गोष्टी ‘तन्मय’तेने केल्या की कामाची डेप्थ वाढते अशी शिकवण मनावर बिंबलेली. पण हल्ली असं काहीतरी समोर येतं की, बेसिक्सचा पालापाचोळा होतो. सगळंच नव्याने शिकण्याची गरज निर्माण होते. त्यासाठीच हा ‘एफएक्यू’च्या उत्तरांचा संच..

या व्हच्र्युअल दुनियेत काय व्हायरल होईल सांगता येत नाही. न्यूजफीडी, ट्विटर हँडली, मेल इनबॉक्सी, व्हॉट्स अ‍ॅपी अशा सगळ्या सोशल प्लॅटफॉम्र्सवर बदाबदा पडणाऱ्या सर्व गोष्टींविषयी अपडेट राहण्याचा आम्ही प्रयत्न करतो. पण ही सगळी ‘गॅझेटेड’कसरत सांभाळताना आम्ही पार थकून जातो. गोष्टी ‘तन्मय’तेने केल्या की कामाची डेप्थ वाढते अशी शिकवण मनावर बिंबलेली. पण हल्ली असं काहीतरी समोर येतं की बेसिक्सचा पालापाचोळा होतो आणि सगळंच नव्याने शिकण्याची गरज निर्माण होते. तुमचा हा भार हलका होण्यासाठी ‘एफएक्यू’ अर्थात फ्रिक्वेंन्टली आस्क्ड क्वेशन्सच्या आन्सर्सचा सेटच आम्ही तयार केला आहे.
रोस्ट- रोस्ट म्हणजे भाजणे असं तुमच्या मनात आणि मेंदूत आलं असेल तर तुम्ही निअँडरथल मानवाच्या काळातले आहात. आता लोक पॅक्ड फूड खातात. भाजण्यासारख्या पर्यावरणद्रोही गोष्टी पूर्वी व्हायच्या. रोस्ट म्हणजे कॉमेडी कार्यक्रमाचा एक उपप्रकार. टोस्ट म्हणजे पार्टीमध्ये सगळ्यांनी उत्सवमूर्तीसाठी मद्याचा ग्लास उंचावणे. या टोस्टला दिलेला रिदमिक काऊंटर पंच म्हणजे रोस्ट.
रोस्टी- इनसल्ट कॉमेडीचे जो माणूस लक्ष्य असतो त्याला रोस्टी असे म्हणतात. या माणसाने कितीही खालच्या शब्दात टीका झाली, अणकुचीदार विनोदाचे लक्ष्य ठरला किंवा ठरली तरी नम्रता, संयम, स्थितप्रज्ञ राहणे अपेक्षित असते.
रोस्टमास्टर-जो माणूस किंवा अनेक माणसांचा ग्रुप किंवा संस्था रोस्ट कार्यक्रमाचे आयोजन करतात त्यांना रोस्टमास्टर म्हणतात. किती शेलक्या शब्दांत बोलायचं, अनुल्लेखाने किती टोचायचं, जाहीर निर्भर्त्सनेसाठी किती जणांना आवतन द्यायचं याबाबतचा निर्णय रोस्टमास्टर घेतात.
ब्लॅक कॉमेडी ऊर्फ काळा विनोद- विनोद निखळ असावा, कुणालाही दुखावणारा नसावा या विचार प्रवाहाला छेद देणारा समांतर प्रवाह. काळ्या विनोदाअंतर्गत माणूस शाब्दिक घायाळ ऊर्फ हर्ट होणे अपेक्षितच आहे. तसे न झाल्यास विनोदाची तीव्रता आटली आहे असे समजावे.
निगेटिव्ह पब्लिसिटी- तुमच्या विनोदकर्मानंतर सोशल मीडियावर तुम्ही ट्रोल्सचे (सायबर टोळ्या) भक्ष्य ठरणे हे निगेटिव्ह पब्लिसिटीचे आद्य लक्षण. सकारात्मक अर्थात आटपाट नगरी प्रसिद्धी कोणीही मिळवतं. निगेटिव्हसाठी विशेष मेहनत घ्यावी लागते. लोकांच्या भावना दुखावल्याप्रकरणी तुम्हाला अटक व्हावी, तुम्हाला चौकात जाहीर फोडून काढण्यात यावे असे वाटणे ही दुसरी पायरी. वर्तमानपत्रात तुमच्या विनोदकर्मावर मंथन घडावे, वृत्तवाहिन्यांवर चॅनेलीय चर्चा घडाव्यात, वेबसाइट्सवर कोण आहे अमुकतमुक अशी पॅकेज तयार होणे म्हणजे निगेटिव्ह पब्लिसिटीचे शिखर समजावे.
विनोद- कांबळींचा का हो, असं विचारून स्वत:चं हसं करून घेऊ नका. विनोद म्हणजे समष्ठीतला अत्यंत नैसर्गिक असा आविष्कार आहे. विनोद झाला किंवा केला की हास्याचे फवारे उमटणं अपेक्षित असतं. हल्ली विनोद झाल्यावर बसल्या खुर्चीतून पडून लोळण घेणंही आवश्यक असतं. थुकरट गोष्टींवर हसणाऱ्यांना विनोदसम्राट असा किताबही दिला जातो. विनोदावर आधारित रिअ‍ॅलिटी शोजमुळे अनेकांना रोजगार मिळतो. भूगर्भातली पाण्याची पातळी आपल्यासाठी महत्त्वाची असते तसं विनोदाच्या पातळीचं नसतं. ती गौण असते. विनोद करताना स्वत:चं हसं झाल्यास आपण योग्य मार्गावर आहोत याची खात्री बाळगावी.
एआयबी – अखिल भारतीय नावाने सुरू होत असली तरी ही वैैश्विक संघटना आहे. आजूबाजूला घडणाऱ्या कोणत्याही गोष्टीवर व्यक्त होण्याचा (टीका करणे, शाब्दिक चिमटे काढणे, उपरोधात्मक परिच्छेद, कोटय़ा, द्वयर्थक संवाद, उल्लेखासह आक्षेपार्ह टिप्पणी, शेरेबाजी) संघटनेला अधिकार आहे. विशेष म्हणजे संघटनेची सदस्यता मोफत आहे आणि व्यक्त होण्यासाठी उत्तम पैसेही मिळतात. परिस्थिती, नातेवाईक, ऑफिसातला बॉस आणि तत्सम व्यक्ती, संस्था, निर्गुण निराकार गोष्टींवर भडास काढण्याची इच्छा असलेल्यांना संघटनेत प्राधान्याने प्रवेश मिळतो.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य- १५ ऑगस्ट १९४७च्या मध्यरात्री आपल्याला जे मिळालं त्याचे हे ४३१वे उपकलम. हे कलम समजण्यासाठी एरव्ही हजारो ग्रंथ, परिशिष्ट, जर्नल्स यांचा निचरा करावा लागतो. पण तुमच्यााठी खास सोपी व्याख्या. या नश्वर देहाद्वारे आणि विशेषत: मुखाद्वारे वाट्टेल ते कृती करण्याची मिळालेली मुभा. अभ्यासकांच्या मते याला ‘लोकशाहीचे चोचले’ असंही म्हणतात.
फ- हे एकच अक्षर वर्मी बाण आहे. प्राचीन काळी ‘भ्र’कारान्त शिव्या असत. सांप्रत काळी ‘फ’कारान्त शिव्या असतात. विनोदाच्या पेरणीदरम्यान ‘फ’ चे पारायण आवश्यक मानले जाते. जितकी तुमची क्रिएटिव्हिटी जास्त तितकी ‘फ’शी सलगीही.
भूमिकेतला ‘विनोद’- जगात आदरणीय काहीच नसतं. लोकं काहींना मनाच्या गाभाऱ्यात नेऊन पूजनीय वगैरे मानतात. मूर्ती, पूजा, वंदन, नमन, दंडवत, लोटांगण या सगळ्याशी फारकत घेत मोकाट विनोदणं टॉलरंट समाजाचं लक्षण समजावं.
विनोद प्रसार- आपलं विनोद कर्म यच्चयावत जनतेपर्यंत नेण्यासाठी फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, डबस्मॅश आणि तत्सम शेकडो टेक्नो करामतींवर प्रभुत्व हवं. एलिट्स मंडळींपासून ते तळागाळापर्यंत विनोदाची पखरण करण्यासाठी या टेक्नोशिडय़ा वापरणे क्रमप्राप्त.
(सदरहू उत्तरांचा सेट म्हणजे अंतिम सत्य नव्हे. शिकण्याची प्रोसेस सुरूच राहते. या सेटमध्ये अ‍ॅडिशन होतच राहतात. जिज्ञासूंनी आमच्या संपर्कात राहावे. अ‍ॅडिशन केलेला रिव्हाइज सेट तुमच्या निरोप पत्त्यावर अर्थात इमेल आयडीवर धाडण्यात येईल.)