सोशल मीडियावर सध्या एका तरुणीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ही तरुणी चक्क साडी नेसून ‘बॅकफ्लिप’ मारताना दिसतेय. साडीमध्ये बॅकफ्लिप मारणाऱ्या या तरुणीचा व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झालेत.

व्हायरल व्हिडिओमध्ये साडी नेसलेली एक तरुणी रस्त्यावर बॅकफ्लिप मारताना दिसतेय. अवघ्या 12 सेकंदांच्या या व्हिडिओत ही तरुणी 4-5 बॅकफ्लिप मारते. ट्विटरवर आकाश रानिसन नावाच्या युजरने हा व्हिडओ सर्वप्रथम शेअऱ केला. त्यासोबत, “पुरूष मंडळी करतात ती सर्व कामं महिला करु शकतात आणि पुरूषांपेक्षा चांगल्याप्रकारे करु शकतात. कित्येक कामं तर अशी आहेत की पुरुष करु शकत नाहीत. भेटा मिली सरकारला…साडीमध्ये बॅकफ्लिप मारतानाचा तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय…ती टॅलेंटची पॉवरहाउस आहे” असा संदेश लिहिलाय.

नेटकरी साडी नेसून बॅकफ्लिप मारणाऱ्या मिलीचं तोंडभरुन कौतुक करत आहेत. व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत असून ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारताला योग्य खेळाडू भेटला, अशा कमेंट्सही मोठ्या प्रमाणात येत आहेत.


ट्विटरआधी हा व्हिडिओ स्वतः मिली सरकारने 20 नोव्हेंबर रोजी आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला होता. तिथेही या व्हिडिओला लाखो जणांनी पाहिलं. नंतर व्हिडिओ ट्विटर व्हायरल झाला.