लॉकडाउनच्या काळात आगारात रुतलेल्या लालपरीचा अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा राज्यात मुक्त संचार ऑगस्ट महिन्यापासून सुरू झाला. पाच महिने एसटीची सेवा बंद ठेवल्यानंतर ऑगस्टच्या मध्यापासून आंतरजिल्हा प्रवासी वाहतुक सुरू करण्यात आली.  १९ ऑगस्टपासून राज्य परिवहनच्या बससेवेला सुरुवात झाल्यानंतर ग्रामीण महाराष्ट्रातील आर्थचक्र पुन्हा सुरळीत होण्याच्या दिशेने वाटचाल करु लागलं. दरम्यानच्या काळामध्ये झालेल्या पंढरपूरच्या वारीसाठीही एसटीनेच भगवंतांनी प्रवास केला. मग ते अगदी आषाढी वारीपासून कार्तिकी वारीपर्यंत सर्वच ठिकाणी एसटीचाच आधार भगवंताने आणि वारकऱ्यांनी घेतला. शेकडो वर्षांची परंपरा खंडित होऊ नये म्हणून फुलांनी सजवलेल्या लालपरीमधून यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर वारी पूर्ण करण्यात आली. मात्र आता कार्तिकी एकादशीनंतर सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये एसटी बसवर रेखाटलेल्या वारीच्या चित्रामधील विठ्ठलाच्या चित्रावर डोकं टेकवून एक वयस्कर वारकरी महिला भगवंताचे आशिर्वाद घेताना दिसत आहे. सोशल मिडियावर हा फोटो व्हायरल झाला आहे. काहींना हा डोळ्यात पाणी आणणारा फोटो असल्याचं म्हटलं आहे तर काहींनी हा फोटो म्हणजे भक्ती आणि श्रद्धेचा सुरेख संगम असल्याचं मत व्यक्त केलं आहे. मंदिरात गेलंच पाहिजे, असं काहीही नाही असं सांगणारा हा फोटो असल्याचं मत काहींनी व्यक्त केलं आहे. तर काहींनी देव चराचरात आहे हेच या फोटोमधून दिसून येत अशी भावना व्यक्त केलीय.

१) भक्ती आणि श्रद्धेचा सुरेख संगम

२) काय छान फोटो आहे

३) डोळ्यात पाणी आणणारा फोटो

४) शुद्ध सात्विक भक्ति

५) मंदिरात गेलंच पाहिजे, असं काहीही नाही

६) सावळ्यात असे सारा गोतावळा

७) जिथे तू … तिथे मी…

अशाप्रकारे एसटीसोबत ग्रामीण भागातील जनतेची असणारी बांधिलकी आणि प्रेम दाखवणारा फोटो महामंडळाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुनही सेवा पुन्हा सुरु करण्यात आल्यानंतर पोस्ट करण्यात आलेला. या फोटोमध्ये एक ग्रामीण भागातील महिला एसटीच्या पाया पडताना दिसत होती. हा फोटो शेअर करताना महामंडळाने, “सर्वसामान्य जनतेच प्रेम हेच एसटीचे मोठी संपत्ती” अशी कॅप्शन दिली होती.

व्हायरल फोटोमधून भक्तीला साचेबद्ध असं काही रुप नसतं हेच पुन्हा अधोरेखित होत असल्याचं मतही अनेकांनी व्यक्त केलं आहे.