गौरी प्रधान

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घराचे इंटिरियर करत असताना फर्निचर डिझाइन हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे हे तर आपल्याला माहीतच आहे. पण आज मात्र या महत्त्वाच्या भागातील देखील आव्हानात्मक भागाबद्दल आपण बोलणार आहोत. अर्थात स्वयंपाकखोलीतील फर्निचरबद्दल.

संपूर्ण घरातील फर्निचर एका बाजूला आणि स्वयंपाकखोलीतील फर्निचर एका बाजूला; असे मी म्हणतेय याला एक विशिष्ट कारण आहे आणि ते म्हणजे स्वयंपाकखोलीत केले जाणारे काम आणि त्या दृष्टीने तेथील फर्निचरची उपयुक्तता. स्वयंपाकखोलीतील फर्निचर डिझाइन करताना नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त विचार हा त्याच्या उपयुक्ततेचा करावा लागतो आणि मग उरलेली सौंदर्यदृष्टी वैगेरे.

स्वयंपाकखोलीत आणि त्यातूनही विशेषत: भारतीय स्वयंपाकखोलीत एकाच वेळी अनेक प्रकारची कामे सुरू असतात. त्या साऱ्यांचा विचार करता स्वयंपाकखोलीतील फर्निचर हे सर्वसमावेशक तरीही सुटसुटीत वापरायला आणि वावरायला सोपे वाटेल असेच असले पाहिजे.

स्वयंपाकखोलीतील महत्त्वाचा घटक म्हणजे ओटा. आधुनिक स्वयंपाकखोलीचा विचार करता तिथे किमान दोन ओटे तरी असतातच. एक मुख्य स्वयंपाकाचा ओटा तर दुसरा सर्व्हिस प्लॅटफॉर्म. या दोन्ही ओटय़ांच्या खाली आपल्याला मुबलक जागा मिळते. हल्ली तर पाइपने गॅसपुरवठा होत असल्याने सिलिंडरची जागा देखील वाया जात नाही. या ओटय़ाखालील जागेचा योग्य उपयोग करून घेतला तर बरेचसे सामान इथेच मावू शकते.

पूर्वी ओटय़ाला फक्त दरवाजे लावून आत शेल्फ लावण्याचीच पद्धत होती; परंतु असे करून जागेचा पूर्ण उपयोग होत नाही हे लक्षात आल्यावर हळूहळू ओटय़ाखाली ट्रॉली बनवण्याची पद्धत रूढ झाली. ट्रॉली योग्य प्रकारे अभ्यास करून बनवल्या तर आपण ओटय़ाखालील इंचन इंच उपयोगात आणू शकतो. यासाठी ट्रॉल्या बनवण्यापूर्वीच आपल्याकडे किती आणि काय सामान आहे. त्यापैकी ट्रॉलीमध्ये साठवण्यासारखे काय आहे याची तपशीलवार यादी आपल्याकडे तयार हवी. मग त्यानुसार ट्रॉलीची मापे निश्चित करून जर ट्रॉल्या बनवल्या तर जागेचाही पूर्ण वापर होतो आणि आपल्यालाही त्या वापरणे अधिक सोयीचे होते.

ट्रॉल्यांमुळे स्वयंपाकखोलीतील फक्त साठवणीची जागा वाढून उपयोग नाही, तर त्यामुळे तेथील काम देखील सुटसुटीत झाले पाहिजे. यासाठी ट्रॉल्यांचे वर्गीकरण करणे फारच महत्त्वाचे. हे वर्गीकरण करण्यासाठी काही ढोबळ नियम आहेत, यांचा वापर करून आपण आपल्या स्वयंपाकखोलीतील फर्निचरमध्ये सुसूत्रता आणू शकतो. नियम पहिला- स्वयंपाक करताना ज्या वस्तूंचा वापर सर्वात जास्त होतो उदा. मसाल्यांचा डबा, कालथे, पळ्या, सांडशी, यांची ट्रॉली गॅस शेगडीच्या सर्वात जवळ असावी. त्यानंतर लहान भांडी जसे की- चहाचे भांडे, गाळणी, झाकण्या, इ. त्यानंतर नंबर लागतो तो कुकर, कढई यांसारख्या मोठय़ा तरीही पटकन हाताशी लागणाऱ्या वस्तूंचा त्यामुळे या सर्व वस्तूंच्या ट्रॉल्या एकाखाली एक अशा पद्धतीने गॅस शेगडीच्या जवळ असतील तर काम करणाऱ्या व्यक्तीचा उगीचच इथे तिथे फिरण्यात वेळ खर्च नाही होणार. याव्यतिरिक्त इतर ट्रॉल्यांचे वर्गीकरण करताना कांदे-बटाटे साठवण्यासाठी एखादी ट्रॉली बाहेरील बाजूने हवा खेळती राहण्याकरिता व्हेंटिलेटरसकट असावी. ट्रॉल्यांमध्ये तयार ताटाळी देखील मिळतात. आवश्यकता असल्यास त्याचीही सोय करून ठेवावी. आता आपल्याकडे उरलेल्या वस्तूंची तपशीलवार यादी करून मोठे डबे, लहान वस्तू यांच्या आकाराप्रमाणे इतर ट्रॉल्या बनवून घ्याव्यात. नियम दुसरा असा की, वस्तूंचे वर्गीकरण करताना त्यांच्या आकारासोबतच त्यांचे वजन देखील ध्यानात घ्यावे. म्हणजेच जास्त जड वस्तू सर्वात खाली तर हलक्या वस्तू वर ठेवता येतील. बरेच ठिकाणी ‘छ’ किंवा ‘उ’ आकाराचा ओटा पाहायला मिळतो. अशा वेळी ओटय़ाखाली जो कोपरा तयार होतो त्याचे काय करायचे हा एक नेहमीच प्रश्न असतो, पण आता मात्र त्याचीही चिंता करण्याचे कारण नाही. अनेक नामांकित कंपन्यांच्या खास अशा कोपऱ्यांसाठी म्हणून ट्रॉल्या येतात. यांचे वैशिष्टय़ म्हणजे, आपल्याला कोपऱ्यात वाकायला न लागता सहज ओढल्या असता या संपूर्ण ट्रॉल्याच ओटय़ाखालून बाहेर येतात.

आता एवढी साठवणीची जागा करूनही स्वयंपाकखोलीतील सामान संपेल तर ती भारतीय स्वयंपाकखोली कसली? तर ओटय़ाखालच्या जागेचा विचार करून झाल्यावर आता पाळी ओटय़ावरील कपाटांची. ओटय़ावरील कपाटे करताना ओटय़ापासून ती किमान सव्वा दोन फूट तरी उंच असावीत आणि भिंतीपासून त्यांची खोली देखील पंधरा इंचांपेक्षा जास्त नको, म्हणजे ओटय़ाजवळ उभे राहून काम करणाऱ्या कोणाही व्यक्तीला वरच्या कपाटांचा अडथळा न होता काम करता येईल. वरची कपाटे ही सर्वसाधारणपणे हलक्या वजनाचे डबे, काचेचे पेले, वाटय़ा अशा वस्तू साठवण्याच्या उपयोगी येतात. या कपाटांमध्ये स्पॉट लाइट किंवा थेट लाइट न लावता वरून काचेचे दरवाजे बसवून स्वयंपाकखोलीत छान डिस्प्ले युनिट देखील आपण बनवू शकतो. यामुळे स्वयंपाकखोलीच्या सौंदर्यात भर पडून काचेमुळे तेथील वातावरणात एकप्रकारचा मोकळेपणा येईल. हल्ली प्रत्येक घरात सिंकच्या वर पाणी शुद्धीकरणाचे मशीन बसवले जाते हे लक्षात घेऊन तेवढय़ा भागापुरता ओटय़ावरील कपाटाचा तळ कापून टाकला तर समोरून सलग कपाट तर दिसेल पण त्याखालून पाण्याचे पाइप देखील सहज वापरता येतील. वरची कपाटे करताना जिथे गॅसची शेगडी असेल तिच्या वर कधीही कपाट येऊ देऊ नये ही महत्त्वाची बाब नेहमीच लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे आपले स्वयंपाकखोलीतील फर्निचर फक्त उपयुक्त आणि सुंदरच नाही तर सुरक्षित देखील होईल.

याव्यतिरिक्त आपण जर बिल्ट इन फ्रिज, मायक्रोवेव्ह, डिश वॉशर, इत्यादींचा विचार करत असू तर त्यासाठी देखील योग्य मापात कपाटे बनवून घ्यावीत तरच या वस्तू योग्य प्रकारे जागेवर बसतील आणि त्यांचा वापर देखील करता येईल.

कोणत्याही फर्निचरचा विचार हा त्याला लागणाऱ्या हार्डवेअर शिवाय पूर्ण होऊच शकत नाही आणि स्वयंपाकखोलीतील फर्निचरचा विचार करता सर्वात जास्त हार्डवेअरचा वापर इथेच होतो. सर्वात आधी तर हॅण्डल. सर्व कपाटांना, ट्रॉल्याना उघडण्या बंद करण्यासाठी हॅण्डल तर आवश्यकच. स्वयंपाकखोलीसाठी हॅण्डल निवडताना शक्यतो असे हॅण्डल निवडावेत की ज्यात येता जाता कपडे अडकता काम नयेत. त्यांचा वापरही मोठय़ा प्रमाणात होणार असल्याने ती दणकट असावीत. हाताने व्यवस्थित पकडता यावीत म्हणजेच त्याची पकड मजबूत असली पाहिजे. प्रोफाइल हॅन्डल किंवा कन्सिल हॅन्डलचा पर्याय स्वयंपाकखोलीसाठी उत्तम पर्याय ठरतो. या प्रकारची हॅन्डल दरवाजांपासून बाहेर येत नसल्याने सर्वात सुरक्षित म्हणता येतात शिवाय यांच्या वापराने फर्निचरच्या सौंदर्यात भरच पडते ते वेगळेच. ट्रॉलीसाठी वापरण्यात येणारे चॅनेल देखील चांगल्या नावाजलेल्या कंपनीचेच घ्यावेत जेणेकरून पुन्हा पुन्हा त्यांचा दुरुस्ती खर्च निघणार नाही.

मी नेहमीच म्हणते की, आपण फार भाग्यवान आहोत की आधुनिक युगात आपला जन्म झाला आहे. स्वयंपाकखोलीसाठीही हे लागू होते. आपल्या हाताशी असणाऱ्या आंतरजालावर एक फेरफटका मारल्यास स्वयंपाकखोलीही किती आधुनिक रूप घेऊ शकेल याचा आपल्याला सहज अंदाज येईल. आज अनेक देश-विदेशातील नामांकित कंपन्यांची उत्पादने आपल्याला भारतात अगदी आपल्याच शहरात उपलब्ध होऊ शकतात. यामध्ये उत्तम दर्जाचे ड्रॉवर चॅनेल आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या बिजागऱ्या आहेत ज्यांचा वापर करून आपण न फक्त आपली स्वयंपाकखोली सुंदर बनवू शकतो तर ती वापरण्यास अत्यंत सुलभ होऊ शकते. त्याही पुढे जाऊन तुमच्या स्वयंपाकखोलीतील फर्निचरमध्ये विजेचा वापर करून एक कळ दाबून तुम्ही तुमची कपाटे उघड बंद करू शकता.

सगळी चर्चा झाली, पण मुळात फर्निचर म्हटले की मूलभूत वस्तू म्हणजे त्यासाठी लागणारा प्लायवूड, लॅमिनेट. स्वयंपाकखोलीत वापरण्यात येणारा प्लायवूड हा पाणी रोधक असल्यास उत्तम. ओटय़ावरील कपाटांकरिता साधारण प्लायवूड वापरला तरी हरकत नाही पण ओटय़ाखाली जिथे पाण्याशी थेट संबंध येऊ शकतो अशा ठिकाणी मात्र पाणी रोधक प्लायवूड वापरणे कधीही चांगले. स्वयंपाकखोलीसाठी लॅमिनेट निवडतानाही शक्यतो गुळगुळीत पृष्ठभागाचे लॅमिनेट वापरणे स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून चांगले ठरते. फार खडबडीत किंवा कापड, लेदर याचा वापर केलेले लॅमिनेट स्वयंपाकखोलीत टाळलेलेच बरे. लॅमिनेट लावताना ते प्लायवूडच्या कडांना देखील लावले गेले पाहिजे याबद्दल आग्रही राहा, याचा परिणाम प्लायवूडच्या टिकाऊपणावर आणि पर्यायाने संपूर्ण स्वयंपाकखोलीच्या फर्निचरच्या आयुष्यावर होतो. बाजारात मेटॅलिक किंवा सुपर ग्लॉस अशा प्रकारचे लॅमिनेट मिळतात जे स्वयंपाकखोलीसाठी उत्तम.

अशा तऱ्हेने विचारपूर्वक स्वयंपाकखोलीतील फर्निचर बनविल्यास आपली स्वयंपाकखोली सुंदर, सुटसुटीत आणि आधुनिक देखील होईल.

(इंटिरियर डिझायनर)

pradhaninteriorsllp@gmail.com

मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on kitchen furniture