नव्या पिढीचा गायक, संगीतकार, रिअ‍ॅलिटी शोचं व्यासपीठ गाजवणारा, रॉक म्युझिक बॅण्डमध्ये झोकून देऊन गाणारा आणि शास्त्रीय संगीताच्या तानाही तितक्याच नजाकतीनं घेणारा हरहुन्नरी कलाकार जसराज जोशी सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोक स्टुडिओ ही संकल्पना खरे तर त्या शीतपेयाच्या जाहिरातीसाठीच निर्माण झाली, पण आज ती एक चळवळ झाली आहे. पाकिस्तानमधील यशानंतर ही चळवळ भारतातही काही वर्षांपूर्वी सुरू झाली. पहिला सिझन फार काही यशस्वी ठरला नाही; कारण यात जुनीच गाणी नव्या पद्धतीने किवा आपापसात मिसळून सादर करण्यात आली. नंतरच्या सीझनमध्ये मात्र एक एक एपिसोड एकेका संगीतकाराला देऊन, साग्रसंगीत वेळ देऊन, गीतकार नेमून नवीन गाणी तयार करण्यात आली. त्यामुळे एक एक गाणे लक्षात राहावे, ठेवावे, परत परत ऐकावे असे बनत गेले. सीझन ३ सुद्धा मग असाच यशस्वी ठरला. चौथ्या सीझनमध्ये कोक स्टुडिओ एक एक गाणे बनवून ते वेगळ्या व्हिडीओसह त्यांच्या वेबसाइटवर उपलब्ध करत आहे. काही उदाहरणे- चित्रपट संगीत आणि स्वतंत्र संगीत (इंडिपेंडंट म्युझिक) यात काय फरक असतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे क्लिंटन सेरोजो! बॉलीवूडमध्ये अनेक संगीतकारांचे संगीत संयोजन करणारा आणि गायक म्हणूनही कला दाखवणारा क्लिंटन याने कोक स्टुडिओमध्ये कमालीची भन्नाट गाणी केली आहेत. सीझन २ मधल्या क्लिंटनच्या एपिसोडमधली सगळीच्या सगळी गाणी एक से एक भारी आहेत. सावन खान या राजस्थानी लोकगीत गायकाला घेऊन केलेली ‘साथी सलाम’ आणि ‘डुंगर दुख ना दे’मध्ये सुंदर फ्युजन दिसून येते. ‘साथीसलाम..’ मधले पॉजेस, ब्रेक्स तसेच ‘डुंगर दुख ना दे’ मधे वापरलेला western choir  (कोरस) कमाल आहे.
या एपिसोडची सगळी गाणी मनोज यादव यांनी लिहिलेली आहेत. त्यात सूफी विचार दिसतात. उदाहरणार्थ ‘छड दे मूरख मोह जगत् का’ हे मास्टर सलिम आणि विजय प्रकाश या दोन तगडय़ा गायकांनी गायलेले गाणे. विजय प्रकाश खर्जात तर मास्टर सलीम वरच्या पट्टीत माहीर असल्याने या दोघांचे मिश्रण मजा आणते. यात दोन रागांचा वापर, मुच्र्छना, कॉर्ड्स्चा वापर कधीही न ऐकलेला असा आहे. विशाल दादलानीचा रांगडा आवाज आणि सोनू कक्करचा पंजाबी सूफी गायकीचा आवाज एकत्र आणणाऱ्या ‘मदारी’ या गाण्याची मजा काही औरच आहे. त्यातला तालाचा केलेला खेळसुद्धा मस्त आहे. ‘बंजारा’ हे नंदिनी श्रीकर आणि विजय प्रकाश यांनी गायलेले गाणेसुद्धा लाजवाब! क्लिंटनची सीझन ३ मधली ‘बैना’ (विजय प्रकाश) आणि ‘ऐसी बानी’ (सोनू कक्कर-विजय प्रकाश) ही गाणीसुद्धा मस्त आहेत.
राम संपत या संगीतकाराचे ‘कटे’ हे भंवरी देवीच्या लोक-गायकीने आणि हार्ड कौरच्या रॅपनी नटलेले गाणेसुद्धा अफलातून आहे. याच्या व्हिडीयोमध्ये भंवरी देवी पदराने आपला चेहरा पूर्ण झाकून गाताना तर हार्ड कौर ही आधुनिक कपडय़ांमध्ये गाताना पाहून गंमत वाटते. राम संपत- सोना मोहोपात्रा या जोडीचे ‘पियासे नैना’ हे गाणेसुद्धा छान आहे. यात मेन्डोलीनसारख्या तंतुवाद्यांचा सुरेख वापर केला आहे.
सलिम सुलेमान या संगीतकार जोडीने कैलाश खेरबरोबर केलेले ‘बिस्मिल्लाह’ हे गाणे फारच श्रवणीय झाले आहे. कोरसचा सुंदर वापर ही या संगीतकारांची खासियतच आहे. ती या गाण्यातही दिसून येते. सचिन जिगर या संगीतकार द्वयींची ‘लाडकी’ (रेखा राव, तनिष्का संघवी, किरतीदान गढ्वी), ‘सावनमे’ (तोचि रैना, जॅसमिन सँडलस), बन्नाडो (तोचि रैना, भुंगारखान मंगानियर) ही गाणीसुद्धा सही आहेत. पॅपॉनने बेनी दयाळ या गायकाबरोबर केलेले ‘तौबा’ हे गाणेसुद्धा वेगळे, उडत्या चालीचे ‘फंकी’ असे आहे.
सरते शेटवटी रेहमान सरांचे जरिया. जॉर्डनची गायिका फराह सिराज आणि नेपाळी बौद्ध गायिका नून अनी चोयिंग या दोघींना एकत्र आणून गोड गळ्याच्या कोरस गायिकांचा उत्तम वापर असलेले हे गाणे प्रसून जोशी यांनी लिहिले आहे. सगळ्यांचा ईश्वर एकच आहे, अशा आशयाचे हे गाणे भन्नाट झाले आहे.
या ‘कूल कोक’ बरोबर उन्हाळा कसा सरला हे कळणारदेखील नाही! हो ना !

हे ऐकाच…
मौजे नैना आणि हुसना
कोक स्टुडिओत केवळ संगीतच नाही तर काव्यसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे, हे पीयूष मिश्रा या हरहुन्नरी कलाकाराने लिहिलेल्या आणि गायलेल्या ‘हुसना’ या गाण्यातून प्रतीत होते. हितेश सोनिक या संगीतकाराने निर्मित केलेल्या गाण्यात भारत पाकिस्तान फाळणी वर भाष्य केलेले आहे. अतिशय करुण रसपूर्ण असे हे गाणे ऐकावेच असे आहे. असेच अजून एक गाणे ज्यात करुण, बीभत्स, भय, आणि अजून कोणकोणते रस भरलेले आहे, जे कोक स्टुडिओ मधील सर्वात भारी, सर्वात वेगळे असे गाणे म्हणजे ‘मौजे नैना’! मनोज यादव (हिंदी) आणि अजिंक्य अय्यर(इंग्लिश) यांनी लिहिलेले आणि बियांका गोम्स, शादब फरिदी, अल्तमश फरिदी यांनी गायलेले हे गाणे एकदा नक्की ऐका. ते तुम्ही लगेच दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, किमान पाच वेळा ऐकाल यात शंका नाही.
जसराज जोशी

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coke studio