लग्नसोहळा म्हटलं की वरात वाजत-गाजत निघणारच… फटाक्यांची आतषबाजी आणि नातेवाईक, मित्रमंडळींचा डान्स तर जबरदस्तच असतो. नवरदेवाला खांद्यावर घेऊन नाचलं म्हणजे आपण मोठा पराक्रम केला, असा ‘भाव’ मित्रांच्या चेहऱ्यावर असतो. या सगळ्या धांगडधिंग्यात नवरदेव स्वार झालेला घोडा किंवा घोडी बिथरली तर काय गोंधळ उडतो, याची कल्पनाही न केलेलीच बरी. उत्तर प्रदेशातील गोंडा या गावात वरातीदरम्यान अशीच एक घटना घडली आहे.

नवरदेव घोडीवर स्वार झाल्यानंतर घरासमोरील विहीरीला ‘फेरा’ घालण्याची प्रथा उत्तर प्रदेशातील गोंडा गावात आहे. या प्रथेनुसार नवरदेव घोडीवर स्वार होऊन विहिरीला प्रदक्षिणा घालत होता. तिकडं वरातीत सहभागी झालेल्या वऱ्हाडी मंडळींचा जल्लोष सुरू होता. मित्रमंडळी उत्साहाने नाचत होती. तितक्यात कोणीतरी फटाके फोडले. त्याच्या आवाजाने घोडी बिथरली. ती सैरावैरा पळू लागली. वरातीत एकच गोंधळ उडाला. फटाक्यांच्या आवाजाने बिथरलेल्या घोडीने थेट विहिरीतच उडी घेतली. नवरदेवही विहिरीत पडला.

वऱ्हाडीमंडळीच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण या घटनेनंतर सर्वांच्याच चेहऱ्यावर चिंता होती. घोडीला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी जेसीबी मशीन मागवण्यात आली. शर्थीच्या प्रयत्नानंतर दोरखंडाने नवरदेवाला बाहेर काढले. सुदैवाने यात नवरदेवाला कोणतीही दुखापत झाली नाही.