मनोज अणावकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

र सजवताना…’ या सदराच्या माध्यमातून तुमच्या घराची दुरुस्ती करताना किंवा नूतनीकरण करताना उपयोगी पडतील अशा अगदी लहान; परंतु महत्त्वाच्या टिप्स या सदरातून तुम्हाला दिल्या जाणार आहेत.

सिमेंटचे प्रकार : बांधकामासाठी नेहमी लागणारा घटक म्हणजे सिमेंट! या सिमेंटचे काही प्रमुख प्रकार आणि त्याचा केला जाणारा वापर खाली दिला आहे.

● ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट(ओपीसी) : सर्वसाधारणपणे इमारतीच्या तसंच इतर बांधकामांसाठी वापरतात. ‘ओपीसी’ प्रकारच्या सिमेंटमध्ये ३३, ४३ आणि ५३ ग्रेड असे उपप्रकार आहेत. त्यातल्या ५३ ग्रेडच्या सिमेंटची दाब सहन करण्याची ताकद अधिक असल्यानं तेच अधिक वापरलं जातं. या सिमेंटचा वापर केलेल्या काँक्रीटमध्ये २८ दिवसांमध्ये पूर्ण ताकद विकसित होत असल्यामुळे हे सिमेंट विशेषत: महत्त्वाच्या स्ट्रक्चरल बांधकामांसाठी इमारतींमध्ये वापरण्यात येते. कारण एकामागाहून एक वरच्या मजल्यांचं बांधकाम इमारतींमध्ये करावं लागतं. अशा वेळी पूर्ण ताकद विकसित होण्याकरता अधिक कालावधी घेणारे सिमेंटचे प्रकार उपयोगी नसतात.

● पोर्टलंड पोझोलोना सिमेंट (पीपीसी) : यामध्ये ‘फ्लायअॅश’ अर्थात, औष्णिक ऊर्जा केंद्रातील राख वापरली जाते. यामध्ये जरी ओपीसीपेक्षा अधिक ताकद निर्माण होत असली, तरी ओपीसीमध्ये पूर्ण ताकद २८ दिवसांमध्ये निर्माण होते, तर पीपीसीमध्ये ६० दिवसांनंतर पूर्ण ताकद निर्माण होते. त्यामुळे जिथे बांधकामाकरता अधिक कालावधी उपलब्ध आहे आणि अधिक टिकाऊ बांधकामाची आवश्यकता आहे अशा ठिकाणी हे सिमेंट उपयुक्त ठरते.

● रॅपिड हार्डनिंग सिमेंट (आरएचसी) : जलद गतीनं काम पूर्ण करायचं असेल तेव्हा कमी वेळात अधिक ताकद निर्माण करण्यासाठी याप्रकारचे सिमेंट वापरले जाते. थंड हवेच्या प्रदेशातल्या बांधकामांसाठी, पाण्याखाली केल्या जाणाऱ्या बांधकामाकरता किंवा तातडीच्या दुरुस्तीच्या कामांसाठी हे सिमेंट वापरले जाते. याचा उपयोग रस्ते, पूल आणि तत्सम प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो.

● क्विक सेटिंग सिमेंट : सिमेंट पटकन घट्ट होण्याची गरज असेल तेव्हाच्या वापरासाठी. परंतु पटकन घट्ट होत असलं तरी आरएचसीप्रमाणे याच्यात कमी वेळात अधिक ताकद निर्माण होत नाही.

● सल्फेट रेसिस्टिंग सिमेंट : मातीत किंवा भूजलात सल्फेटचं (एक प्रकारच्या क्षाराचं) प्रमाण जास्त असतं तेव्हा तिथल्या बांधकामासाठी हे सिमेंट वापरलं जातं. पूल, धरणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि सागरी बांधकाम यांसारख्या प्रकल्पांसाठी बऱ्याच वेळा या प्रकारच्या सिमेंटचा वापर केला जातो.

मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Useful tips for repairing or renovating your home zws