नव्या रुपात नव्या संचात रंगमंचावर अवतरल्यानंतर, रसिकांना पूर्वीसारखीच मोहिनी घालणारं नाटक, ‘संगीत मानापमान’ आता अमेरिकावारी करणार आहे. जुलै २०१३ मध्ये होणार्‍या बीएमएमच्या (बृहन्महाराष्ट्र मंडळ) १६ व्या अधिवेशनात हे प्रसिद्ध संगीतनाटक मोठ्या थाटात सादर होईल.
आघाडीचे गायक राहुल देशपांडे यांच्या पुढाकाराने संगीत रंगभूमीवरच्या अनेक गाजलेल्या नाटकांचं पुनरुज्जीवन होत आहे. संगीतनाटकांची ही नवीन गोडी सातासमुद्रापारच्या रसिकांना चाखायला मिळावी म्हणून आता बीएमएमने राहुल देशपांडे आणि त्यांच्या सहकार्‍यांना खास आमंत्रण दिलं आहे. या नाटकातली ‘धैर्यधर’ ही प्रमुख भूमिका खुद्द राहुल देशपांडे साकारणार असून, प्रियांका बर्वे आणि अमेय वाघ यांच्यासह इतर गुणी कलावंत या प्रयोगात रंगत आणतील. निपुण धर्माधिकारी यांनी नव्या रुपातलं हे नाटक दिग्दर्शित केलं आहे.
गाजलेली मराठी नाटकं, तसेच नाट्यसंगीताचे शौकीन आणि दर्दी जाणकार अमेरिकेत मोठ्या संख्येनं आहेत. यातले काहीजण स्वतः नाट्यगीतं गातात, शिवाय भारतातून अमेरिकाभेटीला येणार्‍या प्रसिद्ध गायक-गायिकांच्या मैफिली नाट्यसंगीताशिवाय पूर्ण होत नाहीत. त्यामुळे अनेक गाजलेल्या पदांसहित, मूळ बाज न बदलता मात्र नव्या ढंगात ‘मानापमान’ ‘कसं रंगणार याची आता अमेरिकेतल्या नाट्यरसिकांना उत्सुकता लागली आहे.