मधुसूदन फाटक

दक्षिण मुंबईतील नाना चौकापासून हाकेच्या अंतरावर मराठी मध्यमवर्गीय मुंबईकरांची एक वसाहत आहे. सुमारे दीडशे वर्षांपूर्वीच्या या वास्तूचे नाव आहे शास्त्री हॉल. हॉल म्हणजे सभागृह. हे नाव निवासी वसाहतीला आगळंच करते. लालबहादूर शास्त्री यांची स्मृती म्हणून हे नामकरण असावे, असा एक तर्क मुंबईकर काढतात; पण तो खरा नाही.

बदलत्या काळात आता या वसाहतीत एकही हॉल नाही, तरी फार पूर्वी तसा एक हॉल होता- तेथे एके काळी असलेल्या पोर्तुगीजकालीन बंगल्यात होता असे म्हणावे लागेल, कारण काही वर्षांपूर्वी जुन्या चाळींच्या पुनर्विकासामध्ये तो हॉल जमीनदोस्त झाला आणि तेथे एक गगनचुंबी इमारत उभी राहिली. त्या काळी ‘प्राचीन वारसा वास्तू’संबंधी कडक कायदे नव्हते म्हणून हे शक्य झाले असावे.

‘शास्त्री हॉल’ वसाहत ही ज्या सुमारे शंभर एकर भूखंडावर उभी आहे तो भूखंड ब्रिटिश शासनाने दुसऱ्या बाजीरावांचे त्यांच्याकडील वडील सरदार गंगाधरशास्त्री पटवर्धन यांना इनाम दिला होता. त्या भूखंडावर केवळ एक बंगला होता. त्याचे बांधकाम गोव्यातील बंगल्यासारखे होते म्हणून तो पोर्तुगीजकालीन असावा असा जाणकारांचा कयास आहे. प्रवेशद्वारासमोर भव्य पोर्च होते. तेथून रुंद अशा प्रवेशद्वारातून आत गेल्यावर काही विशाल भव्य अशी दोन दालने होती- पंचवीस-तीस फूट उंच. उजव्या हाताला एक अर्धगोलाकार जिना होता. वरील हॉलमध्ये जाण्यासाठी तो इतका भव्य आणि रुंद की एका वेळी दहा जणांची साखळी तो एका वेळी चढू शकेल. जिन्याच्या दोन्ही बाजूंचा कठडा हा एका सलग बांबूमध्ये साकारला होता. पंचवीस पायऱ्यांचा जिना पार केला की पाऊल पडत असे ते एका भव्य सभागृहात. सभागृहाचे छत सुमारे तीस फूट उंच, तर जमीन सागवानी लाकडाची- पश्चिमी डान्स फ्लोअर असतो तशी गुळगुळीत तक्तपोशी.. अनेक झुंबरांनी लखलखलेली. एका टोकाला दत्ताची भव्य मूर्ती होती. ती नंतरच्या मालकांनी उभारली असावी. या सभागृहाला सरदार गंगाधरशास्त्री पटवर्धन यांची स्मृती म्हणून त्यांचेच नाव दिले होते.

गंगाधरशास्त्री पटवर्धन हॉलचे त्रोटक नाव झाले शास्त्री हॉल. या हॉलभोवती नंतर आठ चाळी बांधून सुमारे चारशे मध्यमवर्गीय कुटुंबांची निवासी सोय करण्यात आली आणि नव्याने उभा राहिलेल्या वसाहतीला शास्त्री हॉल हे नाव दिले गेले. दुर्दैवाने रस्तारुंदीसाठी या वाडीचा नव्याने विकास झाला तेव्हा हा सुंदर प्राचीन बंगला पाडला आणि तेव्हा आम्ही येथील पिढय़ान् पिढय़ाचे रहिवासी हळहळलो. कामगार फुटाफुटाच्या रुंद भिंती मोठय़ा हातोडय़ाने तोडताना घामाने थबथबत होते, तर आमच्या नेत्रांतून अश्रू वाहत होते. काळाचा महिमा..