समुद्रामधील अनेक रहस्य आजही मानवाला ठाऊक नाही असं म्हटलं जातं. ज्याप्रमाणे समुद्राबद्दलचे रहस्यांबद्दल मानवाला कायमच कुतूहल असतं तसचं समुद्रातील प्राण्यांबद्दलही. समुद्रामधील प्राण्यांचे अनेक व्हिडिओ वेळोवेळी व्हायरल होत असतात. अनेकदा या प्राण्याचे वागणे आकलनापलिकडचे असते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आहे वॉशिंग्टनमधील ऑलंपिया येथील.

अमेरिकेमधील सॉकर खेळाडू असणाऱ्या जोश फिलिप्सने शेअर केलेले दोन सी लायन्सचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच चर्चेत आहे. जोश आणि त्याचा मित्र मागील आठवड्यामध्ये ‘द एव्हरग्रीन स्टेट कॉलेज’जवळ बोटीमधून भटकंती करत होते. त्यावेळी त्यांना एक थक्क करणारे दृष्य दिसलं. किनाऱ्यापासून काही अंतरावर नांगर टाकून बांधण्यात आलेल्या एका छोट्या बोटीवर चक्क दोन मोठे सी लायन्स खेळत होते. “आम्ही जवळ गेलो तेव्हा त्या बोटीवर दोन मोठे सी लायन्स खेळत असल्याचे आम्हाला दिसलं. तेव्हा आम्हाला धक्काच बसला,” असं जोशने स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितलं. जोश हा स्वत: एका मत्सउद्योग कंपनीचा अध्यक्ष आहे. त्याने समुद्रामध्ये अनेकप्रकारचे मासे पाहिले आहेत. मात्र आपण पहिल्यांदाच असं काहीतरी पाहत असल्याचं सांगितलं. जोशने पोस्ट केलेल्या या व्हिडिओला लाखोंच्या संख्येने व्ह्यूज मिळाले आहेत.

किनाऱ्यावरुन याच घटनेचा काढण्यात आलेला व्हिडिओ युट्यूबवर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये तिसरा सी लायनही बोटीवर खेळताना दिसताना आहे. हा सी लायन बोटीवर चढण्याचा प्रयत्न करत आहे. “जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर या बोटीच्या मालकाच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत,” अशी कॅप्शन या व्हिडिओला दिली आहे.

या व्हिडिओवर अनेकांनी मजेदार प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.