सौरभ करंदीकर

आज आपली ऊर्जेची गरज आपण बहुतांश कोळसा आणि पेट्रोलियम पदार्थांवर भागवत आहोत. पृथ्वीच्या पोटातला कोळशाचा आणि पेट्रोलियम पदार्थांचा साठा कधीतरी संपणार याची जाणीव सर्वांना आहे, तरीही काही छुप्या, तर काही उघड राजकीय आणि आर्थिक कारणांमुळे आपण ऊर्जेचे इतर स्रोत शोधण्याचा म्हणावा तास पाठपुरावा केलेला नाही.

शाळेत केमिस्ट्रीच्या (ज्याला पूर्वी रसायनशास्त्र म्हणत) लॅबमध्ये सर्वात आनंददायक क्षण म्हणजे हायड्रोजनचा स्फोट! झिंकवर सल्फ्युरिक अ‍ॅसिड ओतून तयार झालेला वायू हवेतल्या ऑक्सिजनच्या संपर्कात आला की छोटासा स्फोट होत असे आणि आम्ही मुलं टाळ्या वाजवत असू. मात्र शिक्षक डोळे वटारत. जणू विज्ञानाच्या अभ्यासात मजेला आणि बालसुलभ आनंदाला स्थान नव्हतं!  त्याकाळी हायड्रोजन हवेपेक्षा हलका असतो, ज्वालाग्राही असतो, एवढं सोडलं तर त्याबद्दल फारशी आपुलकी विद्यार्थ्यांंना कधी वाटली नाही. गॅसचे फुगे हायड्रोजनचे असतात ही एक चुकीची माहिती दिली जात असे (अनेकदा अशा फुग्यांमध्ये ज्वालाग्राही हायड्रोजनपेक्षा निष्क्रिय हीलियम वायू वापरला जातो). गेला बाजार हायड्रोजन बॉम्ब किंवा हिंडेनबर्ग नावाच्या प्रवासी फुग्याला (झेपलिनला) झालेला अपघात, या ऐतिहासिक गोष्टी हायड्रोजनची आठवण करून देत. (इच्छुकांनी या गोष्टी जरूर गूगलाव्यात).

आज आपली ऊर्जेची गरज आपण बहुतांश कोळसा आणि पेट्रोलियम पदार्थांवर भागवत आहोत. पृथ्वीच्या पोटातला कोळशाचा आणि पेट्रोलियम पदार्थांचा साठा कधीतरी संपणार याची जाणीव सर्वांना आहे, तरीही काही छुप्या, तर काही उघड राजकीय आणि आर्थिक कारणांमुळे आपण ऊर्जेचे इतर स्रोत शोधण्याचा म्हणावा तास पाठपुरावा केलेला नाही. अणुऊर्जा हा पर्याय तसा जोखमीचा आणि पर्यावरणावर दूरगामी परिणाम करणारा आहे. (आण्विक कचऱ्याची वासलात लावणं तसं कठीणच असतं). आज मानवाची मदार सौरऊर्जा, पवनचक्कय़ा आणि समुद्राच्या लाटांमुळे तयार होणारी ऊर्जा, इत्यादी पर्यावरणाला अजिबात धोकादायक नसलेल्या पर्यायांवर आहे. हे सारे पर्याय खर्चीक आणि त्यातून तयार होणाऱ्या ऊर्जेचे प्रमाण तितकंसं नसल्याने इतकी वर्ष दुर्लक्षिले गेले, मात्र पर्यावरणवाद्यांच्या प्रयत्नांमुळे आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आता ते अमलात आणले जात आहेत. आता हे पर्याय तसे खर्चीकही राहिलेले नाहीत.

ऊर्जेच्या पर्यायांमध्ये हायड्रोजन या वायूकडे आपलं लक्ष गेलं नसतं, तरच नवल. एक किलो हायड्रोजन एक किलो पेट्रोल किंवा डिझेलच्या तुलनेत तिप्पट ऊर्जा मिळवून देतो. कल्पना करा की आपल्या गाडय़ा, बस, विमानं आणि रेल्वे हायड्रोजनवर चालत आहेत, तेही एक तृतीयांश इंधनावर ! आणि ती वाहनं कुठल्याही प्रकारचं प्रदूषण घडवत नाहीयेत ! याशिवाय हायड्रोजनवर चालणारी यंत्रं, कारखाने, कार्बन प्रदूषण घडवत नाहीयेत! मग यापूर्वी आपण हायड्रोजनला आपलंसं का केलं नाही?, याचं खरं कारण आर्थिक आहे.

आजपर्यंत हायड्रोजन निर्माण करण्यासाठी नैसर्गिक गॅस आणि वाफ यांना उच्च तापमानाला एकत्र आणलं जात असे. ही प्रक्रिया खर्चिक आणि त्रासाची होती. आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या कार्बनचं प्रमाण पर्यावरणासाठी घातक होतं. याउलट ‘इलेक्ट्रोलायसिस’ — म्हणजेच पाण्याचं विजेच्या साहाय्याने विघटन करून हायड्रोजन मिळवणं — जास्त सुकर. परंतु त्यासाठी लागणारी विद्युत ऊर्जा जर पारंपरिक पद्धतीने निर्माण होत असेल तर त्यात फायदा तो काय? या दोन्ही कारणांमुळे हायड्रोजन हा पर्याय काहीसा मागे पडला होता. परंतु आज सौर ऊर्जा आणि पवन—ऊर्जा यासारखे वीज निर्माण करणारे, तरी पर्यावरणासाठी निर्धोक उपाय अधिकाधिक स्वस्त होऊ लागले आहेत. त्यामुळे हायड्रोजनबद्दल पुन्हा एकदा नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

असा ‘ग्रीन’ हायड्रोजन (ग्रीन म्हणजे पर्यावरणास धोका नसलेला) आज नैसर्गिक वायूपासून तयार होणाऱ्या हायड्रोजनपेक्षा तीनपट महाग आहे. (परंतु १० वर्षांंपूर्वीच्या तो सहापट महाग होता). पवनऊर्जा आणि सौरऊर्जा जितकी स्वस्त आहे तितकाच हायड्रोजनदेखील स्वस्त होईलच, मात्र त्याला अजून काही र्वष जावी लागतील. याशिवाय कार्बन शोषण करण्याचं तंत्र देखील विकसित होतं आहे, त्यामुळे नैसर्गिक वायूपासून तयार होणाऱ्या हायड्रोजनकडेसुद्धा निर्मितीचा पर्याय म्हणून पाहणं शक्य होईल.

आंतरराष्ट्रीय ऊर्जा समितीच्या मते २०५० साल उजाडेपर्यंत आपल्या गरजेपैकी १०% ऊर्जा हायड्रोजन पुरवेल. युरोपातील थायसेनक्रुप आणि सिमेन्ससारख्या अनेक खाजगी संस्था हायड्रोजन निर्मितीचं तंत्रज्ञान विकसित करत आहेत. जर्मनीमध्ये काही ठिकाणी ‘हायड्रोजन वॅली’ या नावाने ओळखले जाणारे भव्य इलेक्ट्रोलायसिस प्लांट निर्माण होत आहेत. नेदरलँड, इटली, स्पेन, फ्रान्स इंग्लंड इतकंच नाही तर ऑस्ट्रेलिया, जपान आणि चीन हे देश देखील हायड्रोजन निर्मिती करू पाहत आहेत. या साऱ्या प्रयत्नातून निर्माण होणारा हायड्रोजन महाग असेल, पण २०५० पर्यंत तो आपल्या आवाक्यात येईल असं काही तज्ज्ञांचं मत आहे. हायड्रोजनचं ज्वालाग्राही असणं, निर्माण झालेला हायड्रोजन ग्राहकांपर्यंत नेणं, या गोष्टी जिकिरीच्या आहेतच आणि त्या तशाच राहतील, परंतु सुरक्षा—तंत्रज्ञान देखील अधिकाधिक विकसित होत आहे.

पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि हायड्रोजन असे पंपांचे चार पर्याय आपल्यासमोर एक दिवस असतील. कदाचित भविष्यात आपल्या गाडीची टाकी उघडली, पाण्याची बाटली त्यात रिकामी केली, गाडीतच ठेवलेलं छोटेखानी इलेक्ट्रोलायसिस प्लांट सुरू केलं आणि गाडी सुरू झाली, अशीही कल्पना करायला हरकत नाही!

viva@expressindia.com