तेजश्री गायकवाड viva@expressindia.com

सुरुवातीला ओढणीप्रमाणे दिसणाऱ्या स्कार्फची जागा आता रूमालवजा स्कार्फने घेतली आहे. स्कार्फवर आकर्षक अशी प्रिंट्सही पाहायला मिळतात.

कोणताही ऋतू असो स्कार्फची फॅशन नेहमीच ट्रेण्डमध्ये असते. स्कार्फ हा फॅशन जगतातला महत्त्वाचा भाग आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कोणी रोज तर कोणी खास कार्यक्रमाचं निमित्त साधून स्कार्फ आवर्जून वापरताना आपल्याला आजूबाजूला दिसतील. जीन्स – टॉप, स्कर्ट – टी शर्ट असो किंवा मग अगदी वेस्टर्न वनपीस सगळ्याच आउटफिटवर स्कार्फ शोभून दिसतात. स्कार्फ हा प्रकार फक्त मुलींसाठी आहे असं अजिबात नाही. मुलंही वेगवेगळ्या पद्धतीचे स्कार्फ वापरतांना दिसतात. ओढणीपेक्षा लहान असल्याने मुलींसाठी स्कार्फ  सांभाळायला अतिशय सोपा पडतो. शिवाय त्याचं वजनही भासत नाही. सुरुवातीला ओढणीप्रमाणे दिसणाऱ्या स्कार्फची जागा आता रूमालवजा स्कार्फने घेतली आहे. स्कार्फवर आकर्षक अशी प्रिंट्सही पहायला मिळतात. प्रत्येकजण आपापल्या पसंतीनुसार स्कार्फ खरेदी करत असतो. लोकरीचे स्कार्फ हिवाळ्यात अति उत्तम तर कॉटनचे उन्हाळ्यात उपयोगी येतात. तसंच पावसाळ्यात सिल्कचे स्कार्फ चांगले असतात, कारण पावसात भिजल्यानंतर सिल्क लवकर सुकतं.

सॅटीन : या कापडाच्या स्कार्फचा वापर कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये जास्त केला जातो. फॉर्मल स्कर्ट आणि शर्ट किंवा पॅन्टवरती हे स्कार्फ उठून दिसतात. प्लेन ते प्रिंटेड आपल्या आउटफिट नुसार हे स्कार्फ तुम्ही पेअर करू शकता. सगळ्या रंगाच्या शेडमध्ये हे स्कार्फ उपलब्ध आहेत, सॅटीनचे स्कार्फ हे अतिशय चमकदार आणि सुळसुळीत असतात. पावसाळ्यात आवर्जून हे स्कार्फ वापरावेत.

कॉटन : कॉटनचे स्कार्फ हे सार्वधिक वापरले जाणारे स्कार्फ आहेत. हे स्कार्फ मऊ असतात. ऑक्टोबर हिटसाठी कॉटन स्कार्फ हा एक उत्तम पर्याय ठरतो आहे. कॉटनचे स्कार्फ हे घाम शोषून घेण्यास मदत करतात. यामधेही अगदी सगळेच रंग उपलब्ध आहेत. कॉटन कपडयापासून मास्क स्कार्फसुद्धा बनवले जात आहेत. यामध्ये तुम्ही स्कार्फचा मास्क म्हणूनही वापर करू शकता.

कश्मिरी सिल्क : हे कापड मऊशार आणि वजनाने हलके असते. यात स्कार्फ च्या  रंगांमध्ये नेहमीच नावीन्य दिसून येते. सर्वसामान्य स्कार्फपेक्षा हे स्कार्फ महाग असतात. कारण यामधील काही स्कार्फवर सुंदर नक्षीकाम, भरतकामही केलेले असते. कश्मिरी स्कार्फ खासकरून रात्रीच्या वेळी समारंभांना किंवा कार्यक्रमांना वापरले जातात.

सिल्क : सिल्क कापडाचा लूक हा अतिशय रिच असतो. त्यामुळेच या कापडाचे स्कार्फ सर्व प्रकारच्या कपडयांवर शोभून दिसतात. यामध्ये फ्रेश, गडद रंग जास्त ट्रेण्डमध्ये आहेत.

लोकर : लोकरीचे स्कार्फ हे फार जुन्या काळापासून लोकप्रिय आहेत. हल्लीच्या तरुण पिढीला नेहमीच काहीतरी नवीन हवे असते. हिंदी आणि परदेशी  सिनेसृष्टीत हे स्कार्फ खूप वापरलेले बघायला मिळतात. त्यामुळेच ते प्रसिद्धही आहेत. मफलरच्या स्वरूपात हे स्कार्फ उपलब्ध असतात. तसेच आता ट्रेण्ड नुसार नवनवीन डिझाईन्समध्येही हे स्कार्फ बाजारात आहेत.

मुलांसाठीचे स्कार्फ

मुलांसाठीही स्कार्फ उपलब्ध आहेत. अगदी सूटा बूटापासून ते रोजच्या टी – शर्ट जीन्सवरही मुलं स्कार्फ घालू शकतात. फॉर्मल शर्टच्या वरच्या बाजूस वापरल्या जाणाऱ्या चमकदार स्कार्फला एस्कॉट स्कार्फ म्हणतात. गळ्यात घालायचा टायसुद्धा एक प्रकारचा स्कार्फच आहे. टायचे तर असंख्य रंग आणि प्रिंट्स बाजारात सहज उपलब्ध आहेत.  याखेरीज सर्वसाधारण कॉटनचे स्कार्फ मुलं टी शर्ट आणि जीन्सवर पेअर करू  शकतात. ट्रॅडिशनल ड्रेसलाही हटके लूक देण्यासाठी सिल्कचे स्कार्फ मुलांना वापरून पाहता येतील.