: सागर भागवत

मी सायकलवरून प्रयोगशाळेत चाललो आहे. ‘अल्बर्ट लुडविग्ज युनिव्हर्सिटी ऑफ फ्रायबर्ग’च्या ‘प्रोसेस टेक्नॉलॉजी’ ग्रुपमध्ये पीएचडी करायला सुरुवात केली, त्याला जेमतेम महिना होतो आहे. माझा अभ्यासविषय ‘थ्रीडी प्रिंटिंग ऑफ मायक्रोफ्लुइडिक सिस्टीम्स डिव्हाइसेस युजिंग नॅनोकम्पोझिटस्’ या विषयावर आधारित आहे. त्यात थ्रीडी प्रिंटिंग वापरून अंध व्यक्तींसाठी ‘टॅकटाईल डिव्हाइस’ (स्पर्शज्ञानाच्या साहाय्याने वापरायचं यंत्र) तयार करायचं आहे. सध्या अनेक अंध व्यक्ती ब्रेल लिपीचा वापर करतात, मात्र त्याआधारे पुरवल्या जाणाऱ्या माहितीच्या काही मर्यादा आहेत. त्याऐवजी या अ‍ॅपमध्ये त्यांना ग्राफिक्स, मॅप्स आणि बऱ्याच गोष्टी स्पर्शज्ञानानं कळू शकतील. या अभ्यासविषयाच्या निमित्ताने बरंच काही शिकायला मिळतं आहे आणि समाजोपयोगी कामात खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळते आहे. जर्मन पीएचडी अभ्यासाच्या आखणीनुसार मला कुठलेही कोर्सेस किंवा परीक्षा द्यायला लागत नाही. इथे फक्त संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. इंडक्शनच्या काळात पर्सनल, फायर आणि प्रयोगशाळेतील सुरक्षेच्या दृष्टीने प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतरच विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेत काम करता येतं. अर्थात, गेले तीन आठवडे मी माझ्या अभ्यासविषयावर काम करत होतो आणि आता हे यंत्र कोणत्या संकल्पनांच्या आधारे घडवण्यात येणार आहे, याविषयी एक प्रेझेंटेशन तयार करायचं आहे. माझ्या सीनिअर्ससोबत चर्चा केल्याने या साऱ्या प्रक्रियेविषयीची माहिती समजली असून अनेक गोष्टी शिकायला मिळत आहेत.

सायकलचे पॅडल मारतामारता गेल्या काही वर्षांचा प्रवास एखाद्या चित्रपटाची रिळं उलगडावी तसा उलगडू लागला. मी डी. जी. रुपारेल महाविद्यालयात बारावी (सायन्स) झालो. ‘पॉलिमर सायन्स’ विषय शिकायची खूप इच्छा होती. मात्र सीईटीमध्ये त्यासाठी आवश्यक गुण मिळाले नाहीत. म्हणून ‘इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’मध्ये बीटेक (फायबर्स टेक्सटाइल्स प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी) या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. शेवटच्या तीन वर्षांत वेगवेगळे स्पेशलायझेशनचे अभ्यासक्रम शिकता येतात. त्यात पॉलिमर्ससंबंधी शिकायला मिळालं. दरम्यान, अन्य विषयांतला रस वाढत गेला आणि त्यातही मटेरिअल्स विषयाची अधिक गोडी वाटू लागली. तिसऱ्या वर्षी वापीमध्ये टेक्स्टाइल क्षेत्रात इंटर्नशिप केली होती. त्या वेळी टेक्स्टाइल उद्योगामध्ये करिअर करायचं नाही. आपण संशोधन करायचं हे पक्कं झालं. जर्मनीला गेलेल्या सीनिअर्सकडून थोडी माहिती मिळाली. मग मटेरिअल्स विषयाचे इंग्रजी भाषेतले पदवीचे अभ्यासक्रम शोधू लागलो. आठ अभ्यासक्रम शॉर्टलिस्ट करून तिथे अर्ज केला. त्यापैकी दोन विद्यापीठांकडून स्वीकृती आली. एक अभ्यासक्रम पॉलिमर सायन्सचाच, तर दुसरा मटेरिअल सायन्सवर भर देणारा होता. त्यात काही विषयांचे पर्यायही देण्यात आले होते. इथे अशा बऱ्याच अभ्यासक्रमांना अर्थसाहाय्य केलं जातं. ही ऑनर्स पदवी आहे. क्रेडिट लोड इतर अभ्यासक्रमांपेक्षा अधिक असतो. त्यामुळे आमची स्काइपवर मुलाखत घेण्यात आली. केवळ विद्यार्थ्यांची उत्तरं ऐकणं नव्हे, तर तो त्या प्रश्नांना सामोरं कसा जातो आहे हेही पाहिलं गेलं. त्यामुळे मी याच एर्लागनमधल्या ‘फ्रेडरिक अलेक्झांडर युनिव्हर्सिटी ऑफ एर्लागन’मध्ये एमएस्सी(ऑनर्स)- अ‍ॅडव्हान्स्ड मटेरिअल्स अ‍ॅण्ड प्रोसेसेस या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला.

माझा आत्तेभाऊ  अमेरिकेत शिकायला गेला होता. तेव्हापासून मलाही परदेशात जाऊन शिकायचं होतं. घरच्यांना याबद्दल कल्पना होती. विशेषत: टेक्स्टाइलमधल्या इंटर्नशिपनंतर या इच्छेवर शिक्कामोर्तबच झालं. घरच्यांचा भक्कम पाठिंबा मिळाला. जर्मनीतले अर्ज इतरांच्या मानाने थोडे उशिरा मंजूर होतात. त्यांच्याकडून स्वीकृती-होकार, माझ्याकडून होकार झाल्यावर त्यांच्याकडून आधी इमिग्रेशन ऑफिसला कळवलं जाऊन एक स्वीकारपत्र मिळतं. त्यानंतर आपण इथल्या (मुंबई) कार्यालयात अर्ज करू शकतो. जर्मन दूतावासात कामकाज तुलनेनं आरामात चालतं. त्यामुळे अभ्यासक्रम सुरू व्हायच्या आधी व्हिसा मिळेल की नाही हा थोडा ताण होता. व्हिसाची प्रक्रिया व्हायला दोन महिने लागले. सप्टेंबरच्या मध्यावर असणारा एक वैकल्पिक अभ्यासक्रम हुकलाच आणि सप्टेंबरअखेरीस व्हिसा मिळाला. अभ्यासक्रम ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवडय़ात सुरू होणार होता. घरासह बाकीच्या व्यावहारिक गोष्टींची व्यवस्था नीट झाली. अ‍ॅलिस कन्सल्टण्टन्सी या मार्गदर्शक संस्थेच्या साहाय्यानं घर मिळालं. माझा रूममेट चेन्नईचा होता. शिवाय फेसबुक ग्रुपवरून काही ओळखी झाल्या होत्या. बरीच माहिती मिळाली होती. सीनिअर्सची मदतही खूप झाली.

जर्मनीत संध्याकाळी पोहोचलो. अंधार पडला होता. फॉल सीझन असला तरी आपल्यासाठी ती थंडीच होती. फक्त घराचा पत्ता सोबत होता. तिथे चालणारं सिमकार्ड नव्हतं. एअरपोर्टवरून थेट टॅक्सीनेच गेलो. आधी मी चुकून घरमालकांच्याच घरी गेलो. त्यांनी अगत्याने स्वागत केलं. राहायची सोय बेसमेंटमध्ये केली होती. थोडा स्थिरावल्यावर रूममेटच्या फोनवरून घरी खुशाली कळवली. दुसऱ्या दिवशी सिटी रजिस्ट्रेशन, बँक अकाऊं ट आदी व्यावहारिक गोष्टींची पूर्तता केली. हवामानाशी आणि जर्मन भाषा शिकून गेलो असले तरी भाषेशी जुळवून घेण्यात थोडा वेळ गेला. मी चांगला खवय्या असल्याने अनेक पदार्थाच्या चवी चाखून पाहिल्या. नवीन गोष्टींचं निरीक्षण करत होतो, शिकत होतो, मजा येत होती. मला कुकर लावणं, पोहे करणं वगैरे प्राथमिक गोष्टी येत होत्या. इथल्या सुपरमार्केटमध्ये अनेक गोष्टी मिळतात. दिवसा कॉलेजमध्ये खायचो आणि रात्री घरी जेवण करायचो.

इथले प्राध्यापक ठरावीक कालावधीत निश्चित केलेला अभ्यासक्रम शिकवतातच. नोट्स, प्रेझेंटेशन आदी गोष्टी ऑनलाइन असतात. तरीही लेक्चर ऐकणं हा वेगळा अनुभव असतो. शिकवताना प्राध्यापक अनेक उदाहरणं, अगदी स्वत:च्या संशोधनातले दाखलेही देतात. त्यामुळे माझी संशोधन करण्याची आस वाढली आणि विषयाचा अभ्यास करण्याचा दृष्टिकोनही मिळाला. पहिल्या सेमिस्टरच्या परीक्षेत इथल्या प्रश्नोत्तरांच्या पद्धती समजून घेतल्या. स्वयंअध्ययनाची संधी मिळते. ते टाळलं तर आपलंच शैक्षणिक नुकसान होतं. वर्गात हजर असण्याची सक्ती नाही. मात्र गैरहजर राहिल्यास ज्या ज्ञानार्जनासाठी आपण इथे आलो, ते मिळत नाही. केवळ नोट्स वाचून पास होऊन काही फायदा नाही. इथल्या परीक्षा खूप कठीण असतात. एकदा नापास झाल्यास पुन्हा संधी दिली जाते. तोंडी परीक्षेला खूप महत्त्व असून त्यातली काठिण्य पातळी वाढत जात आपल्या ज्ञानाची पडताळणी होते. मुख्य अभ्यासविषयांसह वेळेचं व्यवस्थापन, रिसर्च पेपर लिहिणं, पोस्टर प्रेझेंटेशन करणं आदी गोष्टी आवर्जून शिकवल्या जातात. नॅनोमटेरिअल्स, अ‍ॅडव्हान्स प्रोसेसेस, कॉम्प्युटेशनल मटेरिअल्स अ‍ॅण्ड बायोमॅट्रिकल्स अशा क्षेत्रांत स्पेशलायझेशन करता येतं. त्यापैकी मी नॅनोमटेरिअल्स अ‍ॅण्ड नॅनोप्रोसेसिंग (पॉलिमर नॅनोकॉम्पोझिट्स, ऑरगॅनिक इलेक्ट्रॉनिक मटेरिअल्स) आणि अ‍ॅडव्हान्स्ड प्रोसेस (कॅटालिसिस, थिन-फिल्म प्रोसेसिंग) यात स्पेशलायझेशन केलं.

दुसऱ्या वर्षांच्या पोस्टर प्रेझेंटेशनची गोष्ट आठवते आहे. ते ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी, त्यांचे पालक आणि प्राध्यापकांसमोर द्यायचं असतं. तेव्हा मोठा आवाका असणारा विषय आटोपशीर पद्धतीने मांडल्यानं माझं खूप कौतुक झालं होतं. त्यामुळे आत्मविश्वासाला बळकटी मिळाली. इथे थिसिसला प्राध्यापकांपेक्षा पीएचडी करणारे विद्यार्थी अधिकांशी मार्गदर्शन करतात. माझ्या थिसिसचं प्राध्यापकांनी खूप कौतुक करून मटेरिअल सायन्सशी निगडित एक पुस्तक भेट म्हणून दिलं. जणू माझ्या मेहनतीची ती पावती होती. माझा मास्टर्सचा थिसिस पॉलिमर नॅनोकॉम्पोझिट्स या अभ्यासक्षेत्रातला होता. त्यात माझा अभ्यासविषय ‘एन्हान्सिंग द थर्मल कण्डक्टिव्हिटी अ‍ॅण्ड फ्लेम रेटार्डान्सी ऑफ प्रिंटेड सर्किट बोर्ड युजिंग सिरॅमिक फिलर्स’ हा होता. इथे थिसिस लिहिणं हे एखाद्या परीक्षेसमानच आहे. कारण त्यासाठी जवळपास वर्षभर कष्ट घ्यावे लागतात. संदर्भ पुस्तकं वाचून विषय कळवणं, तो संमत किंवा असंमत होणं, त्यावर अधिक काम करणं आणि त्याचा अंतिम मसुदा तयार करणं या सगळ्या टप्प्यांवर अनेकांगी अनुभव मिळतात. गाईडकडून फार मदत न मिळता स्वयंसिद्ध होणं अपेक्षित असतं. मास्टर्स थिसिस लिहायला जवळपास अडीच ते तीन वर्ष लागतात. त्यानंतर बऱ्याच क्षेत्रांचे पर्याय उपलब्ध होतात. तीन महिन्यांची इंटर्नशिप करावी लागते. त्याचा अभ्यासात उपयोग होण्यासोबतच इथल्या कार्यसंस्कृतीची तोंडओळख होते.

अभ्यासक्रमात २० देशांमधले विद्यार्थी होते. आमच्या ग्रुपमध्ये कोलंबिया, व्हेनेझुएला, जर्मन, भारतीय, चीन, जॉर्डन या देशांतले मित्र होते. आम्ही बुडापेस्टला फिरायला गेलो होतो. आमच्या गप्पांदरम्यान एकमेकांच्या देश, संस्कृती, लोकांविषयींचे गैरसमज दूर झाले. एकदा ओळख झाली की, जर्मन लोक आपल्याला मित्रत्वाच्या नात्याने वागवतात. अगदी ख्रिसमस साजरा करायला घरी बोलावतात. इथे काम आणि व्यक्तिगत जीवनाचा समतोल राखण्याला खूप महत्त्व दिलं जातं. कामाच्या वेळेनंतर जिम, स्पोर्ट्स, फिटनेस, हेल्दी कुकिंग आदी गोष्टींसाठी वेळ दिला जातो. सायकलिंगला प्रोत्साहन दिलं जातं. या गोष्टी मीही आत्मसात करायचा प्रयत्न केला. थिसिस आणि इंटर्नशिप करायला ‘युनिव्हर्सिटी ऑफ बायरॉईथ’मध्ये आलो. इथे घर शोधायला लागल्यावर छोटंसं मुलाखतवजा संभाषण होतं आधी राहणाऱ्या रूममेटसोबत. आताच्या विद्यापीठापासून हे घर थोडं लांब आहे.

इथे वेळेच्या व्यवस्थापनाचं महत्त्व कळलं. ते केलं नाही तर जगणं कठीण होतं. गोष्टी वेळच्या वेळी करायलाच लागतात. मला त्यामुळे अभ्यास करता आला आणि फिरण्याची आवड जोपासता आली. एर्लागनमध्ये आदिदासचं मुख्यालय आहे. मला क्रीडाविषयक गोष्टींची खूप आवड असल्याने जर्मन मित्रासोबत ते बघायला गेलो होतो. तिथे नवीन वस्तू स्वस्तात मिळतात हे कळल्यावर भारतातून येणाऱ्या किंवा स्थानिक मित्रांसोबत एकदा तरी भेट देतोच. तिसऱ्या आणि चौथ्या सेमिस्टरमध्ये मी आमच्याच प्रयोगशाळेत अर्धवेळ काम केलं. त्या वर्षभरात एका पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संशोधनात साहाय्य करत होतो. त्या विषयात मलाही पीएचडी करायची होती. मात्र काम केल्याने त्या विषयाच्या मर्यादा कळल्याने पुढच्या गोष्टींचा निर्णय घेणं सोपं गेलं.

इथं भाषेला प्रचंड महत्त्व आहे. जर्मन शिकाल तेवढय़ा गोष्टी सोप्या होतील. जर्मन शिकलेले नसल्यास पुढे नोकरी शोधणं ही कठीण गोष्ट ठरते. त्यामुळेच पदवी मिळवल्यानंतर दीड वर्ष नोकरी शोधायला देतात. नोकरीसाठी अर्ज केल्यावर दोन महिन्यांनी प्रतिसाद मिळून फोनवर मुलाखत होते. त्यातून पार झाल्यावर प्रत्यक्ष भेटीचं बोलावणं येतं. तर पोर्टलवरची माहिती वाचून पीएचडीसाठी रीतसर अर्ज करावा लागतो. सोबत जोडलेल्या कागदपत्रं, शिफारशींचा संच व्यवस्थित लागतो. तो तपासल्यानंतर त्यांच्याकडून फोन इंटरव्ह्य़ू होतो. नंतर प्रत्यक्ष भेट- प्रेझेंटेशन, टास्क, प्रश्नोत्तरं आदी गोष्टी होऊन रिझल्ट येतो. आपणही होकार-नकार कळवू शकतो. या सगळ्यात सहा-आठ महिने सहज जातात. अशा मुलाखतींमधून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. पीएचडीसाठी २०-२५ ठिकाणी अर्ज केला होता. माझी पीएचडी साडेतीन वर्षांत संपेल असा अंदाज आहे. हा पदव्युत्तर अभ्यासक्रम डिसेंबरमध्ये संपला. दरम्यानच्या काळात मी काही ऑनलाइन कोर्सेस केले. पीएचडीनंतर कदाचित संशोधन किंवा स्टार्टअप सुरू करेन. काय करायचं ते अजून पक्कं ठरवलेलं नाही. बघा, प्रयोगशाळा आलीदेखील. आता आठवणींच्या राज्यातून बाहेर पडतो आणि संशोधनाला लागतो..

शब्दांकन : राधिका कुंटे viva@expressindia.com

कानमंत्र

  • ओपन माइंडेड राहिल्याने गोष्टी सुकर आणि सोप्या होतात.
  • वेळेचं व्यवस्थापन शिकून घेतल्यास करिअर आणि जीवनमानात फारच फरक पडतो.