वैष्णवी वैद्य
प्रत्येक क्षेत्रात नवनवीन प्रयोग होत आहेत. त्यामुळे त्यामागचं तंत्र शोधणं हेसुद्धा एक प्रकारचं संशोधनच आहे. कला आणि सिनेमा क्षेत्रसुद्धा संशोधनापासून वंचित राहिलेलं नाही. सगळ्यात जास्त प्रयोग जर कुठे होत असतील तर ते या क्षेत्रात. कला, सिनेमा, नाटक आणि तंत्रज्ञान यातला संगम साधून एखादी कलाकृती झाली तर ती कशी असेल आणि त्यात नक्की काय नावीन्य असेल याचे संशोधन आजचे युवा नाटककार करत आहेत.
‘संशोधन’ या शब्दाला एक प्रकारचं वजन आहे. मी अमुक अमुक संशोधन करतो आहे, असं कोणी म्हटलं की आपोआपच आपल्या भुवया उंचावतात. हा माणूस काही तरी वेगळं रसायन आहे असं वाटायला लागतं. तसं बघायला गेलं तर हा शब्द बराचसा शैक्षणिक क्षेत्राशी निगडित आहे; पण आजकालच्या डिजिटल काळात याचा वापर अनेकविध अंगांनी वाढला आहे. प्रत्येक क्षेत्रात नवनवीन प्रयोग होत आहेत, त्यामुळे त्यामागचं तंत्र शोधणं हेसुद्धा एक प्रकारचं संशोधनच आहे. कला आणि सिनेमा क्षेत्रसुद्धा संशोधनापासून वंचित राहिलेलं नाही. सगळ्यात जास्त प्रयोग जर कुठे होत असतील तर ते या क्षेत्रात. कला, सिनेमा, नाटक आणि तंत्रज्ञान यातला संगम साधून एखादी कलाकृती निर्माण झाली तर ती कशी असेल आणि त्यात नक्की काय नावीन्य असेल याचे संशोधन आजचे युवा नाटककार करत आहेत.
सिनेमामध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा वापर हा नवीन नाही, तसा तो रंगभूमीवरही नाही. मात्र रंगभूमीवर सध्या आशयाच्या बाबतीतच नाही तर लाइट्स, नेपथ्य सगळ्याच गोष्टींत खूप वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. अगदी एआयच्या (आर्टिफिशिअल इंटिलिजन्स) वापराने रंगभूमी समृद्ध करण्याचे प्रयोग होऊ लागले आहेत. नाटकात गोष्टीतलं अवकाश जिवंत करणारे लाइट्स हे माध्यमसुद्धा प्रायोगिक तत्त्वावर आजकाल वापरलं जातंय. नाटकाचा लहेजा काय आहे? त्याचा काळ कुठला आहे? यावरून लाइट्सची रंगसंगती ठरवली जाते. सध्या रंगभूमीवर आलेलं सुयोग निर्मित नवंकोरं नाटक ‘गांधीहत्या आणि मी’ याची प्रकाशयोजना भूषण देसाई यांनी केली आहे. ते म्हणतात, ‘‘पूर्वी ५०० आणि १००० वॅटच्या लाइट्सचा उपयोग जास्त केला जायचा. तशा प्रकारांमध्ये जास्त नावीन्य आणणं शक्य नव्हतं. आता एल.ई.डी. लाइट्सचा वापर होतो ज्यामध्ये आरजीबी फॉर्मेट असतो. तीन बेस कलरमधून विविध रंग साकारता येतात. आधी हे सगळे प्रयोग फोटोशॉप किंवा पेंटिंगने करावे लागायचे.’’ नव्या नाटकात त्यांनी केलेल्या लाइट्सच्या प्रयोगाविषयी ते म्हणतात, ‘‘गांधीहत्या आणि मी’ या नाटकाचा काळ पाहता त्या पद्धतीचं चित्र उभं करावं लागणार होतं. त्या काळाचा भास होण्यासाठी बऱ्याच प्रवेशांमध्ये ग्रे रंगाच्या लाइट्स वापरल्या आहेत. ग्रे रंगाचे लाइट किंवा तसे इफेक्ट्स नेहमीपेक्षा अगदीच वेगळे आहेत. ते बेस रंगाच्या सरमिसळीने प्रत्यक्षात आणावे लागतात. फिकट निळा आणि पिवळा या दोन रंगांच्या मदतीने ग्रे इफेक्ट दिला आहे.’’ तसंच फ्रीजनल स्पॉट लाइट, पार कॅन लाइट, पार एलईडी लाइट, शार्प लाइट, इंटलिजंट लाइट असे अनेक आधुनिक पद्धतीचे तंत्र वापरून प्रयोग केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
नाटकाचे नेपथ्य हासुद्धा एक महत्त्वाचा भाग असतो. किंबहुना त्यावरच अख्खं नाटक उभं असतं. आजचे आघाडीचे नेपथ्यकार संदेश बेंद्रे सांगतात, ‘‘नाटकाची संहिता सगळ्यात महत्त्वाची असते. दिग्दर्शकाला गोष्टीतून नेमकं काय अपेक्षित आहे हे जाणून घ्यायला हवं. दिग्दर्शक पात्रातून नाटय़ उभं करतो, पण नेपथ्यातून नाटय़ उभं करणं हे नेपथ्यकाराचं कौशल्य असतं.’’ ऐतिहासिक नाटकाचे सेट हे आव्हानात्मक असतात. तो काळ हुबेहूब उभा करण्यासाठी योग्य ती सामग्री आणि रंगसंगती करणं खूप महत्त्वाचं असतं. ‘गांधीहत्या आणि मी’मध्ये लाल किल्ला साकारण्यासाठी प्रत्यक्षात रेड स्टोनचे टेक्स्चर त्याच्यात आणण्याचा प्रयत्न केला गेला. हल्लीच रंगभूमीवर आलेलं अद्वैत थिएटर्स निर्मित ‘इब्लिस’ हे रहस्यमय नाटक आहे, त्यामध्ये कोकणातला जुनाट वाडा दाखवला आहे. काजू आणि नारळाची झाडं, घराच्या काही अंतरावर असलेला समुद्र, वाडय़ाच्या खिडक्यांची पडझड या सगळ्या त्यातल्या बारकाईने अभ्यास करण्याच्या गोष्टी आहेत. अजून एक नवंकोरं नाटक म्हणजे सुयोग निर्मित ‘थोडं तुझं थोडं माझं’. या नाटकाच्या सुरुवातीचा प्रवेश कवितेने होतो तेव्हा तिथे कृत्रिम पाऊस दाखवला आहे. त्यासाठी स्टेनलेस स्टीलची मोठी रचना करावी लागली आणि सबमर्सिबल पंपाचा वापर केला गेला. बालनाटय़ाचा गाभा आणखीनच वेगळ्या प्रकारचा असतो. मुलांचं लक्ष तीन तास एका ठिकाणी केंद्रित करायचं असतं. ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकामध्ये जंगलाचा सेट आहे ज्यात नीयॉन रंगाचा वापर जास्त प्रमाणात केला आहे. आजकाल सर्कशी मुलांना दिसत नाहीत, त्यामुळे सर्कशीतल्या तंबूचा वापर इतर बालनाटय़ांत केला. या सगळ्या प्रयोगांवर मुलांचा आणि प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद मिळतोय. हे सगळं तंत्र नाटकात वापरणं हे मोठा प्रयोग करण्यासारखंच आहे, कारण नाटक हे थेट प्रक्षेपण असतं. त्यामध्ये स्क्रीनसारखं काही लपवता येत नाही. संपादनालासुद्धा जागा नसते. नेपथ्य आणि प्रकाशयोजना हे तर जणू भाऊ बहीण आहेत. चांगला प्रभाव पडण्यासाठी दोन्हीचं समीकरण जुळायलाच हवं.
नाटक क्षेत्रातले प्रयोग सध्या इतके वाढले आहेत की कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये वावरणारी तरुण पिढी वीकेण्ड छंद आणि पर्यायाने वेगळं प्रोफेशन म्हणून याकडे वळतायेत. जयदीप आपटे हा कॉम्प्युटर इंजिनीअर आहे. तो प्रकाशयोजनाकार म्हणूनसुद्धा एनसीपीएमध्ये कार्यरत आहे. तो या वेगवेगळ्या प्रयोगांविषयी सांगतो, ‘‘सिनेमासाठी छायांकन जितकं महत्त्वाचं असतं तेवढीच प्रकाशयोजना हा नाटकाचा पाया असतो. श्रोत्यांनी नेमकं काय बघावं किंवा त्यांना नेमकं काय दिसायला हवं ही प्रकाशयोजनाकाराची जबाबदारी असते. लाइव्ह पद्धतीचे सादरीकरण संपूर्ण अंधारात किंवा अति प्रकाशात दोन्ही परिस्थितीत होऊ शकत नाही. प्रकाशयोजनेचा योग्य तो समतोल राखणं गरजेचं असतं. समुद्री लाटा किंवा अॅक्शन सीक्वेंन्ससाठी लागणारी प्रभावशाली प्रकाशयोजनासुद्धा नाटकासाठी रंगीबेरंगी लाइट्स वापरून करता येते.’’
नाटकातलं संशोधन म्हटलं की आपण जुन्या-नवीन नाटकांचा अभ्यास एवढाच विचार करतो, पण विज्ञानाचा आधार घेऊन चक्क एक नवीन तंत्रज्ञान उभं करता आलं तर.. याच विषयाचा अभ्यास करतोय पुण्याचा युवा निरंजन पेडणेकर. निरंजन स्वत: आर्टिफिशियल इंटिलिजन्स एक्स्पर्ट आहे. ‘‘कुठलीही कला आणि ए.आय. यांचं वाकडं आहे, असं म्हणतात. कारण माणूस सर्जनशील असतो, पण मशीन नाही. आता एकविसाव्या शतकात हे समीकरण बदलत चाललंय आणि येत्या काळात ते आणखी बदलेल.’’ ए.आय. हे खूप आधुनिक तंत्रज्ञान आहे. त्याचा नाटकाशी संगम जुळवणं ही कल्पनासुद्धा सध्या संशोधनाच्या जात्यातच आहे; पण निरंजन कॉम्प्युटर व्हिजन आणि नॅचरल लॅन्ग्वेज प्रोसेसिंग हे तंत्रज्ञान वापरून नाटकांचा अभ्यास करतो आहे. तो इंग्रजी नाटकं मराठीत अनुवाद करण्याचं कामही करतो आहे. असंच त्याने अनुवाद केलेलं नाटक आहे ते म्हणजे सुव्रत जोशी आणि ओंकार गोवर्धन अभिनीत ‘शाही पहारेदार’. एखाद्या नाटकाचं स्क्रिप्ट आपण मशीनमध्ये टाकलं तर त्या नाटकाचा प्रेक्षक वर्ग कसा असेल, ते नाटक व्यावसायिक पद्धतीने किती चालेल अशा अनेक मापदंडांमध्ये ते आपण मोजू शकतो किंवा एखाद्या नाटकाचा परफॉर्मन्स मला रेट करायचा असेल, जेणेकरून नट आणि दिगदर्शक अभ्यास करू शकेल की कुठे सुधारणा करता येईल. अशा पद्धतीचे तंत्र निर्माण करण्याचा अभ्यास तो करतो आहे. ‘‘नाटक हे लाइव्ह माध्यम आहे, त्यामुळे या क्षेत्रात रोबोट्सचा वापरसुद्धा बहुतांश प्रमाणात होऊ शकतो,’’ असंही निरंजन सांगतो.
हे सगळे प्रकार आजचे युवा नाटककार करताना दिसत आहेत. या सगळ्यांचं म्हणणं आहे, तंत्रज्ञान खूप वेगाने बदलत आहे. त्याच्या वापरामुळे आजचा प्रेक्षकवर्ग, मुख्यत: तरुणवर्ग प्रौढ आणि जाणता आहे. डिजिटल माध्यमांमुळे नाटकाला या स्पर्धामध्ये टिकणं कठीण होऊ शकतं. म्हणून आजच्या कलाकाराला प्रेक्षकांच्या दोन पावलं पुढे असणं गरजेचं आहे. नवनवीन आणि आधुनिक प्रयोग आत्मसात करणं आज काळाची गरज आहे. दिवसागणिक प्रेक्षकांची आवड बदलते आहे. एखादी कलाकृती आज आवडली म्हणजे ती उद्यासुद्धा आवडेलच असं नाही. त्यामध्ये नवनवीन प्रयोग करून प्रेक्षकांना आपल्याकडे वळवून आणणं आणि आपल्याशी जोडून घेणं यासाठीचे हे अव्याहत संशोधन आणि प्रयोग सुरू असल्याचे तरुणाई सांगते.
ग्रे रंगाचे लाइट किंवा तसे इफेक्ट्स नेहमीपेक्षा अगदीच वेगळे आहेत. ते बेस रंगाच्या सरमिसळीने प्रत्यक्षात आणावे लागतात. फिकट निळा आणि पिवळा या दोन रंगांच्या मदतीने ग्रे इफेक्ट दिला आहे. तसंच फ्रीजनल स्पॉट लाइट, पार कॅन लाइट, पार एलईडी लाइट, शार्प लाइट, इंटलिजंट लाइट असे अनेक आधुनिक पद्धतीचे तंत्र वापरून प्रयोग केले जातात.