पावसाच्या सरी अजूनही सुरू आहेत, पण सोबतच गुलाबी थंडीचे वारेसुद्धा वाहायला लागले आहेत. पावसाळा आणि हिवाळ्याचं हे समीकरण झालेली थंडी हळूहळू पडायला लागली आहे. गेल्या काही वर्षांत हिवाळी फॅशनचा चेहराच बदलला आहे. स्वेटर्स, मफलर आणि शालींसोबत आता हुडीने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ऊब आणि स्टाईल यांचा छान मेळ साधणारा हा प्रकार आज केवळ तरुणांच्याच नव्हे तर सर्व वयोगटातील लोकांच्या वॉर्डरोबमध्ये स्थिरावला आहे. कॉलेजला जाणारे विद्यार्थी, आयटी ऑफिसमधील तरुण प्रोफेशनल्स, जिमला जाणारे फिटनेस उत्साही… सगळ्यांच्या फॅशनमध्ये हुडी सहज मिसळल्याचे दिसून येते. हिवाळ्यात उबदार राहण्यासाठी असलेली हुडी आज ‘कॅज्युअल-चिक स्टाइल स्टेटमेंट’मध्ये बदलली आहे.
हुडीचा उगम अर्थातच अमेरिका आणि इतरत्र देशांमध्ये जिथे वर्षभरच थंडीचं प्रमाण बऱ्यापैकी असतं तिथे झाला. रोजच्या रुटीनमध्ये खुल्या वातावरणात काम करण्यासाठी हुडीचा वापर सुरू झाला. न्यूयॉर्कच्या स्ट्रीट कल्चर, हिप-हॉप, ग्राफिटी आणि स्केटबोर्डिंग संस्कृतीच्या लाटेत हुडी प्रकार कूल आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक बनला. हॉलीवूड चित्रपटांनीही या ट्रेंडला अधिक बळ दिले. विविध चित्रपटांमधील हुडी घातलेली पात्रे भरपूर लोकप्रिय होत गेली.
एका विशिष्ट समुदायाचं म्हणजेच खेळाडू, कामगार इत्यादींचे प्रतिनिधित्व करण्यासाठी हुडी घातलेली पात्रं चित्रपटांमध्ये दाखवली जायची. नंतर नायके, आदिदास, पुमा, रिबॉक अशा जागतिक स्पोर्ट्स ब्रँड्सनी हुडीला मुख्य प्रवाहातील फॅशनमध्ये आणले. लोकप्रिय गायक, रॅपर्स, क्रीडा व्यक्तिमत्त्वे हुडीमध्ये दिसू लागली आणि हा पोशाख म्हणजे ‘कम्फर्ट आणि स्टाइल’चा आंतरराष्ट्रीय फॉर्म्युला बनला. आजच्या काळात हुडी स्ट्रीट वेअरपासून लक्झरी ब्रँड्सपर्यंत पोहोचला आहे. रनवेवरील डिझाइन कलेक्शनमध्येही हुडी आपली छाप सोडताना दिसते.
भारतात लोकप्रिय स्पोर्ट्स ब्रँड्समुळे हुडीचा ट्रेंड वाढतच गेला. हुडी आणि डेनिम या दोन्ही गोष्टी २००० सालापासून भारतातील तरुण वर्गाचं स्टाईल स्टेटमेंट बनल्या आहेत. फक्त थंडी नसली तरीही एसी क्लासरूम्स, मित्रवर्गाबरोबर आऊटिंग, चित्रपटगृहे आणि ऑफिसेसमुळे हुडी आता ‘ऑल – सीझन कम्फर्ट वेअर’ झाली आहे.
भारतीय बाजारपेठेत हुडीचा वाढता प्रभाव
२०१४-१५ नंतर ई-कॉमर्सच्या प्रभावामुळे हुडी बाजारात जबरदस्त वाढ झाली. मिंत्रा, अजिओ, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, बेवकूफ, द सोल्ड स्टोर , एच. एन. एम. अशा असंख्य प्लॅटफॉर्म्सने हुडी सहज उपलब्ध करून दिल्या. ५०० रुपयांंपासून ते ५००० रुपयांपर्यंत विविध किमतीत हुडीजचे पर्याय मिळू लागले.
होमग्रोन ब्रँड्सची एंट्री
अर्बन मंकी, सुपरड्राय इंडिया, एचआरएक्स, दुर्मीळ ससा, जेवॉकिंग यांसारख्या भारतीय किंवा भारतात लोकप्रिय झालेल्या स्ट्रीटवेअर ब्रँड्सनी ‘हुडी म्हणजे प्रीमियम स्ट्रीट स्टाइल’ हा समज अधिक बळकट केला.
पॉप कल्चरचा प्रभाव
ओटीटी माध्यमांवरील तरुण पात्रे, स्टँड-अप कॉमेडियन्स, युट्यूबर्स आणि इन्फ्लुएन्सर्स हे हुडीमध्ये सतत दिसू लागल्याने हा ट्रेंड अधिकच दृढ झाला. क्रिकेट व फुटबॉल टीम मर्चेंडाईज, कॉलेज फेस्ट हुडीज, टीम हुडीज… या संस्कृतीने फॅशनसोबत भावनिक कनेक्टही निर्माण केले.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे महानगरांबरोबरच छोट्या-छोट्या शहरांमध्ये हुडीची मागणी झपाट्याने वाढते आहे. तरुणवर्ग हुडीला फॅशन आयडेंटिटी म्हणून स्वीकारत आहे. यामुळे हा ट्रेंड केवळ महानगरांपुरता मर्यादित राहिला नाही.
हुडीचे प्रकार : आज काय ट्रेंडमध्ये?
कार्डिगन हुडी – कॅज्युअल, गोल नेक आणि हुडेड झम्पर अशा प्रकारची ही हुडी असते. हा प्रकार तुम्ही थंडीत किंवा उन्हाळ्यातही आऊटिंगला सुद्धा पर्याय म्हणून वापरू शकता, कारण याचे कापड थोडे पातळ असते.
क्लासिक पुलओव्हर हुडी – सिम्पल, क्लीन आणि सर्वकालिक लोकप्रिय असा हा हुडीचा प्रकार आहे.
झिप-अप हुडी – लेयरिंगसाठी उत्तम पर्याय म्हणून ओळखला जाणारा हा प्रकार टी-शर्ट्ससोबतही कॅरी करता येतो.
ओव्हरसाइज्ड हुडी – आजच्या तरुणांचा हुडीचा हा फेव्हरेट प्रकार कम्फर्ट आणि स्टाइल दोन्ही मिळवून देतो.
क्रॉप हुडी – फॅशन – फॉरवर्ड लूकसाठी हा प्रकार लोकप्रिय ठरतो आहे.
ग्राफिक / कॅरेक्टर हुडी – व्यक्तिमत्त्व आणि आवडनिवड प्रदर्शित करणाऱ्या प्रिंट्स असलेल्या या हुडीज सध्या ट्रेंडमध्ये आहेत.
को-ऑर्ड हुडी सेट्स – ट्रॅव्हल लूक, एअरपोर्ट लूक किंवा कॅज्युअल आऊटिंगसाठी हा प्रकार सध्या बेस्ट मानला जातो.
हुडी स्टाईलिंग टिप्स
हुडी आणि डेनिम जॅकेट यांचे पेअरिंग सध्या स्मार्ट फॅशन म्हणून प्रचलित आहे.
हुडी आणि प्लीटेड किंवा डेनिम स्कर्ट यांचे पेअरिंग तुम्हाला फ्युजन स्टाइल मिळवून देते.
मोनोक्रोम हुडी को-ऑर्ड्स तुम्हाला एअरपोर्ट लूक किंवा प्रवासासाठी कम्फर्टेबल फॅशन ठरतात.
हुडी आणि कार्गो पॅण्टचे पेअरिंग तुम्हाला ट्रेंडी स्ट्रीट-स्टाइल लूक मिळवून देईल.
मिनिमल अॅक्सेसरीज, स्नीकर्स किंवा बूट्स आणि एक स्मार्ट बॅकपॅक या ॲक्सेसरीज तुम्ही हुडीला जोडल्यात तर तुमचा पूर्ण लूक तयार!
हुडी आज तरुणांसाठी केवळ कपडा नाही, तर ‘कॉन्फिडंट आणि आपल्या वाइबवर जगणारे व्यक्तिमत्त्व’ दर्शवणारा फॅशन कोड बनला आहे. अर्थातच, हुडी फक्त स्वेटर प्रकार आणि त्या फॅब्रिकपुरताच मर्यादित राहिलेला नाही. आंतरराष्ट्रीय रेड कार्पेटवर पारंपरिक आणि स्टायलिश कापडात हुडी प्रकार प्रचलित होताना दिसतो आहे. जॉर्जिया अँड्रियानी, मायली सायरस, बेला हदीद, एडिसन रे आणि काइली जेनरसारख्या लोकप्रिय कलाकारांनी हुडीजला लोकप्रियता मिळवून देत फॅशनची परिभाषाच बदलली आहे.
सेलिब्रिटींच्या हुडी स्टायलिंगने एक मोठी क्रांती घडवली आहे, जिम वेअर आणि कॅज्युल वेअर ते हाय-फॅशन स्टेटमेंट पीसमध्ये हुडी रूपांतरित झाली आहे. या सेलिब्रिटींनी फेस-फ्रेमिंग हुडीची कला लोकप्रिय केली आहे. स्कार्फ, ओढणी आणि हुडी याचे परफेक्ट कॉम्बिनेशन या प्रकारात दिसते. फेस फ्रेमिंग हुडी हा प्रकार स्टायलिंग टूल आणि फॅशन स्टेटमेंट म्हणून सध्या प्रचलित आहे. त्यामुळे लुकमध्ये नावीन्य साधण्याबरोबरच फॅशनमध्येही वेगळेपणा साधणं शक्य झालं आहे.
मुख्यतः पुरुषांसाठी तयार केला गेलेला हा प्रकार आता मेन्सवेअर ट्रेंडी स्टाइलमध्ये पाहायला मिळतो. जिम, डेट, रोड ट्रिप किंवा कॅज्युअल ऑफिस डे अशा विविध निमित्ताने पुरुष एकच हुडी वेगवेगळ्या ॲक्सेसरीज आणि फुटवेअरचे स्टायलिश मिक्स-अँड-मॅच करू शकतात.
येत्या काळात फॅब्रिक, डिझाइन्स, टेक्श्चर आणि सस्टेनेबल फॅशनमुळे हुडीचे रूप आणखी विकसित होत जाणार आहे. त्यामुळे या हिवाळ्यात आपल्या वॉर्डरोबमध्ये कमीत कमी दोन-तीन स्टायलिश हुडीजसाठी जागा राखून ठेवा. कारण, हा ट्रेंड आता ऋतूपुरता मर्यादित न राहता, सर्व ऋतूंना शोभणारा फॅशन सिग्नेचर बनला आहे. हुडीने जगभरात आणि भारतात हिवाळी पोशाखाची व्याख्या बदलली आहे. ऊब आणि फॅशन यांचा सुंदर संगम असलेला हा परिधान आजच्या पिढीसाठी केवळ स्टाइल स्टेटमेंट नाही, तर ‘आय ॲम कम्फर्टेबल विथ माय ओन स्टाइल’ असा संदेश देणारा आत्मविश्वासाचा भाग बनला आहे.
हुडीची वाढती लोकप्रियता पाहता टेक्श्चर, फॅब्रिक, सस्टेनेबल मटेरियल आणि इनोव्हेटिव्ह डिझाइन्स याबाबतीत हुडीजवर सुरू असलेले प्रयोग त्याचा प्रभाव आणखी वाढवणारे ठरणार आहेत. त्यामुळे हुडीजने जर अजून तुमच्या आयुष्यात प्रवेश केला नसेल तर या थंडीच्या निमित्ताने तुमच्या फॅशन वॉर्डरोबमध्ये एक नाही तर दोन-तीन स्टायलिश हुडीजना जागा द्यायला हरकत नसावी.
