Stealing property of Railway: भारतातील लांब पल्ल्याच्या रेल्वे असो वा लोकल ट्रेन, इथे घडलेल्या कुठल्याही लहान गोष्टींचे व्हिडीओ सोशल मीडियावर लगेचच व्हायरल होताना दिसतात. पुरूषोत्तम एक्सप्रेसच्या प्रथम श्रेणीच्या एसी कोचमध्ये प्रवास करताना एका कुटुंबाला रेल्वे बेडशीट चोरताना पकडण्यात आल्याचा एक व्हायरल व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त होत आहे. ट्रेन आल्यानंतर प्लॅटफॉर्मवरील हा व्हिडीओ आहे. रेल्वे मालमत्तेच्या चोरीच्या एका गंभीर प्रकरणांवर प्रकाश टाकणारा हा व्हिडीओ आहे.

ओडिशातील पुरी आणि नवी दिल्ली दरम्यान धावणाऱी पुरूषोत्तम एक्सप्रेस ही सर्वात जास्त मागणी असलेल्या मार्गांपैकी एक आहे. ती ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधून जाते.

बापी साहू या युजरने एक्सवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एका महिलेसह तीन जणांचे कुटुंब दोन ट्रॅव्हलिंग तिकीट एक्झामिनर आणि इतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी वेढलेले दिसत आहे. अधिकाऱ्यांना कुटुंबाने त्यांच्या सामानात बेडशीट घुसवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोप केल्याचे यामध्ये ऐकू येत आहे.

ती महिला इच्छा नसूनही बॅगेतून बेडशीट बाहेर काढताना दिसत आहे. तसंच तिच्यासोबत असलेले पुरूष स्पष्ट उत्तर देण्यास टाळाटाळ करताना दिसत आहेत. साहूने व्हिडीओला कॅप्शन दिले आहे की, “पुरूषोत्तम एक्सप्रेसच्या पहिल्या एसीमध्ये प्रवास करणे ही अभिमानाची गोष्ट आहे. मात्र, तरीही असे लोक आहेत जे प्रवासादरम्यान अतिरिक्त आरामासाठी पुरवलेल्या बेडशीट चोरून घरी घेऊन जाण्यास मागेपुढे पाहत नाहीत.”

हा व्हिडीओ व्हायरल झाला असला तरी ही घटना केव्हा आणि कुठे घडली याची माहिती अद्याप खात्री पटवण्यात आलेली नाही. आरोपी प्रवाशांवर कारवाई करण्यात आली की नाही याबद्दल अधिकाऱ्यांनी कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही.

रेल्वेची मालमत्ता एखाद्या प्रवाशाने चोरली तर काय होते?

एसी कोचमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक आरामासाठी बेडशीट, ब्लँकेट आणि उशी यासारख्या वस्तू दिल्या जातात. या वस्तू प्रवास संपल्यावर परत कराव्या लागतात. असं असताना रेल्वे अधिकाऱ्यांनी असे कृत्य सरकारी मालमत्तेची चोरी असल्याचे सांगितले आहे.

भारतीय रेल्वे कायदा, १९६६च्या कलम ३नुसार, रेल्वे मालमत्तेची चोरी करणे किंवा नुकसान करणे हा दंडनीय गुन्हा आहे. पहिल्यांदाच गुन्हा करणाऱ्याला एक वर्षापर्यंत तुरूंगवास, १००० रूपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकतात. वारंवार किंवा गंभीर उल्लंघनासाठी पाच वर्षांपर्यंत तुरूंगवास आणि त्याहून अधिक दंड होऊ शकतो. अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी नियमितपणे तपासणी करतात. कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी प्रवाशांनी प्रवासाच्या शेवटी सर्व पुरवलेल्या वस्तू परत देणे नियमानुसार बंधनकारक असते.