विनय नारकर
महाराष्ट्रात लोकसंगीताची परंपरा काही शतकांची आहे. लावणीची परंपरा मात्र अठराव्या शतकात उदयास येऊन बहरल्याचे दिसते. असे असले तरी लावणी ही गौळणी, विराण्या, भारुडे, पदे आदी काव्यप्रकार व लोकसंगीत यांच्या दीर्घ परंपरेतूनच निर्माण झाल्याचे दिसून येते.
शाहिरी काव्याचा आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचा खूप जवळचा संबंध आहे. स्वराज्य स्थापनेचा काळ हा अतिशय संघर्षांचा आणि धामधुमीचा होता. या काळात मराठय़ांच्या शौर्याने दिपून गेलेले शाहीर त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे गाऊ लागले. या काळानंतर शाहू छत्रपती झाले. मोघलांच्या दरबारात अठरा वर्षे राहून त्यांनी तिथले वैभव व विलासी जीवन पाहिले होते. महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांना इथे या सगळ्या उणिवांची जाणीव झाली. शाहू महाराजांनी मग राजवाडे, राजधानी, बागबगिचे व जीवनशैली शृंगारण्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. गायन-नृत्यादी कलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. राज्याबाहेरून कलाकार आणणे व इथेच लहानपणापासून कलाकार तयार करणे याकडेही शाहू महाराजांनी लक्ष दिले.
पेशव्यांच्या नेतृत्वाने मराठेशाहीचा आणखी उत्कर्ष झाला. नानासाहेब पेशवे हे उत्तम राज्यकर्ते व रसिकही होते. पेशवाईत जसजशी सुबत्ता येत गेली तसतशी पेशव्यांनी राहणीमान, वाडे, मंदिरं, विविध कला, सणवार, उत्सव, खाद्यपदार्थ, दागिने, वस्त्रं यांचा दर्जा उंचावण्याकडे जातीने लक्ष दिले. मराठी संस्कृती फुलून आली. खडतर प्रयत्नांनी मिळालेले स्वराज्य आणि संपत्ती यांचा उपभोग कसा घ्यायचा, हे शोधण्याचा हा काळ. पेशवे व इतर सरदार यांनी अशा प्रकारे जीवनशैलीचा उत्कर्ष घडवून आणला. याचा परमावधी उत्तर पेशवाईत सवाई माधवराव व नाना फडणवीसांच्या काळात झाला.
या विलासी वातावरणात शाहिरांना राजाश्रय व लोकाश्रय दोन्ही लाभला. शाहिरांनी मग मराठय़ांच्या शौर्याचे पोवाडे व विलासी आयुष्याचे गोडवे गाणाऱ्या लावण्या गायला सुरुवात केली. यामुळे पेशवे व सरदार-दरकदार यांचे राजसी जीवन, त्यांचा विलास, त्यांच्या स्त्रिया, अभिसारिका हे विषय लावण्यांमध्ये बऱ्याचदा येऊ लागले. याशिवाय शाहिरांनी प्रामुख्याने लावणीचे विषय बहुजन समाजाला आवडतील असे निवडले. त्यामध्ये बऱ्याचदा त्यांच्या स्वत:च्या जीवनातील विषयही असायचे. लावण्यांमध्ये दिसणारा समाज हा मुख्यत: शहरात राहणारा आहे. काही तीर्थक्षेत्रे आणि त्या अनुषंगाने तिथले विषय हेही लावण्यांमधून दिसत राहतात. शृंगार हा जरी लावणीमधला महत्त्वाचा रस असला तरीही आध्यात्मिक व पौराणिक विषय असलेल्या लावण्याही लिहल्या गेल्या व लोकप्रियही झाल्या.
लावण्यांच्या रचना शाहिरांनी मुलूखगिरीने दमलेल्या, संसाराच्या तोचतोपणाला कंटाळलेल्या सामान्यजनांच्या जीवनांत रंग भरण्यासाठी केल्या. यात लोकरंजन हा महत्त्वाचा उद्देश होता. बव्हंशी लौकिक विषय असलेल्या या लावण्यांमध्ये तत्कालीन समाजजीवनाचे प्रतिबिंब पडले आहे. अशा संपन्न आणि विलासी जगण्यामध्ये अनेक प्रकारच्या वस्त्रांचा, वेशभूषेचा आणि दागदागिन्यांचा महत्त्वाचा सहभाग असणे साहजिकच आहे. त्या वेळच्या वस्त्रपरंपरा, वेशभूषा, दागिने, वस्त्रबोली हे सगळं लावणीने सुरेखपणे टिपून घेतलं आहे. नुसतं टिपलंच नाही तर साजरेपणानं मांडलंसुद्धा आहे. या लावण्यांमधून फक्त वस्त्र प्रकारांचंच नाही तर वस्त्राच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या म्हणी व वाक्प्रचार यांचेही दस्तऐवजीकरण झालं आहे. शिवाय, त्यातल्या काव्याला एक अस्सलपणाही आला आहे.
हे लावण्याचं लेणं या लावणीने अस्सल मऱ्हाटी भाषेतनं उलगडल्यामुळे फारच देखणं झालंय. त्या वेळच्या शाहिरांनी त्यांच्या त्यांच्या शैलीत ही वस्त्रबोली मांडली आहे. बऱ्याचशा लावण्या शृंगारप्रधान असल्याने वस्त्रप्रावरणांचे उल्लेख व वर्णनं हा लावण्यांचा अविभाज्य भाग झाला आहे. काही आध्यात्मिक लावण्यांमधूनही वस्त्रबोलीचा वापर केलेला पाहायला मिळतो.
शाहीर परशरामाची एक लावणी तर या दृष्टीने अतिशय वैशिष्टय़पूर्ण आहे. परशराम हे एक सनदधारी शाहीर होते. हे व्यवसायाने शिंपी होते. नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या या शाहिरांना नव्वद वर्षांचे आयुष्य लाभले होते. त्यांनी स्वराज्याच्या काळापासून पेशवाईपर्यंतचा काळ पाहिला होता. परशरामांनी अनेक विषयांवरील लावण्यांची रचना केली.
ही त्यांची एक आध्यात्मिक लावणी आहे. या लावणीमध्ये जिजाई आणि तुकोबाच्या गरिबीच्या संसाराचे प्रतीकात्मक दर्शन म्हणून वस्त्राचा वापर परशरामाने केला आहे.
जिजाई म्हणते,
एक जीर्ण वस्त्र होते मला मी न्हाते वेळ । त्या विरहित चिंधी घरात सहसा न मिळे।
अशी अडचण पाहून कर्मी साधली वेळ । लग्नास न्यावया आले सोयरे मूळ।
अशा कठीण प्रसंगी विठ्ठल काय करतो..
देदीप्यमान पिवळा पीतांबर हरीचा। तो जिजाबाई नेसली पदर भरजरीचा।
अवघेच वऱ्हाडी दिपले पीतांबर नवपरीचा।
फक्त जिजाईला पीतांबर देऊन हरी कुठला थांबायला. त्याने सगळ्या वऱ्हाडास अहेर आणला.
घ्या मेजवानीचा लाभ आज आहेराचा । वरमाईला मोतीचूर पीतांबर जरीकाठाचा।
विठूशेट गुमास्ता तद्घडी झाला चाटी । चौदेशींचे कापड आणले नारायणपेठीं।
मग सोडून दिंडे हरी सर्वाना वाटी । अशी अमोलिक वस्त्रे पाहून हर्षिले चित्ती।
आले उठून समक्ष तुकोबा पहाता नयनी । ओळखिला पीतांबर नेत्री आले पाणी।
श्रमलास देवा त्वा मजला केले ऋणी । नवसाची साडीचोळी एका उदम्यानी।
ते वऱ्हाडी गेल्यावरती नेसवले आणूनी । असे संतचरित्र ऐका।
जिजाई व तुकोबावरील विठूकृपेचे लोभस वर्णन परशरामाने वस्त्रांकरवी घडविले आहे. त्याने विठ्ठलाला अगदी वस्त्रांचा व्यापारी, म्हणजे चाटी करून टाकले आहे. आज फारसा प्रचलित नसलेला ‘चाटी’ हा शब्द इथे महत्त्वाचा आहे.
बऱ्याच लावण्यांमधून पीतांबर या वस्त्राचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. देव कोणताही असो, राम, कृष्ण, विष्णू किंवा विठ्ठल वस्त्र हे पीतांबरच हवं. हे पीतांबर म्हणजे अगदी उच्च प्रतीचे रेशमी धोतर किंवा साडी. हे मुख्यत: बनारसला विणलं जायचं. धोतरासाठी फक्त पोत आणि साडीवर फुलांची बुट्टी, पण दोघांनाही जरीकाठ असायचे. पीतांबर हे वस्त्र पिवळ्या, गुलाबी, मोतीया किंवा कुसुंबी रंगात विणलं जायचं. म्हणजे ‘पिवळे पीतांबर’ ही द्विरुक्ती नाही बरंका.
याशिवाय या लावणीत नारायणपेठी वस्त्रांचाही उल्लेख आला आहे. वरमाईला मोतीचूर पीतांबर व वऱ्हाडाला नारायणपेठी, अशी क्रमवारीही लावली आहे परशरामानी. ‘नवसाची साडीचोळी’वरून वस्त्रासंबंधी रूढींचा संदर्भही या लावणीतून आला आहे.
आणखी एका लावणीतून परशरामाने विनोदी पद्धतीने पीतांबराचा उल्लेख केला आहे.
शिव शिव काय विषय हा देवपूजा करिता करिता ।
पीतांबर तरी सोडून ठेवा छी छी कवळून धरिता ।
आणि. पीतांबराचाच वापर शृंगार खुलवण्यासाठी परशराम कसा करतात बघा.
बारीक कंबर वर पीतांबर।
जरी रेशमी बंद लाविला।
गेंद गुलाबी मुसमुसला।
अशीच काही आणखी वस्त्रं आणि आणखी लावण्या पुढच्या भागात..
क्रमश:
viva@expressindia.com