आई-वडिलांच्या शेवटच्या इच्छेसाठी आपण काहीही करायला तयार होतो. उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमधील एका तरुणाने आपल्या ९० वर्षीय पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी चक्क लाकडी बाहुलीशी लग्न केलं आहे. हा लग्नसोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. या अनोख्या आणि विचित्र लग्नसोहळ्याची उत्तर प्रदेश आणि देशात चर्चा सुरू आहे.

प्रयागराज येथील मनकवार गावात हा लग्नसोहळा पार पडला. ९० वर्षीय शिवमोहन यांना ९ मुले आहेत. सर्वांची लग्न झाली होती फक्त सर्वात लहान पंचराज या मुलाचं लग्न झालं नव्हते. गेल्या काही दिवसांपासून त्याचं लग्न जमवण्यासाठी कुटुंबीय प्रयत्न करत आहेत. मात्र, काही केल्या लग्न काही जमत नव्हते. पंचराज याचं लग्न पाहण्याची शिवमोहन यांची अखेरची इच्छा आहे. हे पूर्ण करण्यासाठी मोठ्या व्यक्तींनी एक पर्याय शोधला.

पंचराज याचं लाकडी बाहुलीशी लग्न करायचं ठरलं. पंचराज सुरूवातीला या विवाहसोहळ्याला तयार नव्हता. मात्र, वडिलांच्या अखेरच्या इच्छेसाठी तोही लग्नासाठी तयार झाला. लाकडी बाहुलीसोबतच्या लग्नासाठी रितसर मुहुर्त काढण्यात आला. गावकरी, पाहुणे आदिंना आमंत्रणं पाठवण्यात आले. १८ जून रोजी सोशल डिस्टन्सिंग पाळत हा अनोखा विवाह सोहळा पार पडला.