प्रत्येक घराचा ठरलेला सोनार आणि त्याच्याकडेच होणारी सोन्याची खरेदी ही परिस्थिती केव्हाच बदलली आणि सोन्याच्या ब्रॅण्डेड दागिन्यांना महत्त्व आलं. आता या ट्रेण्डवर ऑनलाइन सोने खरेदीने कुरघोडी केली आहे.
काही गोष्टी प्रत्येक समाजात अत्यंत पारंपरिक पद्धतीने केल्या जातात; मग त्या धार्मिक असोत, खासगी असोत, सार्वजनिक असोत की अन्य कोणत्याही. त्यात बराचसा भाग सामाजिक व्यवहाराचा असतो, पण बाजाराधारित व्यवहारात पारंपरिकतेपेक्षा गुणवत्तेला प्राधान्य असते. सोनेखरेदी हादेखील बाजार व्यवहाराचा भाग. पैसे द्यायचे आणि माल खरेदी करायचा, पण येथे त्याबरोबरच एक महत्त्वाचा घटक असतो, तो म्हणजे विश्वास आणि या विश्वासावरच अनेक पिढय़ा आणि पेढय़ा वाढल्या, नावारूपाला आल्या. फॅमिली डॉक्टर असायचा अगदी तसेच सोनारदेखील असायचा, पण नोकरी-व्यवसायाच्या संधी बदलत, वाढत गेल्या, स्थलांतर वाढले, नवनवी शहरे विकसित होत गेली तसतसे या एकूणच पारंपरिकतेपेक्षा बाजाराधारित व्यवस्थेत अनेक घटक येत गेले. जागतिकीकरणामुळे नवश्रीमंतांचा वर्ग वाढत गेला. खरेदी क्षमता वाढू लागली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्वामध्ये तरुणाईचा सहभाग वाढला. (आज आपल्या देशात १८ ते २५ वयोगटाची संख्या ११.७८ टक्के आहे.)
लोक खरेदीला नाही तर शॉपिंगला जाऊ लागले. या वर्गाच्या खरेदीमध्ये पारंपरिक व्यापाऱ्यापेक्षा ब्रॅण्डला महत्त्व मिळू लागले.
सोने-चांदी-हिऱ्याच्या दागिने खरेदीमध्ये इतकी वर्षे पारंपरिकतेची एक प्रकारची मक्तेदारी मोडली जाण्याच्या बदलाची खरी नांदी म्हणावी लागेल. पेढीवरचा व्यवहार चकाचक शोरूममध्ये आला आणि पुढे जात साखळी शोरूममध्ये परावर्तित झाला.
आज राज्याच्याच नाही, तर देशाच्या कानाकोपऱ्यातील सर्वच पिढीजात पेढय़ांनी हे ब्रॅण्डिंगचे सूत्र यशस्वीपणे हाताळायला सुरुवात केली आहे. कधी एखाद्या सेलेब्रिटीच्या माध्यमातून, तर कधी आपल्या दागिन्यांच्या गुणवत्तेनुसार ब्रॅण्डिंगची गणिते मांडली जातात, पण एक मात्र निश्चित की, गिऱ्हाईकाने आपणहून आपल्या दुकानापर्यंत यावे यापेक्षा आपणच गिऱ्हाईकांपर्यंत कसे जाता येईल याची जाणीव या क्षेत्राला ब्रॅण्डिंग आणि जाहिरातींनी करून दिली. यामध्ये अर्थातच लहान सोने व्यापाऱ्यांना नाही म्हटले तरी काही प्रमाणात फटका बसला, पण ज्यांनी बाजाराची ही नीती स्वीकारली त्यांना त्याचा नक्कीच फायदा झाल्याचे दिसून येते.
याच अनुषंगाने एक तज्ज्ञ सांगतात की, हा बदल आज सर्वच क्षेत्रांत होताना दिसतो आहे. अगदी बेकरीसारख्या खाद्यपदार्थामध्येदेखील बॅ्रण्डिंग, जाहिरातींचा प्रभाव आहे. सोन्याच्या बाबतीत सांगायचे, तर पूर्वी प्रमाणीकरणाचा अभाव होता. आज हॉलमार्कसारख्या अनेक बाबींमुळे हा सारा व्यवहार पारदर्शक झाला आहे. त्यामुळे ज्याच्याकडे डिझाईन चांगले असेल, दर योग्य असेल, त्याकडे दागिने घेण्याची आपली तयारी असते आणि आमच्याकडे हे सर्व आहे हे सांगण्यासाठी, जे ग्राहक आम्हाला ओळखत नाहीत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जाहिराती, स्कीम या अपरिहार्य असल्याचे ते प्रतिपादन करतात. अनेक वेळा बॅ्रण्डिंगसाठी कधी कधी सेलेब्रिटींचा आधारदेखील घेतला जातोय.
या संदर्भात लागू बंधू ज्वेलर्सचे दिलीप लागू सांगतात की, साधारण पंधरा वर्षांपूर्वी आम्हाला ब्रॅण्डिंगची गरज भासली, पण त्यासाठी आम्ही सेलेब्रिटी वगैरेचा वापर करण्यापेक्षा दागिन्यांवरच लक्ष केंद्रित केले. आजही बराच व्यवसाय हा कम्युनिटी आधारित आहे, पण ब्रॅण्डिंगचा फायदा आम्हाला निश्चितच होत असल्याचे ते नमूद करतात. शीर्षक प्रायोजकत्वासारखे प्रयोग हे फारसे फायदेशीर नसतात, पण त्यामुळे चर्चा नक्कीच होते, हे ते आवर्जून नमूद करतात.
ब्रॅण्डिंगची गरज आणि अपरिहार्यता मांडताना वामन हरी पेठे ज्वेलर्सचे आदित्य पेठे सांगतात की, पूर्वी ग्राहक आणि व्यापारी यांच्यामधला जो थेट संपर्क होता तसा आज कायम राहणे अशक्य आहे. आमचे आजोब गिरगावातल्या पेढीवर बसायचे.
येणाऱ्या प्रत्येक गिऱ्हाईकाशी त्यांचा संपर्क असायचा. आज वाढत्या शाखांचा विचार केला, तर हे शक्य नाही. अशा ठिकाणी ब्रॅण्डिंग कामाला येते. प्रमाणीकरणाचा लाभ होतो. आज जाहिरातींचा परिणाम सर्वच क्षेत्रांत दिसून येतो. माणूस शूज घ्यायला बाहेर पडतानादेखील मनात काहीएक ठरवूनच जातो. दागिन्यांच्या बाबतीतदेखील हेच लागू होते. अर्थात ब्रॅण्डिंग आणि जाहिरातींना जोडूनच विविध स्कीम्स हादेखील महत्त्वाचा पैलू असल्याचे चिंतामणी ज्वेलर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक मुरुडकर सांगतात. त्या माध्यमातून तुमच्याकडे येणाऱ्या ग्राहकांची वर्दळ वाढते. तुम्ही जर प्रमाणीकरणाबाबत दक्ष असाल, तर मग ग्राहक पुढेदेखील तुमच्याकडे यामुळे येण्यास मदत होते.
थोडक्यात काय, एके काळच्या पिढीजात विश्वासाची जागा आज या ब्रॅंण्डिंग नामक बाजारपेठीय घटकाने घेतली आहे आणि हीच आज प्राथमिक अवस्थेत असणाऱ्या ऑनलाइन शॉपिंगची मजबूत पायाभरणीच म्हणावी लागेल, कारण ज्याचे ब्रॅण्डिंग त्याचीच ओळख आणि ज्याची ओळख त्यावरच विश्वास आणि ज्याच्यावर विश्वास त्यालाच कोणत्याही मार्केटमध्ये लाभ मिळणार. ऑनलाइन मार्केटदेखील त्याला अपवाद नाही.
ऑनलाइन हे एकप्रकारे मार्केटिंगसारखंच आहे. पोर्टलवरून दागिने पाहून निवडून खरेदीसाठी येणाऱ्यांचं प्रमाण लक्षणीय असल्याचे तज्ज्ञ नमूद करतात.
ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेण्ड लोकप्रिय आहे का, त्याला प्रतिसाद कसा आहे याबद्दल लागू बंधू ज्वेलर्सचे दिलीप लागू सांगतात की आज ऑनलाइन मार्केटमध्ये दागिन्यांचा शिरकाव झाला आहे. आम्हीदेखील अॅमेझॉनशी टाय-अप केलं आहे. आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पण सध्या तरी ऑनलाइन शॉपिंगमध्ये पंचवीस तीस हजार रुपयांच्या दागिन्यांना अधिक उठाव असल्याचे आणि सोने खरेदीचा हा प्रकार लोकप्रिय व्हायला मात्र अजून वेळ लागेल असे ते नमूद करतात. वामन हरी पेठे यांनी स्वत:च्या पोर्टलवरून खरेदीची सुविधा तर दिली आहेच, पण त्यांनी अॅमेझॉनशीदेखील टाय-अप केलं आहे. सोन्याच्या दागिन्यांबाबतीत टच आणि फिलचा प्रभाव असला तरीदेखील ऑनलाइन मार्केटला चांगला प्रतिसाद असल्याचे आदित्य पेठे नमूद करतात. आज जरी ही सुविधा आम्ही देत नसलो तरी नव्या पिढीचा ऑनलाइनकडे वाढता कल पाहता भविष्यात दागिन्यांसाठी हा ट्रेंड जोर पकडण्याची शक्यता असल्याची शक्यता चिंतामणी ज्वेलर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक मुरुडकर सांगतात.
थोडक्यात काय तर आज दागिन्यांच्या बाजारात ऑनलाइनने चंचुप्रवेश नक्कीच केला आहे.
एकंदरीत देशातील दागिन्यांच्या बाजारपेठेतील या बदलावर प्रकाश टाकताना जेम्स अॅण्ड ज्वेलरी फेडरेशनचे संचालक, अशोक मीनावाला सांगतात, ‘‘ऑनलाइन बाजारपेठ आता चांगलीच खुली होत आहे. काही ब्रॅण्ड चांगला व्यवसाय करत आहेत.
जसे कॉर्पोरेट हाऊसचे दागिन्यांतील पदार्पण स्वीकारलं तसेच लोक ऑनलाइन दागिने खरेदीला स्वीकारत आहेत. आणि ऑनलाइन दागिने खरेदी हे या व्यवसायचं भविष्य असणार आहे.’’
एकेकाळच्या पिढीजात विश्वासावर ब्रॅण्डिंगने कुरघोडी केल्याचे बाजारपेठेने सिद्ध केलेच आहे. आज त्याच ब्रॅण्डिंगच्या जोरावर ऑनलाइन बाजारपेठेचे हे नवे क्षितिज सर्वानाच खुणावत आहे. तर दुसरीकडे अनेक कॉर्पोरेट हाऊसेस सोन्याच्या दागिन्यांच्या क्षेत्रात उतरताना थेटपणे ब्रॅण्डिंगचा आधार घेताना दिसतात. तनिष्क, रिलायन्स ही काही उदाहरणं देता येतील. त्यांच्या व्यवस्थेत ऑनलाइन सुरुवातीपासूनच आहे. तर ऑनलाईन फंडा जोपासलेल्या पिढीजात व्यापाऱ्यांनादेखील याचा लाभ होत आहे.
कॅरटलेन संपूर्ण विक्री ऑनलाईन पद्धतीने करते. २००८ मध्ये सुरू झालेल्या या पोर्टलचे आज दहा हजारांहून अधिक ग्राहक असल्याचा दावा आहे. या पोर्टलचा नोंद घेण्याजोगा पैलू म्हणजे त्याचे यूथ सेंट्रिक असणे. आजच्या पिढीला दागिन्यांची आवड आहेच. पण त्यांचा भर कमी वजनाचे, आकर्षक आणि रोजच्या वापरात कार्यालयीन कामकाजात सहजपणे सूट होतील असे दागिने वापरण्याकडे आहे. आणि या पोर्टलवरून अशाच दागिन्यांची विक्री मोठय़ा प्रमाणात होताना दिसते.
येथेच भविष्यातील बाजारपेठेचे संकेत मिळतात. एका सर्वेक्षणानुसार देशात तब्बल २०५ दशलक्ष इंटरनेट वापरकर्ते आहेत. त्यापैकी महिलांची संख्या ३९ टक्के इतकी आहे. आणि एकूणच इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये २५ पेक्षा कमी वयोगटाची संख्या ५० टक्क्य़ांहून अधिक आहे. आणि ऑनलाईन शॉपिंगमध्ये ५० टक्के वापरकर्ते हे २५-३५ या वयोगटातील आहेत. उद्या हीच पिढी जेव्हा खरेदीक्षम होईल त्यांची खरेदी क्षमता वाढेल तेव्हा त्यांचा ओढा ऑनलाइन पोर्टल्सकडे असणार आहे. तेव्हा या मार्केटमध्ये उपस्थिती नसणं हे कोणालाच परवडणार नाही.
डिझायनर्स स्टुडिओ
टच अॅण्ड फीलला पर्याय
मॉडर्न ट्रेण्डी दागिन्यांकडे वाढता कल
हिऱ्यांना वाढता प्रतिसाद
सुहास जोशी