काहीसा उशिरा का होईना, पण आलाच पाऊस आणि मग पावसात भिजण्याचे, मनसोक्त फिरण्याचे ओलेशार मनसुबे रचू लागले. बाहेर वातावरण हिरवंगार झालंय, बाजारात गरमागरम भुट्टे दिसू लागलेत आणि मनाला नवतेची पालवी फुटलीये. दरवर्षीच्या पावसातली वन डे पिकनिक नेहमीचीच, तरी आता नेहमीची ठिकाणं नकोत बाबा! असं वाटतंय ना? माथेरान, पळसदरी, गोराई-अर्नाळा, अलिबाग, लोणावळा-खंडाळा नाही तर इत्यादी..इत्यादी नेहमीचेच. पण तेच ते करण्यापेक्षा जरा नव्या वाटा शोधायला हव्यात.
एखादं ठिकाण पावसाळी पिकनिक स्पॉट म्हणून थोडंसं जरी प्रसिद्ध पावलं तरी मग तिथं दर पावसाळी नुसती जत्राच भरते आणि मग सुरू होते तेच ते.. तेच ते. हल्लीच्या वर्षांसहलींच्या स्पॉटवर एक नजर टाकली तर केवळ बाजारबुणग्यांची गर्दी दिसते. अगदी वेफर्स-पॉपकॉर्नपासून झुणका-मटण भाकरीपर्यंत आणि मग कोल्ड्रिंकपासून हॉट ड्रिंक्सपर्यंत.. इथे अगदी सर्व काही मिळू लागतं. आणि मग गर्दी वाढतच जाते. वाढणाऱ्या गर्दीसोबत गैरप्रकारांमध्येसुद्धा वाढ होते. आणि मग या वर्षांसहली म्हणजे आनंद, निवांतपणा हे समीकरण बदलून धांगडधिंगा, दारूच्या पाटर्य़ा असं होऊन जातं. असे सो कॉल मॉन्सून पिकनिक स्पॉट म्हणजे मवाल्यांचा अड्डा होतो. तिथली अस्वच्छता, गोंगाट याच्या जोडीला तिथल्या अव्वाच्या सव्वा किमतींनी जेरीस यायला होतं. तरुणांचं टोळकं आणि मुलींची छेडछाड हे तर नित्याचंच! त्यासोबत कपडे बदलणे, स्वच्छतागृहांची वानवा अशा एक ना अनेक समस्या उभ्या राहतात.
स्वत:ला जपून आणि या गजबजाटापासून दूर जर अशा वर्षां सहलींचा आनंद लुटायचा असेल, तर आपल्या आजूबाजूला अशी बरीच ठिकाणं असतात ज्यांच्याकडे बघायला नेहमीच्या धबडगाडय़ात आपल्याला सवडच झालेली नसते. अशी ठिकाणं धुंडाळायची तर एक माफक सौंदर्यदृष्टी हवी, सोबतीला हवा कोसळणारा पाऊस आणि मुख्य म्हणजे डोळे उघडे हवेत.
ट्रेनमधून दिसणारा मुंब्रादेवीचा डोंगर, बसमधून जाताना दिसणारा घोडबंदर रोडचा परिसर, टिटवाळ्याच्या पुढे-मागे शहाड, दिवा-कोपरजवळचं शेताडीतील शिवमंदिर. उत्तन-भाईंदर येथील वेलंकणी चर्च अशा एक ना अनेक जागा पावसाळ्यात खुल्या हाताने आपलं निसर्गसौंदर्य उधळत असतात.
अशीच काही ठिकाणं इथे देत आहोत. जिथे तुरळक गर्दी असेल कारण ती आता कुठे नावारूपाला येताहेत आणि ट्रेन बसने सहजच तिथे जाऊन येणं शक्य आहे. यात नोंदवलेली सर्व ठिकाणं रेल्वे-बसमार्गाना जोडणारी असली तरीही स्वत:चे वाहन सोबतीला असणे कधीही चांगले. प्रवासाचा वेळ वाचतो. वाटेत हवे तेव्हा हवे तेथे थांबता येतं.
बोर्डी बीच
डहाणू बीचसारखंच आणखी एक बीच आहे बोर्डी बीच. डहाणू, ठाणे येथून सुटणाऱ्या एसटीने घोलवड येथे उतरून रिक्षाने ५ ते ७ मिनिटांत बोर्डीचा किनारा गाठता येतो. नारळ, पोफळीच्या बागा आणि सुरूची झाडे, मऊशार वाळू, फेसाळणाऱ्या लाटा आणि संयत कोसळणारा पाऊस म्हणजे अनोखी मज्जाच.
कोंडेश्वर
बदलापूर आता वाढत्या शहरीकरणामुळे हाऊसफुल्ल झाले असले, तरी कोंडेश्वर मात्र अजून तरी या शहरी गजबजाटापासून अस्पर्शच आहे. बदलापूर स्टेशनातून रिक्षा अथवा मिळेल त्या वाहनाने कोंडेश्वर गाठता येते. कोंडेश्वरच्या मंदिरात दर्शन घ्यावे आणि तेथील धबधब्याखाली मनसोक्त भिजून जावे. चहा आणि भजी जवळच्या हॉटेलातून पोटभर मिळण्याची सोय येथे आहे. मात्र जेवणासाठी थोडे बाहेर पडून बदलापूरजवळची हॉटेल्स धरणे उत्तम. मात्र जोडीला पाऊस असेल तर कोंडेश्वर धबधबा म्हणजे स्वर्गच आणि तिथलं निसर्ग सौंदर्य आणि शांतता अवर्णनीयच!
वज्रेश्वरी
बोरिवली, कल्याण, वसई, ठाणे, भिवंडी तसेच विरारमार्गे एसटीने वज्रेश्वरीला पोहचता येते. अप्रतिम निसर्गसौेंदर्य, वर डोक्यावर कोसळणारा थंडगार पाऊस आणि तेथील प्रसिद्ध गरम पाण्याची कुंडे असा तिहेरी योग येथील वर्षां सहलीचा आहे. कुंडाच्या जवळच वज्रेश्वरी मातेचे देऊळ आहे. येथील मूर्ती आणि देवळाची शोभा पाहण्यासारखी आहे. पावसाचा आनंद घेत येथील गरम पाण्याच्या कुंडात मनसोक्त डुंबून घ्यावे.
शिळफाटा-खिडकाळी
पनवेल, वाशी, चेंबूर, मुलुंड तसेच ठाणे, कल्याण, भिवंडीमार्गे शिळफाटय़ाला अगदी तासाभरात पोहोचता येते. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बसेस, खासगी रिक्षा, जीप-टेम्पो इत्यादी कोणत्याही प्रकारे शिळफाटय़ावर अगदी सहज पोहोचता येते. कोसळणारा पाऊस आणि तुफान निसर्गसौंदर्य याच्या सोबतीने हा घाटरस्ता भटकंतीने पार करून आलो की आपल्याला घोळ गणेश मंदिराकडे जाणारा रस्ता दिसतो. पायऱ्या चढून गेलो की डोंगराच्या कपारीत गणरायाचे मंदिर दिसू लागते. तेथून जवळच असलेले खिडकाळी हे ठिकाण रिक्षा/बसने गाठता येते. येथे पांडवांनी शिवलिंगाची स्थापना केलेले हेमाडपंथी सुंदर मंदिर आहे आणि समोर आहे पांडव तलाव. जवळच्याच   देसाई खाडी पुलावरून हायवे न्याहाळता येतो आणि फार ढगाळ वातावरण नसेल तर सूर्यास्ताचे नयनरम्य दर्शन घडते. सोनेरी प्रकाशातून उजळणारी खाडी यावेळी अवर्णनीय भासते.
डहाणू बीच
पावसाळा आणि बीच म्हटले म्हणजे हाऊसफुल्ल. मग तो अगदी गोराई असू द्या नाही तर अलिबाग येथील अक्षी-नागाव. मग एक दिवसाच्या वर्षांसहलीत शांत निवांतपणा कुठे मिळणार, असा प्रश्न ज्यांना पडतो खास त्यांच्यासाठीच आहे हा डहाणूचा बीच. पश्चिम रेल्वेच्या डहाणू रोड स्थानकावरून डहाणू बीच रिक्षाने गाठता येते. धो-धो पाऊस, चिंब भिजलेले आपण आणि धम्माल किनारा. निसर्ग सौंदर्याने आधीच डहाणू गावाला भरभरून दिलं. पावसाळ्यात तर याची परमावधीच. येथील फळबागांचे सौंदर्य अफाट आहे. छान बीच आहे, रूपेरी वाळू आहे आणि सोबतीला ओला पाऊस आहे, मग इथली बहार काय वर्णावी?
जव्हार-कोपरा धबधबा
जव्हार हे थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. येथील पावसाळ्यातील मुख्य आकर्षण आहे जयसागर धरण, हे धरण पावसाळ्यात मनोहारी भासते. तेथून जवळच असणारा (१८ कि.मी.) प्रसिद्ध ‘कोपरा’ धबधबा. तीनशे साडेतीनशे फूट उंचीवरून कुंडात कोसळणारा हा धम्माल धबधबा म्हणजे निसर्गाची सॉल्लीड किमया आहे.
वर्षां सहलींसाठी ही ठिकाणे केवळ प्रातिनिधिक आहेत. अशी अनेक ठिकाणे मुंबईच्या जवळपास सापडतील. मात्र अनोख्या ठिकाणी फिरताना एकटय़ा दुकटय़ाने फिरणे टाळा. तेथील सुचनांचे अवश्य पालन करा. पावसाळा आनंदाचा आणि उत्साहाचा, मात्र जादा उत्साहाला आवर घालणे म्हणजे वर्षांसहल आनंदाची करणे.
स्वत:ला जपा आणि पावसाच्या या नवलाईचा मुक्त दिलाने आनंद घ्या, मात्र डोळे उघडे ठेवून..!