‘लष्कराला विशेष अधिकार देणारा कायदा’ (अफ्स्पा) मणिपूरमधून काढून घ्या आणि हा कायदाच रद्द करा, या मागणीसाठी इरोम शर्मिला गेली १२ वर्षे उपोषण करते आहे. तिची मागणी पटो वा न पटो, तिने पत्करलेला आत्मक्लेशाचा मार्ग सर्वाचाच भावनिक पाठिंबा मिळावा, असा आहे. सरकारने तिच्या नाका-तोंडात, शरीरातही सुया-नळ्या घालून तिला जिवंत ठेवले आणि कलम ३०९ खाली आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा तिच्यावर दाखल केला. शर्मिलाची जीवनकहाणी आणि संघर्षांला आजवर भरपूर प्रसिद्धी मिळालेली असली, तरी बिनायक सेनसारख्या (नक्षलवाद्यांना मदत केल्याचा आरोप असलेल्या) डॉक्टर-कार्यकर्त्यांवर पुस्तक लिहिणाऱ्या पत्रकार मिनी वैद यांनीच शर्मिलाबद्दल लिहिलेले हे छोटेखानी पुस्तक लेखिकेच्या ‘बांधिलकी’मुळे निराळे ठरते. लेखिकेची बांधिलकी उघडच असल्याने, शर्मिला आणि मणिपुरी समाज त्यांच्या समस्यांकडे ज्या नजरेने पाहतात, ती नजर वाचकांपर्यंत पोहोचविण्यात हे पुस्तक यशस्वी ठरते! एकांगी, एकारलेले अशी टीका करण्याऐवजी, शर्मिला इरोमच्या उपोषणाकडे निव्वळ टीव्हीवरील एक बातमी म्हणून पाहणाऱ्या कित्येकांना हे पुस्तक एका समस्येची अत्यंत अपरिचित बाजू (मणिपुरींची बाजू) दाखवू शकते. इथे इरोम शर्मिला ही नायिका (महानायिकाच) आणि ‘अफ्स्पा’ हा खलनायक हे ठरलेले असल्याने वाचक जणू कादंबरीसारखे हे पुस्तक वाचून संपवतो.. अखेर उमगते, ती एका राज्यातील रहिवाशांची घुसमट. पुस्तकाच्या दुसऱ्या भागात ‘बर्थ’ ही शर्मिला इरोमकृत मोठी कविता आहे. निरागस जगण्याला सरकारे काच लावतात, अशा आशयाची ही कविता शर्मिला कुठल्या प्रतिमांमध्ये एकटीच जगते आहे, हे वाचकाच्या मनाला नेऊन भिडवते! फक्त वैद यांच्या लेखनामुळे नव्हे, तर या कवितेमुळे हे पुस्तक उल्लेखनीय (आणि तथाकथित ‘चळवळ्या पुस्तकां’पेक्षा निराळेही) ठरते.
आयर्न इरोम – टू जर्निज
मिनी वैद ,राजपाल अॅण्ड सन्स
पाने : १३६, किंमत : १७५ रुपये.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Feb 2013 रोजी प्रकाशित
पेपरबॅक:समस्येची अपरिचित बाजू
‘लष्कराला विशेष अधिकार देणारा कायदा’ (अफ्स्पा) मणिपूरमधून काढून घ्या आणि हा कायदाच रद्द करा, या मागणीसाठी इरोम शर्मिला गेली १२ वर्षे उपोषण करते आहे. तिची मागणी पटो वा न पटो, तिने पत्करलेला आत्मक्लेशाचा मार्ग सर्वाचाच भावनिक पाठिंबा मिळावा, असा आहे.
First published on: 23-02-2013 at 12:25 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unknown side of problem