टात हरल्यावर कोर्टाला कोर्टात खेचणार आहेत”

 

कोर्टाचे न्यायाधीश आणि कर्मचारी: “आम्हाला कोर्टात खेचताय? बरंय, आम्ही तिथेच काम करतो”

 

“तुम्ही न्यायव्यवस्थेलाच कोर्टात खेचताय? बSSरं”

हा मुद्दा आहे तो स्थलांतरितांचा, अमेरिकेत येणाऱ्या जगातल्या जवळजवळ सगळ्या स्थलांतरितांचा, विशेषत: मेक्सिकन आणि मुस्लिमांचा दु:स्वास करत सत्तेवर आलेल्या ट्रम्प यांनी अध्यक्षपदावर आल्याच्या पहिल्याच आठवड्यात सात मुस्लीम देशांमधल्या नागरिकांना अमेरिकेत सरसरकट प्रवेशबंदीचा वटहुकूम काढला. परदेशी वंशाच्या पण अमेरिकन नागरिकत्व धेतलेल्या आणि ग्रीन कार्डधारकांनाही अमेरिकन विमानतळांवर अडवणूक होत होती. या वटहुकूमाला कायदेशीर आधार नव्हता आणि फक्त परदेशी नागरिकांना अमेरिकेत यायला बंदी घालणं या एकाच हेतूने त्यांनी हा वटहुकूम काढला होता. अमेरिकेतल्या अनेक कनिष्ठ न्यायालयांनी या वटहुकूमाला स्थगिती दिली. त्यामुळे चिडून ट्रम्प यांनी एका न्यायाधीशाची हकालपट्टीही केली. न्यायव्यवस्थेवर राज्यव्यवस्थेने केलेलं हे सरळसरळ आक्रमण मानलं गेलं. कुठल्याही लोकशाही राजकीय संकेतांच्या पलीकडे जाणारी ही कृती होती. आपल्या हुकूमशाही वागण्याने ट्रम्प यांनी मिळवलेला हा तात्पुरता विजय होता कारण अमेरिकेच्या फेडरल कोर्टाने ट्रम्प यांच्या या वटहुकूमावर पुन्हा एकदा स्थगिती आणल्याने ट्रम्प आणि त्यांच्या साथीदारांचा प्रचंड जळफळाट झालाय. आता ते याविरोधात अमेरिकन सुप्रीम कोर्टात जाणार आहेत. याविषयी त्यांनी ट्वीट केलं आहे. पण हेही मांडण्याची एक तऱ्हा असते. एखाद्या साध्यासुध्या माणसाला कोर्टात खेचायची धमकी द्यावी तशा आवेशात ‘तुला कोर्टात पाहून घेईन’ अशी स्वरूपाची धमकी ट्रम्प यांनी अमेरिकन फेडरल कोर्टाला दिली आहे. हे एका अर्थाने भयानक असलं तरी यामुळे ट्रम्प यांची आणखी टवाळी होते आहे.