डिझायनर मंत्रा || तेजश्री गायकवाड

श्यामल आणि भूमिका ही अहमदाबादमधली डिझायनर दाम्पत्य. या दोघांनी जोडीनेच वयाच्या २०व्या वर्षी त्यांचं पाहिलं कलेक्शन डिझाईन केलं होतं. हातमाग, भारतीय कापड आणि भारतीय पारंपरिक क्राफ्टला आपल्या कलेक्शनमधून नेहमीच प्राधान्याने सादर करणारी अशी ही डिझायनर्सची प्रभावी जोडी म्हणता येईल. भारतीय टेक्स्टाईलला नेहमीच जागतिक पातळीवर वरच्या स्थानावर नेण्यासाठी हे दोघेही प्रयत्नशील असतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर अग्रणी असलेल्या भारतीय डिझायनर्सच्या यादीत या दोघांचंही नाव अग्रणी राहिलेलं आहे.

फॅशनविश्वातील भूमिका आणि श्यामलचा एकत्रित प्रवास सुरू होण्याआधीपासूनच ते एकत्र होते.१९९९-२००० साली त्यांची फॅशन क्षेत्रातील वाटचाल सुरू झाली होती.या प्रवासाबद्दल श्यामल म्हणतो, ‘आम्ही टीनेजर असल्यापासून एकत्र आहोत आणि आम्ही तेव्हापासून क्रिएटिव्ह गोष्टीत कार्यरत राहिलो आहोत. फॅ शनच्या बाबतीत बोलायचं तरभूमिका पहिल्यांदा या क्षेत्राकडे आकर्षित झाली होती. आणि तिने ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी’मध्ये प्रवेश घेतला. त्यामुळे आमचा फॅशनच्या क्षेत्रातला प्रवास सुरू झाला.’ श्यामलच्या या क्षेत्रातील प्रवासाची गोष्ट भूमिका सांगते. ‘महाविद्यालयीन शिक्षणानंतर श्यामलला हैदराबादला पाठवण्यात आले होते. तिकडच्या हातमाग विणकरांशी सुसंवाद साधत असताना विणण्याच्या सुंदर कलेमध्ये त्याला रस वाटू लागला. आणि त्या वेळी आम्ही दोघांनी एकत्रित आमचं पाहिलं कलेक्शन तयार केलं’, असं सांगणारी भूमिका वयाच्या २०व्या वर्षी सुरू केलेल्या या प्रवासानंतर आम्ही कधीही मागे वळून बघितलं नाही, असं सांगते.

सतत डिझायनिंग आणि कलेक्शन सादर करत करत पुढे आमचं लेबल हळूहळू आकार घेत गेलं, असं ते म्हणतात. ‘फॅशन डिझायनर म्हणून प्रत्येक डिझायनरचा एक आवडता भाग असतो, त्यांचं स्वत:चं वैशिष्टय़ असतं. ‘फॅशन डिझायनर्स म्हणून आमच्या कामाद्वारे आम्ही जगातील विविध भागांतील हजारो दक्षिण आशियाई महिलांना त्यांच्या मुळांशी आणि त्यांच्या देशातील हस्तकलांशी जोडू शकलो ही मोठी गोष्ट आहे’, असं ते सांगतात. ‘जुन्या हस्तकलांचा वापर करून आम्ही आधुनिक पद्धतीने तयार कपडे तयार केले आहेत. त्यामुळे आधुनिक राहणीमानाची आवड असलेल्या स्त्री-पुरुषांनाही आम्ही डिझाईन केलेले कपडे परिधान केल्यानंतर एकाच वेळी पारंपरिकताही जपता येते आणि आधुनिकतेचा आनंदही मिळतो. आमच्या कामाचा हा भाग खूप आनंददायी असतो. आमच्या डिझाइन्सच्या माध्यमातून आम्ही आपल्या देशातील हस्तकला जगभरात पोहोचवायचा प्रयत्न करतो आहोत. हे करत असताना हजारो कारागीरांसाठी रोजगार-नोकरी उपलब्ध होते आहे, असं श्यामल आणि भूमिका सांगतात.

या दोघांनी सादर केलेलं वेडिंग कलेक्शन हाही नेहमीच चर्चेचा विषय असतो. व्होग वेडिंग शोमध्ये त्यांनी सादर केलेली दोन्ही कलेक्शनलोकांचं लक्ष वेधून घेणारी ठरली होती. ‘मेमॉईर्स ऑफ महाराणी’ आणि ‘रेनेसान्स म्युज’ ही दोन कलेक्शन्स त्यांनी सादर केली होती. पहिलं कलेक्शन हे त्या काळी असलेले राजे-रजवाडे, त्यांच्या राणी-महाराणी यांचे कपडे, जीवनशैली यापासून प्रेरित होतं, तर दुसरं कलेक्शन हे रेनेसान्सच्या काळापासून प्रेरित होतं. या कलेक्शनबद्दल ते म्हणतात, हे कलेक्शन रेनेसान्स काळावरून प्रेरित आहे. जिथं कला, वास्तुकला, संगीत आणि वस्त्रं हे मध्ययुगीन काळापासून आधुनिकतेपर्यंत पुनर्जन्म घेत होतं. या काळाचं जन्मस्थान असलेल्या फ्लॉरेन्स ठिकाणापासून सुरुवात करत आम्ही हे कलेक्शन सादर केलं आहे. जरदोझी भरतकाम, चमकदार रेशीम दोऱ्याने केलेलं श्यामल आणि भूमिका यांचं काम त्यांच्या सिग्नेचर कटवर्कमधून प्रभावीपणे दिसून येतं.

फॅशन डिझायनिंगसारख्या ग्लॅमरस क्षेत्रात काम करताना वरून कितीही छान वाटत असलं तरी अनेक उतार-चढाव हे येतच असतात. तसेच श्यामल आणि भूमिका यांच्याही प्रवासात आले. ‘आमच्या या प्रवासामध्ये अनेक गोष्टी घडल्या आणि घडतही राहतील, एक प्रकारे आजवरचा प्रवास हा साहसी होता असं म्हणायला हरकत नाही, असं ते दोघंही आवर्जून सांगतात. दोन वेगवेगळ्या जगांना एकाच कलेतून जोडणारं हे काम साहसी आहे. एक दिवस आम्ही दुर्गम खेडोपाडय़ांतील कारागीरांबरोबर काम करत असतो. त्यांच्याकडून आम्हाला कोणत्या पद्धतीचे डिझाईन्स हवेत ते करून घेत असतो. तर दुसऱ्याच दिवशी आम्ही जगाच्या त्या टोकावर लॉस एंजेलिसमध्ये याच कारागीरांनी घडवलेले कपडे घेऊन स्टाईलिंग करतो, यापेक्षा साहसी, क्रिएटिव्ह काय असू शकतं, असा सवाल ते करतात.

अर्थात, फॅशन डिझायनिंग म्हणजे फक्त आपल्या कल्पना, कला कपडय़ांवर उतरवून ते लोकांसमोर आणणं इतकंच नाही, हेही ते स्पष्ट करतात.फॅशन इंडस्ट्रीतील एवढे चढउतार अनुभवल्यानंतर, यशापयश चाखल्यानंतर हे दोघेही या क्षेत्रात येणाऱ्या तरुणांना आवर्जून सांगतात की, तुमची संस्कृती, तुमची मुळं सोडू नका. इतरांचं अनुकरण न करता तुम्ही स्वत:चं काय देऊ शकता, यासाठी प्रयत्नशील राहा, असं ते सांगतात. आपल्याकडे निसर्गाने ज्या अमाप गोष्टी दिल्या आहेत, त्याचा डिझायनिंगमध्ये वापर करा. फॅशन डिझायनर म्हणून काम करताना तुमचं कलेक्शन हे प्रभावीच असलं पाहिजे, ते तुमचंच असलं पाहिजे. तुम्ही केलेलं काम इतरांकडे मिळणार नाही, दिसणार नाही, इतक्या काळजीपूर्वक, ध्यास घेऊन प्रभावी काम करा. तरच तुमचं कलेक्शन पाहणाऱ्याला स्वत:कडे ओढून घेईल, असं त्यांनी सांगितलं. याशिवाय, फॅशन इंडस्ट्रीत येताना केवळ फॅशन डिझायनिंगचं तांत्रिक शिक्षण असून भागत नाही, तर या व्यवसायाचे अन्य घटकही समजून घेऊन त्याचंही ज्ञान घेऊन या व्यवसायात उतरा. आणि या ग्लॅमरस जगात वावरतानाही नम्रता कायम मनात असू द्या, असं दोघंही आग्रहाने सांगतात.

viva@expressindia.com