|| विशाखा कुलकर्णी

जेव्हा एखादा प्राणी दत्तक किंवा सांभाळायला घरात आणला जातो, तेव्हा त्याला सांभाळणे म्हणजे फक्त खाऊ-पिऊ घालणे इतकेच नाही, तर तो प्राणी आणल्यावर येणाऱ्या सर्वच बाबींची माहिती आपण आधी करून घ्यायला हवी.

आपल्यापैकी  बऱ्याच जणांना कुत्रा किंवा मांजर पाळायची हौस अगदी बालपणापासून असते, पण पालकांनी परवानगी दिली नाही या कारणामुळे अनेकदा लहानपणीची हौस थोडे मोठे झाल्यावर पूर्ण केली जाते. त्यात गेल्या वर्षीच्या टाळेबंदीने सगळ्यांना घरात बंदिस्त केल्यावर तर एकटेपणा घालवण्यासाठी घरात एक तरी पाळीव प्राणी असावा, या इच्छेने अनेकांनी कुत्रा किं वा मांजर असे प्राणी पाळण्याचा निर्णय घेतला. या प्राण्यांना तसेच अनेकदा बाहेर फिरणारे भटके कुत्रे-मांजरी यांना उत्साहाने दत्तक घेणाऱ्या तरुणाईला त्यानंतर येणाऱ्या जबाबदारीची जाणीव असायला हवी. जेव्हा एखादा प्राणी दत्तक किंवा सांभाळायला घरात आणला जातो, तेव्हा त्याला सांभाळणे म्हणजे फक्त खाऊ-पिऊ घालणे इतकेच नाही, तर तो प्राणी आणल्यावर येणाऱ्या सर्वच बाबींची माहिती आपण आधी करून घ्यायला हवी.

आपण एखादा प्राणी पाळतो, तेव्हा आपण त्याला प्रेम, माया देतो, तशीच त्या प्राण्यांच्या मनात देखील माया असते, त्यामुळे आपण त्यांना तशीच वागणूक दिली पाहिजे. याबद्दल बोलताना पशुवैद्यकतज्ज्ञ डॉ. शैलेश इंगोले सांगतात, ‘एखादा प्राणी आपण सांभाळतो, तेव्हा तो जनावर म्हणून नाही, तर आपल्या घरातला सदस्य म्हणून त्याची काळजी घेतली पाहिजे. परदेशात एखाद्या कुटुंबात असलेला प्राणी हा त्या कुटुंबाचाच एक भाग असतो,भारतात मात्र ही वृत्ती अभावानेच आढळते’.  टाळेबंदी दरम्यान दिवसभर घरी असताना दत्तक घेतलेल्या पाळीव प्राण्यांना अनेक महिने खाऊपिऊ घालून, त्यांचे लाड करून नोकरी सुरू झाल्यानंतर आता वेळ नाही, म्हणून सोडून देणे चुकीचे आहे. घरातल्या एखाद्या व्यक्तीला जबाबदारी झेपत नाही म्हणून आपण सोडून देतो का? मग अल्पावधीतच आपल्याला जीव लावणाऱ्या,  ज्यांच्या विश्वााचा आपण मोठा भाग असतो अशा मुक्या जीवांच्या बाबतीत असे वागताना अंतर्मुख होऊन विचार करायला हवा.

अनेकदा कुत्रा किंवा मांजर दत्तक घेणाऱ्यांचा कल परदेशी जातीचा कुत्रा किंवा मांजर दत्तक घेण्याकडे असतो. पण अशावेळी हे लक्षात घेतले पाहिजे की त्या प्राण्याची शरीररचना ही त्याचे मूळ ज्या प्रदेशातील आहे, त्या प्रदेशानुसार असते. आपण त्यांना जरी दत्तक घेत असलो, तरी भारतात आपण जिथे राहतो त्या वातावरणात ते कितपत जुळवून घेतील या गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे. बाहेरच्या प्रदेशातील तापमान, हवामान, परिसर या गोष्टींप्रमाणे त्या प्राण्यांची रचना असल्यामुळे भारतीय तापमान, आर्द्रता, ऋतूंचे होणारे बदल या गोष्टींमुळे त्यांना वेगवेगळे त्रास उद्भवू शकतात. त्यामुळे दत्तक घेण्यापूर्वी या सगळ्या बाबींची माहिती करून घेणे व त्या प्राण्याची देखभाल आणि काळजी त्यानुसार घेणे आवश्यक आहे.

कुठलाही प्राणी दत्तक घेताना आणि एखादा भटका प्राणी घरात आणण्यापूर्वी त्याची पशुवैद्यकीय तज्ज्ञाकडून तपासणी करून घ्यायला हवी. त्या प्राण्याला कुठला आजार आहे का, त्याची आरोग्याची स्थिती कशी आहे, या गोष्टींची माहिती घ्यायला हवी. जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात त्या प्राण्याची संपूर्ण तपासणी करता येते. तसेच त्या प्राण्याला आवश्यक असणारे लसीकरण, उदा. कुत्र्याला रेबीजची लस, अथवा मांजराचे डीवर्मिंग, म्हणजेच जंतुनाशक औषधे देणे, अशा प्रकारची काळजीही एखादा प्राणी नव्याने घरात आणण्यापूर्वी घेणे गरजेचे आहे, अशी माहिती ‘मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालया’तील ‘पशुवैद्यकीय सामूहिक स्वास्थ्य विभागा’चे प्राध्यापक आणि विभागप्रमुख  डॉ. रविंद्र झेंडे यांनी दिली. पाळलेल्या प्राण्यांपासून आपल्याला आजार होऊ नये यासाठी सल्ला देताना ते म्हणतात, ‘संपूर्ण घरात, सोफा, बेड, स्वयंपाकघर यांसारख्या ठिकाणी कुत्रा- मांजर अश्या प्राण्यांचा वावर असल्याने त्यांच्या केसांपासून, तसेच त्यांच्या संपर्कात आल्याने उद्भवू शकणारे आजार होऊ शकतात. यासाठी त्यांना घरातच पण स्वतंत्र जागा असावी, तसेच त्या जागेची नियमितपणे स्वच्छता केली पाहिजे’.

घरात लहान मुले, वृद्ध व्यक्ती तसेच गरोदर महिला असल्यास त्यांना या पाळीव प्राण्यांपासून कोणताही आजार होऊ नये यासाठी काळजी घ्यावी, याचीही पशुवैद्यक तज्ज्ञासोबत चर्चा करावी. प्राण्यांना पिल्लं होऊ नये, त्यांना सांभाळण्याची जबाबदारी नको असल्यास त्यांचे न्यूटरिंग अर्थात नसबंदी शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. यामुळे भविष्यात त्या प्राण्यांनादेखील त्रास होणार नाही.

हल्ली काहीही प्रश्न पडला की उत्तर शोधण्यासाठी गूगलचा आधार घेतला जातो, माणसाला साधी डोकेदुखी झाली तरी पार कॅन्सरपर्यंतचे निदान करणाऱ्या गूगलवर आपल्या प्राण्यांना काही आजार झाल्यास त्याचे निदान करणारे खूप महाभाग आहेत. ‘त्यासारखेच आमच्या कुत्र्या- मांजराला हे होते आहे, काय करू? कुठले औषध देऊ?’, असे प्रश्न फेसबुकवर विचारणाऱ्यांची संख्याही वाढती आहे. अशा माध्यमातून मिळणाऱ्या उत्तरांनी आपण कदाचित आपल्या लाडक्या माऊ- डॉगीचा जीव धोक्यात देखील घालू शकता. त्यापेक्षा त्याच गूगलचा आधार घेऊन जवळच्या पशुवैद्यकीय डॉक्टरचा नंबर शोधणे जास्त सोपे आहे!

युवावर्गातील अनेक प्राणीप्रेमी आजूबाजूच्या प्राण्यांविषयी संवेदनशीलता दाखवतात, शहराबाहेर एखाद्या जंगलात, झाडीत, ट्रेकिंगला जाताना सापडलेल्या प्राण्यांवर-पक्ष्यांवर उपचार करतात, काही वेळा घरीदेखील आणतात. परंतु अशा वेळी अपुऱ्या माहितीने उपचार करण्यापेक्षा लवकरात लवकर तिथल्या संबंधित अधिकाऱ्याला या जखमी प्राण्याची सूचना देणे गरजेचे आहे. कुठलाही बाहेरचा प्राणी घरी आणण्यापूर्वी दुर्मीळ प्रजातीच्या प्राण्यांसाठी असलेले कायदे, वन्यजीव संरक्षण कायदा यातील तरतुदी व मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घेतली पाहिजेत. इतक्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं फार जास्त वाटतं आहे का? पण जेव्हा आपण नव्याने पेटमॉम किंवा पेटडॅड होत असतो, तेव्हा त्या प्राण्याची एखाद्या लहान बाळाएवढीच काळजी, जबाबदारी घेणेही आपण शिकले पाहिजे. तरच आपल्या लाडक्या प्राण्याचे आरोग्य आणि आयुर्मान दोन्ही वाढेल!

viva@expressindia.com