जीजिविषा काळे

बदलाची गंमत अशी आहे की तो हवासा वाटत असतो, पण फक्त अपल्याला हवा तसाच आणि तेवढाच. पण असे कुठे असते का? एकदा का आपण त्यास स्वाधीन व्हायचे ठरवले की मग जे येईल त्याला आपल्याला सामोरे जावे लागते. मग माझ्या मनात विचार येऊ  लागले, की ज्या गोष्टीचा आता अपल्याला एवढा अनुभव आहे, ती गोष्ट अशी सोडून जावी का?

प्रिय वाचक मित्र,

सध्या मी नवीन नोकरी सुरू केली आहे. खरंतर माझ्या आयुष्यातली ही पहिलीच नोकरी आहे. याआधी मी फ्रीलान्स काम करत होते. म्हणजे काय? की एक कंपनी, एक बॉस, एक ऑफिस असे नाही. मग कधी कधी सलग ६-६ महिने काम मिळायचे, कधी अख्खा महिना काहीच काम नाही. सुदैवाने गेली ३ वर्षे काम नाही अशी वेळ आली नाही. उलट वर्षभर काम करून एक महिना हक्काची सुट्टी मी घेत होते, पण आता हे सगळं बंद. आता रोज सकाळी उठून एक ठरलेल्या वेळेची लोकल घेणे, मग एवढे एवढे तास ऑफिसमध्ये बसून काम करणे वगैरे वगैरे चालू  झाले आहे. नोकरी घेण्याचे कारण एवढेच की माझ्याच कामासंबंधी मला नवीन काही करून बघायचे होते. पूर्वीचे काम आता बाराखडीसारखे पाठ झालेले, खरेतर नवीन सुरू कशाला करा?, असेही मनात येऊन गेले. पण माझ्या काही मित्रांनी मला खूपच प्रोत्साहन दिल्याने मी ही नोकरी स्वीकारली. आता दोन अठवडे झाले आहेत रुजू होऊन आणि हळूहळू मी इथे रुळायला लागले आहे.

हे सर्व सांगण्याचे कारण काय? तर मला तुमच्याशी बोलायचे आहे. ‘बदल’ या विषयावर. आयुष्यात तुम्हाला हवा असो वा नको, बदल होतच राहणार. अभ्यास, नाती, जागा अशी अनेक उदाहरणे आहेत, पण सध्या आपण उदाहरण मात्र माझे घेऊ ..

माझे सांगायचे झाले तर मी एक अशी व्यक्ती आहे जिला सारखा बदल लागतो. सतत काहीतरी नवीन लागते. त्यामुळे फ्रीलान्सकडून नोकरीच्या वाटेने जाताना मला खूप भीती वाटत होती. पण मी नोकरी हाच बदल आहे हे स्वीकारले आणि मला जरासे बरे वाटले. पण तेही तात्पुरतेच, कारण मग बाकी गोष्टी दिसू लागल्या. बदलाची गंमत अशी आहे की तो हवासा वाटत असतो, पण फक्त अपल्याला हवा तसाच आणि तेवढाच. पण असे कुठे असते का? एकदा का आपण त्यास स्वाधीन व्हायचे ठरवले की मग जे येईल त्याला आपल्याला सामोरे जावे लागते. मग माझ्या मनात विचार येऊ  लागले, की ज्या गोष्टीचा आता अपल्याला एवढा अनुभव आहे, ती गोष्ट अशी सोडून जावी का? नव्याने परत काही शिकत बसावे का? आपल्याला नाही जमले तर? लोकांना आपण आवडलो नाही तर? तिथे बरेच श्रीमंत लोकही येतात. आपले जमेल का त्यांचाशी? लोकलने प्रवास करायचा आता रोज? का करायचंय मग हे सगळं? आणि असे सतराशे साठ प्रश्न. उत्तर खरेतर काहीच नव्हते.

या वागण्याला इंग्रजीमध्ये फाइट ऑर फ्लाइट असे म्हणतात. माणूसप्राणी पूर्वी जंगलात शिकारीला जात असे, तेव्हा अनेक वेळा कोणता ना कोणता धोका असे. आपले शरीर अशा तणावपूर्ण परिस्थितीत या दोन पद्धतीने प्रतिक्रिया देते. ‘फाइट’ म्हणजे सामोरे जाणे नाहीतर ‘फ्लाइट’ म्हणजे पळ काढणे. आता समजा वाघच समोर आला तर फाइटचा प्रश्न येतच नाही. काहीजणांची संख्या वगळता सध्याचा माणूस हा शिकार करत नाही. मग का बरे आपण अजूनही अशा प्रकारे प्रतिक्रिया देतो? कारण ही प्रतिक्रिया परिस्थितीनुसार नसून तणावानुसार दिलेली असते. आपल्या मेंदूला जर का वाटलं की आपण ‘सेफ/सुरक्षित’ नाही आहोत, तर मग हे असे विचार येऊ  लागतात ज्याने आपल्याला वाटते नको सामोरे जायला. सोडून देऊ . कुणाला इथे फरक पडणार आहे? कुणाला पडणार आहे? कुणाला? आपल्यालाच! मेंदूचे काम आहे अपल्याला येणाऱ्या संकटापासून सावध करणे आणि त्यासाठी मेंदू आपल्याला त्या गोष्टीच्या फक्त वाईटच बाजू दाखवतो.

तेव्हा नोकरीचा निर्णय घेतल्यानंतर माझेही तेच झाले, पण मग मी काय केले? त्याच गोष्टीच्या वेगळ्या बाजू बघायला सुरुवात केली. लोक अनोळखी आहेत, माती खाल्ली तरी ती त्याच लोकांमध्ये राहील. वेळच्या वेळी पगार येईल. आणि करून बघायला काय हरकत आहे? वाईट काम केले तर ते काढतील, आपल्याला जमत नाहीये बुवा, असे वाटले तर आपण सोडून देऊ . पण करून तर बघू. काहीतरी नवीन शिकायची संधी समोरून चालत येत आहे तर ती घेऊन तर बघू. लोकलने प्रवास करून तर बघू. लोकांबद्दलचे पूर्वग्रह सोडून तर बघू. स्वत:ला एक संधी देऊन तर बघू.. बाळ असताना आपल्याला चालता येत नाही, आपण हळूहळू शिकतो. दोन आधिक दोन चार असतात हेही आपण शिकतो. फ्रीलान्समध्ये जी कामे के ली तीही काय आपण आईच्या पोटातून शिकून थोडीच आलो होतो. इतका वेळ माझा मेंदू मला सांगत होता, आता मी त्याला समजावू लागले. शांत करू लागले आणि आम्ही ठरवले ‘टू टेक इट बाय द डे’ म्हणजे प्रत्येक दिवस हा नव्याने स्वीकारू. पूर्वग्रह, न्यूनगंड, अतिविचार हे बाजूला ठेवून जे समोर येते त्याचा खुल्या मनाने अनुभव घ्यायचा आहे.

आता बघू पुढे काय होते. यातून मला काय सांगायचे आहे हे तुम्हाला समजलेच असेल याची मला खात्री आहे. पण त्याबरोबर मी हेही सांगेन की जेव्हा धोका खूप मोठा वाटत असेल तेव्हा मेंदूचे ऐका. दुर्लक्ष करू नका. बाकी तुमची खुशाली कळवा. काही लोकांच्या परीक्षा सुरू झाल्या असतील किंवा जवळ आल्या असतील. अभ्यास करा, पण तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.

जाता जाता आजची टीप – दिवसातून तासभर फोन किंवा कोणतेही साधन वापरू नका आणि मौन बाळगून बघा. स्व-संवाद खूप महत्त्वाचा असतो, त्याकडे दुर्लक्ष करू नका.

कळावे,

जीजि