फुटबॉलची नशा केवळ टीव्हीवर सामने बघण्यापुरती मर्यादित नाही. ‘फिफा गेम’नं सध्या अनेकांना वेड लावलंय. व्हच्र्युअल जगातल्या फिफा फीवरबद्दल..
ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्डकपची लाट जगाच्या कानाकोपऱ्यात पसरली आहे. जगातले जवळजवळ  ७५ टक्के लोक या वेळचा वर्ल्डकप बघताहेत असा अंदाज आहे. पण फुटबॉलचं हे वेड केवळ टीव्हीवर मॅच बघण्यापुरतं मर्यादित नाही. त्यांनी आपल्या पुऱ्या लाइफस्टाइलचा ताबा घेतलाय. सध्या मोठय़ा आयटी कंपन्या आणि कॉर्पोरेट ऑफिसमधूनसुद्धा फिफाची चर्चा ऐकू येतेय. काही कंपन्यांनी तर आपल्या कर्मचाऱ्यांसाठी फिफावर आधारित क्विझ घ्यायला सुरुवात केली आहे. काही कंपन्या आजच्या सामन्याचा अंदाज विचारतात आणि निकालाचा अंदाज बरोबर सांगणाऱ्या कर्मचाऱ्याला दुसऱ्या दिवशी छोटंसं बक्षीस दिलं जातं. काही कंपन्या तर क्विझच्या विजेत्याला टॅबलेट किंवा फोन द्यायच्या तयारीत आहेत.
काही जणांच्या बाबतीत मात्र फुटबॉल क्रेझ फक्त फिफा वर्ल्डकपपुरती मर्यादित नाहीये. अशा फुटबॉलच्या डायहार्ट फॅन्ससाठी फिफा १२ महिने २४ तास सुरूच असतो. ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण फिफा वर्ल्डकप सुरू असो की नसो, फुटबॉल लव्हर्ससाठी फिफा गेम नेहमी त्यांच्या साथीला असतोच. ‘इए स्पोर्ट्स’चा फिफा २०१४ गेम तरुणाईमध्ये सध्या प्रचंड लोकप्रिय आहे. हा गेम ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने खेळता येतो. रिअल फुटबॉल, त्यातल्या टीम्स, त्यातले खेळाडू हे सगळं जसंच्या तसं या फिफा गेममध्ये आहे. त्यामुळे वेगवेगळ्या क्रीडा विश्लेषकांनी टीव्हीवरच्या टॉक शोमधून सांगितलेल्या खऱ्याखुऱ्या सामन्याच्या टॅक्टिक्स, ट्रिक्स या गेममध्ये खरोखर इम्प्लीमेंट करता येतात, असं हा गेम खेळणाऱ्यांचं म्हणणं आहे.
हा गेम प्ले स्टेशन, एक्सबॉक्स, निन्टॅन्डोज आणि विंडोज, अँड्रॉइड अशा अनेक प्लॅटफॉर्म्सवर खेळता येतो, त्यामुळे अनेकांना हा सोयीचा खेळ वाटतो. अनेकांना या खेळानं वेडं केलंय. ते सतत हाच गेम खेळत असतात.
 फिफा २०१४ गेमचा असाच एक अ‍ॅडिक्ट आदित्य रास्ते सांगतो, ‘सात ते आठ वर्षांपासून हा फिफा न चुकता खेळतोय. फिफा खेळण्यावरून घरी कितीही राडे झाले तरी त्याकडे लक्ष न देता आजही तेवढय़ाच इंटरेस्टनी फिफा खेळतो.’ इंजिनीअिरग करणारा आदित्यच्या मते हा गेम म्हणजे त्याच्यासाठी स्ट्रेसबस्टर आहे. ‘फिफा हे माझं पहिलं प्रेम आहे’, तो आवर्जून सांगतो.
दहावीच्या परीक्षेनंतर ‘फिफा’ गेम खेळायला मिळावा म्हणून घरच्यांशी भांडून लेटेस्ट लॅपटॉप घ्यायला लावणारा प्रसन्न वैद्य म्हणतो, ‘एकदा मित्रांसोबत फिफा खेळायला सुरुवात केली की तीन-चार तासांची निश्चिती सहज झालीच म्हणून समजा. फिफासारखी मजा दुसऱ्या कुठल्या गेममध्ये नाहीय.’ प्रसन्न कॉलेजच्या फुटबॉल टीममधून खराखुरा मैदानावरचा खेळही खेळतो. पण व्हच्र्युअल जगातला हा गेम त्याला खरं वेडं करतो. ज्या एकाग्रतेने, मन लावून ही मुलं गेम खेळतात, ते बघून त्यांच्या या प्रेमाची खात्री पटते. फिफाप्रेमी मुलांचे हे विचार ऐकून त्यांच्या गर्लफ्रेंड्सना मात्र गेमविषयी जेलसी वाटली तर यात नवल नाही!