चैत्रारंभी वसंताचे आगमन होते. शिशिरातील पानगळीनंतर ओकेबोके झालेले वृक्ष आणि वेली वसंताच्या स्वगतासाठी नवपालवी लेवून त्याला सामोरे जातात. हळूहळू वसंताची रंगपंचमी गुलमोहर, बाहवा, काटेसावर यांच्या रंगीबेरंगी फुलांनी व्यक्त होते. कोकीळ कुंजन सुरू होते. वातावरण चैतन्यमय बनते.
चैत्रपाडवा नवीन वर्षांचे स्वागत करतो. तृतीयेला वसंतगौरी स्थानापन्न होतात. आंबेडाळ-पन्हे असा बेत करून हळदीकुंकू समारंभ साजरे होऊ लागतात. कालौघात पूर्वीसारखी आरास, थाटमाट होत नाही, परंतु वसंताचे उत्सवी रूप टिकून राहील एवढा माहौल निश्चित असतो. वैशाखाचे आगमन होते आणि वसंतगौरीच्या उत्सवसमाप्तीची चाहूल लागते. चैत्र शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीयेला माहेरी आलेल्या गौरी परत सासरी जातात. मोठय़ा थाटाने हळदीकुंकू समारंभ करून त्यांना निरोप दिला जातो.
हा अध्र्या शुभमुहूर्त कृतयुगाचा आरंभदिन मानला जातो. तर काहींच्या मते हा त्रेतायुगाचा आरंभदिन आहे. कोणत्याही युगाचा असेना परंतु हा युगारंभ दिन हे निश्चित. म्हणून महत्त्वाचा पवित्र दिवस. मंगल कृत्ये करण्यासाठी, व्रत आचरण्यासाठी, जपादी पुण्यकर्मे करण्यासाठी हा शुभदिवस आहे. हे पुण्यकर्म अक्षय फलदायी होते, अशी समजूत आहे. ऋषभ देवाने एक वर्ष आणि काही दिवसांनंतर हस्तिनापूरचा राजा श्रेयास याच्या घरी या तिथीस उसाच्या रसाचे प्राशन करून उपवास सोडला. त्यामुळे श्रेयास राजाची भोजनशाळा अक्षय्य झाली म्हणून वैशाख शुद्ध तृतीयेस अक्षय्य तृतीया हे नाव पडले अशी आख्यायिका आहे. गुजराती लोक या तिथीला ‘आखातरी’ म्हणतात. शेतकरी आकिती म्हणतात व वेलींच्या बीजांची पेरणी करतात.
या दिवशी पवित्र जलात स्नान करतात. विश्वाच्या पालनकर्त्यां विष्णूला संतुष्ट करण्यासाठी त्याची पूजा करतात. जप, होमहवन, पितृतर्पण करतात. वैशाख वणव्यात वसुंधरा होरपळू लागते. या काळात समस्त पशू-पक्षी, मानव तृषाक्रांत होतात. त्यामुळे त्यांची तहान भागविणे हे पुण्यकर्म समजून उदार व दानशूर व्यक्ती पाणपोई घालतात.
पांथस्थ जलप्राशनाने तृप्त होतात. पशू-पक्ष्यांसाठी गावात व जंगलात कृत्रिम पाठवणे तयार केले जातात. म्हणूनच पूर्वजांनी मुद्दाम शास्त्र सांगितले की या दिवशी शिध्यासह उदककुंभ दान करावा. ऐपतीनुसार गरिबांना छत्री, जोडा अशा वस्तूंचे दान करून उन्हाच्या काहिलीपासून त्यांचे संरक्षण करावे.
चैत्र शुद्ध तृतीयेस मत्स्य जयंती असते. चैत्र शुद्ध नवमीस रामजन्म, वैशाख शुद्ध द्वादशीस भगवंती देव जयंती, वैशाख शुद्ध चतुर्दशी नृसिंह जयंती, वैशाख पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा असे विष्णूचे अनेक अवतार या महिन्यात झाले म्हणूनही त्याची पूजा वैशाख महिन्यात पुण्यकारक मानली गेली असेल.
संग्रहित लेख, दिनांक 13th May 2013 रोजी प्रकाशित
अक्षय्य तृतीया : शास्त्र आणि परंपरा..!
चैत्रारंभी वसंताचे आगमन होते. शिशिरातील पानगळीनंतर ओकेबोके झालेले वृक्ष आणि वेली वसंताच्या स्वगतासाठी नवपालवी लेवून त्याला सामोरे जातात. हळूहळू वसंताची रंगपंचमी गुलमोहर, बाहवा, काटेसावर यांच्या रंगीबेरंगी फुलांनी व्यक्त होते. कोकीळ कुंजन सुरू होते. वातावरण चैतन्यमय बनते.
First published on: 13-05-2013 at 07:19 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshaya tritiya