डॉ. अविनाश सुपे, कार्यकारी संचालक, हिंदुजा रुग्णालय
महामुंबईत संसर्ग प्रसार झपाट्याने वाढत असून दरदिवसाची रुग्णसंख्या साडेतीन हजारांवर गेली आहे. लसीकरण सुरू झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरीही लस साक्षरता न आल्याने लसीकरणाबाबत अनेक गैरसमज, शंका आहेत. यांचे निरसन करण्यासाठी खार येथील हिंदुजा रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. अविनाश सुपे यांच्याशी साधलेला हा संवाद…
* लस म्हणजे नेमके काय?
कोणत्याही लशीमध्ये विषाणूच्या कवच किंवा आतील भागातील प्रथिने शरीरात सोडली जातात आणि त्या अनुषंगाने प्रतिपिंडे तयार होतात. याच्या माध्यमातून शरीरात विषाणूविरोधात लढण्यासाठी प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि विषाणूचा संसर्ग आपल्याला होत नाही. करोनाच्या विषाणूमध्ये एकूण तीन किंवा चार प्रकारची प्रथिने असतात. यातील सर्वात वरच्या पृष्ठभागावरील स्पाईक प्रोटीन महत्त्वाचे असते. या प्रथिनांच्या माध्यमातूनच शरीरात न्यूट्रलायजिंग प्रतिपिंडे(अॅण्टीबॉडी) तयार होतात. यामुळे करोनाचा विषाणू शरीरात शिरला तरी ही प्रतिपिंडे या विषाणूची वाढ होऊ देत नाहीत. त्यामुळे संसर्ग होत नाही. लशीच्या माध्यमातून ही प्रतिपिंडे वाढण्यास मदत होते.
* लशीच्या दोन मात्रा का घ्याव्यात?
पहिली मात्रा घेतल्यानंतर १५ दिवसांत शरीरात विषाणूशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती कार्यरत होते. प्रतिपिंडे तयार होतात. १५ दिवसांत त्याचे प्रमाण हळूहळू कमी होते. बऱ्याचदा आवश्यकतेपेक्षाही प्रमाण कमी होते. यासाठी २८ दिवसांच्या कालावधीने दुसरी मात्रा घेणे गरजेचे असते. दुसऱ्या मात्रेमुळे शरीरात तयार झालेली इम्युनोलॉजिकल मेमरी पुढे बराच काळ टिकते. म्हणून याला ‘बुस्टर डोस’ असे म्हटले जाते.
* दुसरी मात्रा २८ दिवसांनी म्हणजे २९ व्या दिवशीच घेणे आवश्यक आहे का?
संशोधनामधून साधारणपणे पहिल्या मात्रेनंतर आठ ते १२ आठवड्यांच्या कालावधीत दुसरी मात्रा घेतल्यास त्याची परिणामकता अधिक असल्याचे दिसून आले आहे. परंतु आपल्या देशाने २८ दिवसांनी दुसरी मात्रा देण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार नियोजनही केले असल्याने २८ दिवसांनी पुढील काही दिवसांत दुसरी मात्रा घ्यावी. ती अगदी २९ व्या दिवशीच घ्यायला हवी असे नाही.
* लस घेतल्यानंतरही प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करणे का गरजेचे आहे.
दोन्ही मात्रा घेतल्यानंतर दहा दिवसांनी शरीरात आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात प्रतिपिंडाची निर्मिती होते आणि विषाणूशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती कायऱ्रत होते. परंतु दरम्यानच्या काळात जर बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलात तर पुरेशी प्रतिकारशक्ती तयार न झाल्याने संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे हा पूर्ण काळ संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करणे आवश्यक आहे.
* कोव्हॅक्सिन की कोव्हिशिल्ड?
सुरुवातीला कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू होत्या. परंतु आता तिचीही परिणामकता ८१ टक्के आहे असे दिसून आले आहे. तेव्हा दोन्ही लशी सुरक्षित आणि प्रभावशाली आहेत. त्यामुळे उपलब्ध असेल ती लस घ्यावी. कोव्हॅक्सिनच्या लशीमध्ये मृत स्वरूपातील विषाणूंचा वापर केलेला आहे (क्लिड व्हॅक्सिन) तर कोव्हिशिल्डमध्ये जिवंत स्वरूपातील विषाणू असून याला लाइव्ह अटिन्यूएटेड व्हेक्टरबोन असे म्हणतात. रोगप्रतिकारशक्ती खूप कमी असलेले ज्येष्ठ नागरिक, इतर आजारांनी बाधित यांनी कोव्हॅक्सिन लस घेणे फायदेशीर आहे. एकूण कोणतीही का होईना, पण लस घेणे आवश्यक आहे.
* करोनाबाधित झालेल्यांनी लस घ्यावी का?
अनेकदा लोकांमध्ये हा गैरसमज असतो की मला करोना झाला असून मी आता पूर्णपणे सुरक्षित आहे. परंतु बाधा झाल्यानंतर शरीरात तयार झालेली प्रतिपिंडे ही काही काळाने कमीकमी होतात. शरीरात इतर प्रतिपिंडे असली तरी संसर्गापासून सुरक्षा देण्यासाठी न्यूट्रलायजिंग प्रतिपिंडे आवश्यकतेपेक्षाही चार ते पाच पटीने अधिक असणे गरजेचे असते. बाधितांमध्ये प्रतिपिंडे तयार झाली तरी काही वेळेस ती आवश्यकतेपेक्षाही कमी होतात. तेव्हा अशा व्यक्तींनी किमान एक मात्रा घेतल्यास बुस्टर डोसप्रमाणे प्रतिपिंडे पुढील काही काळ टिकण्यास मदत होते. त्यामुळे फक्त प्रतिपिंडे असणे महत्त्वाचे नाही तर न्यूट्रलायजिंग प्रतिपिंडे आणि आवश्यकतेपेक्षाही अधिक प्रमाणात असणे गरजेचे आहे.
* लस घेतल्यानंतर करोना होणार नाही का?
करोनाची साथ ओसरायला २०२१ चा उत्तरार्ध किंवा २०२२ देखील उजाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जे आत्तापर्यत बाधित झाले नाहीत, ते पुढील काळात बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणतीही लस १०० टक्के परिणामकारक नसते. परंतु लस घेतल्यानंतरही जरी संसर्ग झाल्यास त्याची तीव्रता कमी असेल. त्यामुळे मृत्यूचा धोका टाळता येतो. रेनकोट किंवा छत्री घेऊन आपण पावसात जातो तेव्हा आपले संपूर्ण संरक्षण होत नाही, परंतु पूर्ण ओलेचिंब भिजत नाही. तसेच लशीचे आहे. लस घेतल्यानंतरही कदाचित बाधा होऊ शकते, पण त्यावेळी आजार तुलनेने सौम्य असेल. त्यामुळे मी आत्तापर्यत बाधित झालो नाही, लशीमुळे पूर्ण संरक्षण नाहीच अशागैरसमजांमुळे लस न घेणाऱ्यांनी आजाराची तीव्रता कमी करण्यासाठी का होईना, लस घेणे गरजेचे आहे.
* पूर्वीपासून काही आरोग्य समस्या असलेल्या ४५ वर्षांवरील व्यक्तींनी लस घेणे सुरक्षित आहे का?
लस घेतल्यानंतर मृत्यू झाल्याच्या काही घटना कानावर पडल्यामुळे भीती वाढणे साहजिक आहे. कर्करोग, उच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादी आजाराच्या ४५ वर्षांवरील रुग्णांनी ही लस नक्की घ्यावी. यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने संसर्ग झाल्यास तीव्रता अधिक असण्याचा संभव असतो. फक्त लस घेण्यापूर्वी संबंधित उपचार घेत असलेल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. तसेच हृदयविकार, किंवा अॅस्पारिन सारखी औषधे घेणाऱ्या व्यक्तींनी लस घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घेण्यापूर्वी दोन दिवस ही औषधे बंद करावीत. योग्य ती काळजी घेतल्यास लस पूर्णपणे सुरक्षित आहे.
* लसीकरणासाठी अजूनही काही वर्गांमधून फारसा प्रतिसाद मिळत नाही, यासाठी काय करता येईल?
ठाणे, कल्याण-डोंबिवली, मुंबईतील काही भागात रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. उच्चवर्गीय, मध्यमवर्गीय यांना लसीचे महत्त्व समजले असून ते लस घेण्यासाठी गर्दी करत आहे. परंतु सर्वात खालच्या वर्गात किंवा झोपडपट्टीमध्ये लस घेण्याबाबत फारसा उत्साह नाही. तेव्हा लस साक्षरता निर्माण करणे गरजेचे असून त्यासाठी स्थानिक प्रशासनाबरोबरच सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
मुलाखत: शैलजा तिवले