मंजू याज्ञिक
भारतातील घर खरेदीसाठी सणासुदीचा काळ हा सर्वात योग्य काळ आहे. या काळात उत्साह, आर्थिक तयारी आणि बाजारातील संधी यांचा उत्तम संगम होतो.
भारतामध्ये सणासुदीचा काळ हा केवळ साजरा करण्याचा एक काळ नसून, तो नवचैतन्य, आशावाद आणि नवीन सुरुवातींचा काळ मानला जातो. पिढय़ान्पिढय़ा गणेश चतुर्थी, दसरा आणि दिवाळी यांसारखे सण हे आयुष्यातील मोठय़ा गुंतवणुकीसाठी- विशेषत: घर खरेदीसाठी- सर्वात शुभ मानले जातात. आजही ही परंपरा टिकून आहे. यंदा या सणासुदीच्या काळात रिअल इस्टेट मार्केटही तेजीत आहे- जे संभाव्य खरेदीदारांसाठी फायदेशीर ठरणारे आहे. त्यामुळे हा सणाचा काळ घर खरेदीसाठी उत्तम मानला जात आहे.
सणासुदीमध्ये घर खरेदी का वाढते?
या काळात केलेली गुंतवणूक ही समृद्धी घेऊन येते, असा पारंपरिक समज आहे. जनमानसातील ही भावना विकासक आणि वित्तीय संस्था यांच्याकडून देण्यात येणाऱ्या सणसुदीच्या खास ऑफर्समुळे अधिक दृढ होते. जसे की रोख सवलती, स्टॅम्प डय़ुटीमध्ये सूट, कमी व्याजदराचे गृहकर्ज, तसेच ‘आता खरेदी करा, नंतर पैसे द्या’ यांसारख्या आकर्षक योजना. त्यामुळे एक असे वर्तुळ तयार होते, जिथे जनमानसातील भावना आणि अर्थशास्त्र यांचा उत्तम संयोग दिसून येतो.
लवचीक आर्थिक योजना- बदल घडवणारा घटक
अलीकडच्या काळात, परंपरागत ‘फ्री गिफ्ट्स’ पेक्षा स्ट्रक्चर्ड पेमेंट प्लॅन्स अधिक लोकप्रिय झाले आहेत. हे प्लॅन्स खरेदीदारांना त्यांच्या पेमेंटची रचना त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार टप्प्याटप्प्याने किंवा विलंबाने देण्याची मुभा देतात. बोनसची वाट पाहणारा नोकरदार वर्ग किंवा मालमत्तेमधून पैसे मिळविणारे गुंतवणूकदार यांच्यासाठी ही योजना फायदेशीर ठरते. अशा लवचीक योजनांना अल्पावधीतच चांगलीच मागणी येते.
बोनस आणि नवीन प्रकल्पांची जुळवणी
सणाच्या काळात अनेकांना बोनसमुळे खरेदीसाठी आर्थिक प्रोत्साहन मिळते. बोनस आणि नवीन प्रकल्पांचे लॉंचिंग हे एकाच कालावधीत असतात. यामुळे खरेदीसाठी सज्ज असलेल्या ग्राहकांना आणि बाजारात आलेल्या नवीन घरांसाठी हा एक सुवर्णसंधीचा काळ ठरतो. रेडी टू मूव्ह इन घरांसाठी याच काळात जास्त मागणी असते, कारण लोकांना सणालाच त्यांच्या नवीन घरात प्रवेश करायचा असतो.
तरुण खरेदीदार आणि उदयोन्मुख लोकेशन्स
अलीकडील बाजारातील आकडेवारीनुसार, सणाच्या काळात घर खरेदी करणाऱ्यांमध्ये २५ ते ३५ वयोगटातील खरेदीदारांची संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे. हे खरेदीदार बहुतेक वेळा मिड-मार्केट किंवा प्रीमियम सेगमेंटमध्ये गुंतवणूक करत आहेत. मेट्रो प्रोजेक्ट्स, एक्सप्रेसवे आणि शहरातील सुविधांमध्ये सुधारणा यांसारख्या इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड्समुळे नवीन लोकेशन्समध्ये अधिक खरेदी होत आहे.
सणामुळे निर्माण होणारी खरेदीची घाई
सणासुदीच्या ऑफर्स या मर्यादित कालावधीसाठीच असतात आणि सणाचा आनंददायक माहोल खरेदीसाठी एक सकारात्मक मानसिकता तयार करतो. त्यामुळे अनेकदा निर्णय घेण्यास अजूनही संकोच करणारे खरेदीदार अखेर पुढे येऊन खरेदी करतात. बहुतांश विकासकांसाठी वर्षभराच्या विक्रीपैकी मोठा वाटा सणांच्या तिमाहीतच होतो. खरेदीदारांसाठी ही अशी संधी असते जिथे त्यांची महत्त्वाकांक्षा, योग्य वेळ आणि आर्थिक फायदे यांचा उत्तम मेळ साधता येतो.
योग्य निर्णय घेणे आवश्यक
जरी सणाबरोबर येणाऱ्या योजना खूप आकर्षक असल्या, तरी खरेदी करताना सजग राहणे आवश्यक आहे. विकासकाची विश्वासार्हता, बांधकामाची गुणवत्ता आणि लोकेशनचा भविष्यातील विकास यांचा बारकाईने अभ्यास करणे आवश्यक आहे. एक माहितीपूर्ण आणि विचारपूर्वक घेतलेला निर्णय, सणाच्या शुभ मुहूर्तावर केलेली गुंतवणूक दीर्घकालीन मूल्यही देते.
सुवर्णसंधीचा काळ
थोडक्यात सांगायचं झालं तर, भारतातील घर खरेदीसाठी सणासुदीचा काळ हा सर्वात योग्य काळ आहे. या काळात उत्साह, आर्थिक तयारी आणि बाजारातील संधी यांचा संगम होतो. ही केवळ एक मालमत्ता खरेदी नसून, ही एक अशी अनुभूती असते जिथे सांस्कृतिक मूल्ये आणि आर्थिक स्थैर्य यांचा एकत्रित अनुभव मिळतो.
(लेखिका नाहर ग्रुपच्या उपाध्यक्ष आहेत.)