article about sanskrit urdu and pali language zws 70 | Loksatta

भाषाप्रेम!

अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी सध्या उर्दू भाषेकडे आकृष्ट झाली असून ती शिकण्याकडे त्यांचा कल वाढतो आहे.

भाषाप्रेम!
(संग्रहित छायाचित्र)

श्रुती कदम, रुजुता दातार

भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे. आपल्या देशात अनेक भाषा बोलल्या जातात. भाषा हे केवळ अभिव्यक्तीचे साधन नसून ते मनुष्याच्या सामाजिक ओळखीचे एक महत्त्वाचे माध्यम असते. मनुष्य हा जन्माला आल्यापासून मातृभाषा बोलायला शिकतो. शाळेत आणि महाविद्यालयात गेल्यावर तो हिंदी, इंग्रजी अशा भाषा बोलू लागतो. या तीन भाषांचे शिक्षण तर त्याला मिळतेच, पण त्यापलीकडे स्वरुचीसाठी म्हणूनही आपण अनेक नवीन भाषा शिकत असतो. जिथे अनेक विद्यार्थी परदेशी भाषा शिकण्याकडे भर देतात. तिथे काही विद्यार्थी असे आहेत ते भारतीय जुन्या पण काळानुरूप कमी होत चाललेल्या भाषा शिकण्यात रस घेत आहेत. आणि या प्राचीन भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडाही लक्षणीय आहे. यामध्ये संस्कृत, उर्दू आणि पाली या तीन भाषांचा मुख्य सामावेश होतो. भारतीय संस्कृतीतील या तीन भाषांबद्दल तरुण पिढीमध्ये मोठय़ा प्रमाणावर आकर्षण आहे. त्यामुळे हल्ली संस्कृत भाषेतील नाटकं, उर्दू भाषेतील मुशायरे आणि पाली भाषेतील कथाकथन अशा विविध कार्यक्रमांना प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. 

साहित्यिकांची आवडती भाषा असा ज्या भाषेचा उल्लेख केला जातो ती भाषा म्हणजे उर्दू. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या भाषेत अनेक साहित्यिकांनी अजरामर असे साहित्य लिहिले आहे. उर्दू भाषेचा उल्लेख केल्यावर अनेक प्रसिद्ध साहित्यिकांची नावं नजरेसमोर येतात त्यातील पहिलं नाव म्हणजे मिर्झा गालिब. मिर्झा गालिब यांनी खऱ्या अर्थाने उर्दू भाषेला आपल्या साहित्याने ओळख मिळवून दिली. उर्दू भाषेतील साहित्य आणि भाषेचा गोडवा देशभरातील लोकांमध्ये पोहोचावा, यासाठी दिल्लीमध्ये दरवर्षी ‘जश्न ए रेख्ता’ हा तीन दिवसांचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमात अनेक साहित्यिक, कलाकार, गीतकार, संगीतकार विविध कार्यक्रम सादर करतात. उर्दू शेरोशायरी, कव्वाली, गझल असे अनेक प्रकार या वेळी सादर केले जातात. दरवर्षी हजारोंच्या संख्येने लोक या कार्यक्रमात सहभागी होतात. ‘जश्न ए रेख्ता’प्रमाणेच महाराष्ट्रात ‘सुखन’ हा उर्दू मुशायरीचा कार्यक्रम लोकप्रिय आहे. यामध्ये अभिनेता ओम भुतकर आणि त्याचे सहकारी दीमक आणि एका वाचकाची कथा सांगत कार्यक्रमात उर्दू शेर, शायरी, कव्वाली, गझलांच्या माध्यमातून रंग भरतात. या कार्यक्रमांमुळे तरुणाईमध्ये उर्दूचे आकर्षण वाढत चालले आहे. अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी सध्या उर्दू भाषेकडे आकृष्ट झाली असून ती शिकण्याकडे त्यांचा कल वाढतो आहे.

‘‘याआधी आमचे आई-वडील उर्दू मुशायऱ्यांच्या कार्यक्रमाला जायचे. त्या वेळी त्यांनाच ती भाषा समजते असं वाटायचं, पण मी पहिल्यांदा जेव्हा ‘सुखन’ पाहायला गेले तेव्हा मला समजलं ही भाषा किती सुंदर आहे. त्यातील शब्दसंपदाही ओघवती आणि कानाला गोड वाटणारी आहे. त्यामुळे मीही आता उर्दू शिकते. खूप मज्जा येते आणि खूप काही वाचायला मिळते आहे’’, असे उर्दू भाषेचा अभ्यास करणारी नंदिनी कांबळी ही विद्यार्थिनी सांगते. टीव्हीवर उर्दू कार्यक्रम दाखवतात तेव्हा त्यातले शब्द नीट समजत नाहीत, प्रत्यक्षात शिकताना खूप काही या भाषेबद्दल समजलं आहे. एक उदाहरण म्हणजे सूर्याला उर्दूत आफताब आणि चंद्राला महताब म्हणतात. हे साधे साधे पण सुंदर शब्द आम्हला कधी माहितीच नव्हते, असंही ती सांगते. या भाषेची चाहती असलेल्या सुनीता राऊतच्या मते तरुण पिढी सध्या असे उर्दू भाषेतील कार्यक्रम पाहायला मोठय़ा संख्येने हजरी लावते आहे. त्यांचा या भाषेतील कार्यक्रमांमधील सहभाग वाढला तर ही भाषा नक्कीच लोप पावणार नाही, असा विश्वास सुनीता व्यक्त करते.

संस्कृत आणि उर्दू भाषेप्रमाणे पाली भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही गेल्या काही वर्षांत वाढले आहे. बौद्ध धर्माचे सखोल ज्ञान प्राप्त करण्यासाठी अनेक विद्यार्थी पाली भाषा शिकताना दिसतात. इसवी सन पूर्वमध्ये प्रसिद्ध असलेल्या या भाषेचा वापर खरंतर आपल्या देशातही काळानुसार कमी होऊ लागला आहे. त्यामुळे अनेक लोकांच्या मनात या भाषेविषयी प्रश्न निर्माण झाले आहेत. पाली भाषेतून तथागत गौतम बुद्धांनी धम्माचा उपदेश केला असून भगवान बुद्धांच्या सम्यक दृष्टीचा मार्ग पाली साहित्यातून आला असल्याचे मानले जाते. बुद्धिस्ट तत्त्वज्ञान, शैक्षणिक – वैचारिक स्वारस्य, भारतीय नागरी सेवा परीक्षेत त्यामुळे सहज शक्य असणारे यश, अशा अनेक कारणांमुळे प्राचीन भाषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाली भाषेकडे वळणाऱ्यांची संख्या पुन्हा झपाटयमने वाढू लागली आहे. भारतात बौद्ध देशातील परदेशी विद्यार्थीच ही भाषा शिकत असल्याचे दिसून येत होते, परंतु पुन्हा विद्यार्थी पाली भाषेकडे वळणाऱ्यांची संख्या वाढण्यामागे बुद्धिस्ट कम्युनिटीमध्ये आलेली जागरूकता, इतिहास जाणून घेण्याची इच्छा अशी अनेक कारणे असल्याचे मानले जाते. पाली भाषेचा अभ्यास करणारा विश्वा जाधव सांगतो, ‘मी बुद्ध आणि बौद्ध धर्माविषयी शिकतो आहे. गौतम बुद्धांविषयी शिकताना आम्हाला सतत भाषांतराचा आधार घ्यावा लागायचा, त्यामुळे आम्ही पाली भाषा शिकण्याचा निर्णय घेतला. समजायला थोडी कठीण आहे ही भाषा, पण या भाषेतील ज्ञान अफाट आहे. या ज्ञानाचा आम्हाला आमच्या आयुष्यातदेखील उपयोग होत असल्याने पाली भाषा शिकण्यात अधिकच गोडी वाटू लागली आहे’. 

तर बौद्ध साहित्याचा अभ्यास करणारा सोहम धुमाळ म्हणतो, ‘‘मला इतिहास हा विषय आवडतो, त्यातही अभ्यासासाठी मी बुद्ध हा विषय निवडला. जेव्हा मी अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा डॉ. आंबेडकर यांच्याशिवाय अन्य कोणी काही खास बुद्धांविषयी लिहिलेले नाही हे प्रकर्षांने जाणवले. म्हणून मी पाली शिकण्याचा निर्णय घेतला’’. पाली भाषा खूप चित्तवेधक असून पुढे जाऊन पाली भाषेतील साहित्य मराठी भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही सोहमने सांगितले. 

उर्दू, पाली भाषेप्रमाणेच संस्कृत भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही सातत्याने वाढतेच आहे. भारतीयांची प्राचीनतम भाषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्कृत भाषेत वाङ्मय, रामायण, महाभारत, विविध शास्त्रीय ग्रंथ, काव्य, नाटके, कथा इत्यादी विपुल साहित्यनिर्मिती झालेली आहे. साहित्याचा हा ठेवा खुला व्हावा म्हणून अनेक विद्यार्थी या भाषेचा अभ्यास करताना दिसतात. सध्या शालेय स्तरावरही संस्कृत शिकवली जात असल्याने मुलांवर या भाषेचे संस्कार आधीपासून झालेले असतात. इतर भाषेतील साहित्यापेक्षा संस्कृत ही भाषा आणि या भाषेतील साहित्य समृद्ध असल्याने विद्यार्थ्यांना या भाषेविषयी कुतूहल निर्माण होते. अनेक विद्यार्थ्यांना संस्कृतचे प्राचार्य व्हायचे असते म्हणून ते संस्कृत शिकतात. काहींना पुरातत्त्वशास्त्र शिकण्यात गोडी असते. हे शिकताना संस्कृत भाषेत असलेले पुरातन शिलालेख, साहित्य समजून घेण्यासाठी संस्कृत येणे गरजेचे ठरते.  परदेशातही संस्कृत भाषेचा अभ्यास अनेक विद्यापीठांतून केला जातो. भारतापेक्षा जर्मनीमध्ये संस्कृत शिकण्याचे प्रमाण अधिक आहे. परदेशात काही वैद्यकीय वा अन्य अभ्यासक्रम संस्कृतमधून शिकवले जातात, त्यामुळे संस्कृत भाषा शिकण्याचे प्रमाण वाढते आहे. तर दुसरीकडे पौराणिक मालिका-चित्रपटांची निर्मिती, पुस्तके-कादंबरी लेखनासाठीही संस्कृत भाषेचा अभ्यास-संशोधन महत्त्वाचे ठरू लागले आहे. मुंबईत वझे केळकर महाविद्यालयात दरवर्षी ध्रुवा संस्कृत महोत्सव साजरा केला जातो. अन्य महाविद्यालयांतही संस्कृत महोत्सव खूप लोकप्रिय आहेत.

या विविध भाषांच्या अभ्यासामुळे उपलब्ध होत चाललेल्या संधी आणि भाषेविषयीची गोडी या दोन्ही गोष्टींमुळे विद्यार्थ्यांमधील प्राचीन भाषेचे प्रेम वाढत चालले आहे. जुने ते सोने हे भाषांच्या बाबीतीत अधिक सार्थ ठरते आहे आणि खऱ्या अर्थाने या भाषा ‘तरुण’ होत आहेत.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा ( Viva ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 03:41 IST
Next Story
मन:स्पंदने : दास्तान-ए- शोक