मितेश रविश जोशी

डिसेंबर महिना हा सेलिब्रेशनचा महिना म्हणून अधिक लोकप्रिय आहे. याच महिन्यात कॉलेजमध्ये फेस्टिव्हलचे वारे वाहू लागतात आणि याच महिन्यात येणाऱ्या नाताळ सणाच्या सुट्टीच्या निमित्ताने अनेक तरुण तुर्क  भटकंती करायला बाहेर पडतात. नाताळ हा सण जरी ख्रिश्चन बांधवांचा असला तरीही त्यांच्या परंपरेची आणि खानपानाची मोहिनी सर्वत्र आहे. आपल्या महाराष्ट्रातच खाद्यपदार्थाचं इतकं वैविध्य आहे की विचारायला नको. नाताळ हा सणसुद्धा वेगवेगळ्या देशात फार वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. नाताळ सणातला पारंपरिक गोडवा थेट ख्रिस्ती बांधवांकडून जाणून घेण्याचा हा प्रयत्न..

मुंबईमध्ये वसईतला नाताळ हा आकर्षणाचा केंद्रबिंदू. इथलाच रोमन कॅथलिक असणारा पीयूष जोसेफ डिकोस्टा हा तरुण सांगतो, आमच्या इतिहासानुसार वसईत पोर्तुगीज येण्याअगोदर आम्ही ब्राह्मण होतो. जसे पोर्तुगीज आले आणि त्यांचा अंमल सुरू झाला त्यानंतर आम्ही रोमन कॅथलिक म्हणून ओळखले जाऊ  लागलो. ज्याप्रमाणे नवरात्र सरते आणि दिवाळीची लगबग चालू होते तशीच आमची नोव्हेंबर सरला की धांदल सुरू होते. दिवाळीत जसा फराळ बनवला जातो तसाच सेम टू सेम फराळ आम्ही डिसेंबर महिन्यात बनवतो. २४ डिसेंबरच्या रात्री आमची तरुण तुर्काची मास पार्टी असते. २५ डिसेंबरपासून घरातलं वातावरणच बदलून जातं. पुढील तीन दिवस एक वेगळाच माहोल असतो. पारंपरिक वाइन के क आणि बटर केकची लज्जत घरोघरी असते. ज्याप्रमाणे दिवाळीत किल्ला बनवला जातो, तसाच नाताळच्या मस्त गुलाबी थंडीत घराबाहेर ‘नाताळ गोठे’ तयार केले जातात. वसईचा सण बघण्यासाठी माझे इतर मित्र आवर्जून येतात, असं तो सांगतो.

वसईत राहणारी मेरी पिंटो ही तरुणी सांगते, वसई हा परिसर मुखत्वे तीन भागांत वसलेला आहे. सागरी, डोंगरी आणि जंगली. यातील सागरी भागात सर्व कॅथलिक आणि ईस्ट इंडियन समाज राहतो. वसईचा कॅथलिक समाज मोठय़ा प्रमाणात कुपारी आणि वाडवळ या दोन समाजांत विभागलेला आहे. आमच्या जेवणावर स्थानिक गोष्टींचा प्रभाव मोठय़ा प्रमाणावर आहे. नाताळ या सणाची मी चातक पक्ष्यासारखी वाट बघत असते ते ‘जुजुब’साठी. ‘जुजब’ हा प्रकार वसईत बऱ्याच वर्षांपासून बनवला जातो. हा पदार्थ पपईचा रस काढून आटवून साखरेचा पाक एकत्र करून बनवला जातो. पुन्हा वरून त्यावर साखर भुरभुरली जाते. या कँडीज चर्चच्या बाहेर विकायला असतात. आमच्याकडे पारंपरिक ख्रिसमस कलकलची रेलचेल अधिक असते. ‘कलकल’ म्हणजे एक प्रकारचे शंकरपाळेच असतात. ज्याप्रमाणे मैद्याचे शंकरपाळे तळून काढतात तसेच कलकलही तयार केले जातात फक्त त्यांना तळून साखरेच्या पाकात मुरवले की झालं ख्रिसमस कलकल. एवढाच काय तो शंकरपाळे व कलकलमधला फरक!

गोवन कॅथलिक असलेली गायत्री बोरकर गोव्यात ‘विंदालो’ नावाचा पारंपरिक पदार्थ घरोघरी चाखायला मिळतो असं सांगते. गायत्री सांगते, ‘नाताळात थंडीची लाट असल्याने हा विंदालो फ्रिजशिवाय १५ दिवस बाहेर चांगला राहतो. माझ्या आजीच्या बालपणी हा पदार्थ बकरीच्या मांसापासून बनवण्यात येत होता आता हा कोंबडी आणि डुकरापासून बनवण्यात येतो. डुकराचे किंवा कोंबडीचे मांस स्वच्छ धुवून त्याच्या बारीक फोडी करून त्याला मीठ, तिखट, धणे-जिरे पावडर लावून काही तास ठेवले जाते. नंतर तेल, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट टाकून सर्व मांस साधारण एक तास पाण्याचा अंशही न घेता शिजवतात आणि व्हिनेगर घालून फस्त करतात, असं ती सांगते.

मुंबईत वाढलेली डॉलसी म्हस्के सांगते, पारंपरिक ‘मॅझिपॅन’ हा पदार्थ जिव्हातृप्ती देणारा आहेच पण तो हेल्दीही आहे. बदाम किंवा काजूने तयार होणाऱ्या मॅझिपॅनला गुलकंदामुळे एक वेगळाच गुलाबाचा सुगंध येतो. आमच्या घरी डोनट्सपासून पारंपरिक नानकटाइपर्यंत सगळे पदार्थ तयार केले जातात. नाताळात मौजमजेसह लज्जतदार खवय्येगिरी असते. सकाळच्या चहासोबत लागणाऱ्या पदार्थापासून ते रात्री जेवणानंतरच्या मुखवासापर्यंतची खवय्येगिरी असते. चहासोबत एक पारंपरिक फुगे नावाचा पदार्थ आमच्या घरी केला जातो. हा एक प्रकारचा वडाच असतो. जो चॉकलेट सॉससोबतदेखील खाल्ला जातो. पारंपरिक मराठी करंजीची ख्रिश्चन बहीण म्हणजे ‘हिंगोळे’ अशी आपण हिंगोळ्यांची  ओळख करून घेऊ  शकतो. हिंगोळ्यांचा घाट हा मुद्दाम सुट्टीच्या दिवशी घातला जातो. घरातील सगळ्यांची मदत हिंगोळे बनवायला लागते. बऱ्याच ठिकाणी करंजीचं सारण खोबऱ्याचं असतं पण आपण मालवण, सिंधुदुर्ग भागात गेलो तर तिथे करंजीचं सारण हे चण्याच्या डाळीचं असत. आम्हीदेखील चण्याच्या डाळीचंच सारण वापरून हिंगोळे बनवतो, असं डॉली सांगते.

नाताळ सणातल्या खाद्यपदार्थाचा गोडवा सर्वाना अनुभवता यावा म्हणून ‘ब्राऊनी पॉइंट इंडिया’चे सर्वेसर्वा शेफ मनीष खन्ना यांनी त्यांच्या पोतडीतल्या पारंपरिक तर काही हेल्दी ख्रिसमस रेसिपी खास ‘व्हिवा’च्या वाचकांसाठी शेअर केल्या आहेत.

हॅझेलनट ब्राऊनी

साहित्य – ११५ ग्रॅम बटर, २३० ग्रॅम डार्क चॉकलेट, २ अंडी, १२० ग्रॅम साखर, ८० ग्रॅम मैदा, एक टी स्पून बेकिंग पावडर, ५० ग्रॅम हॅझेलनटचे तुकडे.

कृती – १८० डिग्री सेल्सिअसपर्यंत ओव्हन गरम करून घ्या. एका काचेच्या भांडय़ात चॉकलेट आणि बटर घेऊन मायक्रोवेव्हमध्ये वितळवण्यासाठी ठेवा. वितळलेले मिश्रण एकजीव होईपर्यंत ढवळत राहा. अंडी आणि साखर एकजीव करून घ्या. त्यात बटरमिश्रित चॉकलेट घालून पुन्हा एकजीव करून घ्या. मैदा आणि बेकिंग पावडर चाळून वरील मिश्रणात हळूहळू भिजवा. त्यात हॅझेलनटचे तुकडे टाकावेत. वरील मिश्रणाला ८ x ८ च्या चौकोनी ग्रीसिंग केलेल्या टीनमध्ये घालून २५ ते ३० मिनिटं गरम केलेल्या ओव्हनमध्ये बेक करून घ्या. नंतर त्यात टूथपिक टाकून व्यवस्थित बेक झाला आहे की नाही याची खात्री करून घ्या. ओव्हनमधून बाहेर काढून ब्राऊनी थंड करण्यासाठी ठेवा. त्याचे चौकोनी तुकडे करून सव्‍‌र्ह करा. हवाबंद डब्यात आठ दिवस ब्राऊनी फ्रिजमध्ये राहू शकते. तुम्ही ब्राऊनीवरती चॉकलेट सॉस टाकून सव्‍‌र्ह करू शकता.

हेल्दी डेट अ‍ॅण्ड वॉलनट केक 

साहित्य – २२ ते २५ सीडलेस खजूर, ३७५ मिली दूध, १२५ ग्रॅम गव्हाचे पीठ, १२५ मिली तेल, १ टीस्पून बेकिंग सोडा, आर्धा टीस्पून बेकिंग पावडर, ६५ ग्रॅम अक्रोड.

कृती –  दूध गरम करून घ्या. नंतर त्यात २० खजूर भिजवून ठेवा, मऊ  झाल्यानंतर त्याची मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्या. ही पेस्ट एका भांडय़ात काढून त्यात तेल घालून मिश्रण एकजीव करा. ओव्हन १७० डिग्री सेल्सियसला गरम करून घ्या. एका भांडय़ात मैदा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा चाळून घ्या. लोफ टिनला ग्रीसिंग करून घ्या. मैद्याचे आणि खजुराचे मिश्रण एकत्र करा. अक्रोड आणि खजुरचे तुकडे करून बॅटरमध्ये टाका. सर्व मिश्रण ग्रीस केलेल्या लोफ टिनमध्ये टाकून ३० ते ३५ मिनिटं गरम ओव्हनमध्ये बेक करण्यासाठी ठेवा. केक तयार झाल्यावर टी केक लोफ टिनमधून काढून थंड करण्यासाठी ठेवा. हा बिनसाखरेचा केक आहे.

ख्रिसमस कलकल

साहित्य – १ किलो मैदा, दीड कप घट्ट नारळाचं दूध, एक वाटी साखर, अर्धा कप लोणी, एक चमचा मीठ, अर्धा चमचा बेकिंग पावडर, एक अंडं.

कृती :- एका भांडय़ामध्ये मैदा वगळता वरील सर्व जिन्नस एकत्र करून फेटून घ्या. मग त्यात हळूहळू मैदा मिसळून घ्या. एक प्रकारे त्याची घट्ट कणिक मळा. त्या मळलेल्या कणकेवर ओला कपडा ठेवून ते मिश्रण काही तास बाजूला ठेवा. एका बाजूला वेलची पूडयुक्त साखरेचा पाक तयार करा. पीठ फुलल्यावर फोर्कच्या साहाय्याने त्याला शंकरपाळ्यांचा आकार दय़ा. अनेक ख्रिस्ती बांधव याला किडय़ासारखा आकारदेखील देतात. म्हणूनच याला ‘किडी’ हे नावदेखील प्रचलित असावे. तयार काप गरम तेलात डीप फ्राय करा. थोडे गार झाल्यावर वेलची पूड घातलेल्या साखरेच्या पाकात काप मुरू द्या.