यतिश भट्ट

जगाची ‘योग राजधानी’ म्हणून प्रसिद्ध असलेले उत्तराखंडमधील ‘हृषीकेश’ हे शहर खवय्येगिरीसाठीही तेवढेच प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध देवस्थान असल्याने इथे मांसाहारी पदार्थाचे प्रमाण कमी असले तरी भारतातील समस्त शाकाहारी पदार्थाची रेलचेल इथे दिसून येते. गंगेच्या किनारी वसलेले असल्याने वातावरणातील चैतन्य इथल्या पदार्थामध्ये उतरले नाही तरच नवल! जगभरातील नावाजलेले पर्यटन ठिकाण असल्याने इथे लाखो पर्यटक भेट देतात. विशेषत: युरोपमधून दरवर्षी मोठय़ा प्रमाणात पर्यटक येत असतात. त्यामुळे या परदेशी पर्यटकांना संतुष्ट करण्यासाठी म्हणून हृषीकेशला भारतीय आणि युरोपीय खाद्यसंस्कृतीचा अनोखा मिलाफ झालेला आपल्याला पाहायला मिळतो.

लहानपणापासूनच खाण्यासाठी मी कायम उत्सुक असायचो आणि त्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्नही करत आलो आहे. मी घाटकोपरमध्ये राहतो त्यामुळे मी नेहमीच खाण्याचं नंदनवन असलेल्या आमच्या खाऊगल्लीशी जवळीक साधत असतो. मी अनेक वेगवेगळ्या रेस्टॉरंट्समध्ये जाऊन तिथल्या पदार्थाची चव घ्यायला सुरुवात केली. नंतर माझ्या कुटुंबीयांना आणि मित्रांना मी जाऊन आलेल्या रेस्टॉरंट्सचा आढावा द्यायला लागलो. यात मुख्यत्वे करून त्या त्या रेस्टॉरंट्समध्ये मिळणाऱ्या पदार्थाविषयी माहिती असायची आणि त्याचबरोबरीने त्या रेस्टॉरंट्सच्या आजूबाजूच्या परिसराबद्दलही मी त्यांना माहिती द्यायचो.

अनेक महिने असे रिव्ह्य़ूज दिल्यानंतर माझ्या लक्षात आले की आपण ठरावीक हॉटेल किंवा रेस्टॉरंट्सबद्दल देत असलेला रिव्ह्य़ू सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवा, मग त्या उद्देशाने मी आजकाल प्रभावी असलेल्या सोशल मीडियाचा वापर करायचे ठरवले. आणि स्वत:चे इन्स्टाग्राम पेज सुरू केले. माझा व्यवसाय आणि माझी आवड जुळवून घेणारे नाव मी माझ्या या पेजला दिले. ‘हंग्री इंजिनीअर’ या नावाने मी २०१६ साली ब्लॉग लिहायला सुरुवात केली.  पहिली पोस्ट मी ‘मॅगी’ या पदार्थाबद्दल टाकली आणि माझ्या इन्स्टाग्राम पेजवर साधारण ६००च्या आसपास पोस्ट पडल्या होत्या. त्याचबरोबरीने मग मी यूटय़ूबवरसुद्धा स्वत:चे चॅनल सुरू केले. फूडब्लॉग तर मी असेही लिहितोच. अगदी लहान असल्यापासून मला सांगितले गेले आहे, तुला जे आवडतं तेच कर. आणि म्हणून मी माझी आवड व्यवसायात बदलली आणि स्वत:चे कॅफे उघडायचे स्वप्नही पूर्ण केले.

खाण्याची आवड मला अनेक ठिकाणी घेऊन जाते. अलीकडेच उत्तर भारतात मी अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थाची चव घेण्यासाठी खाद्यभ्रमंती केली. हृषीकेश येथील गंगा नदीच्या किनारीच मी वास्तव्याला होतो. हृषीकेशसारख्या ठिकाणी फिरायला जाईपर्यंत माझे मत अगदी वेगळे होते. इथली संस्कृती आणि खाद्यसंस्कृती अस्सल भारतीय आहे. तिथल्या पदार्थाची चव ही मसालेदार आहे. पण नंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे तिथे येणारे लोक तिथल्या जीवनशैलीत, खाद्यपदार्थामध्येही विविध बदल घडवून आणत आहेत. आणि त्यामुळे पाश्चात्त्य संस्कृतीच्या पदार्थाचा त्यामध्ये समावेश होतो आहे.

हृषीकेशमधील वातावरण आणि तेथील परिस्थितीमुळे तिथे व्हेज जास्त प्रमाणात खायला मिळते. ते ऑर्गॅनिक असतं आणि म्हणूनच तिथे भारतीय आणि पाश्चत्त्य खाद्यपदार्थाची चव ही पूर्णपणे बदलते. इथल्या पदार्थाची चव घ्यायची तर भारतीय आणि पाश्चात्त्य अशा दोन्ही संस्कृतींच्या रेस्टॉरंट्सना भेट द्यायला हवी. मी तेच केले. इथल्या सफरीत मी दोन्ही प्रकारच्या पदार्थावर ताव मारला आहे. हृषीकेशमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रसिद्ध असलेल्या एका हॉटेलमध्ये गेलो होतो. ते हॉटेल केवळ भारतीय खाद्यपदार्थाचे प्रतीक नव्हते तर त्याचबरोबरीने हॉटेलची सजावट बघता त्यात संपूर्ण भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब उमटले होते. याच हॉटेलमध्ये जाताना मला एक माणूस दिसला ज्याचे लांब शेपटी असल्यासारखे केस होते. त्याने उठावदार असा मेकअप केला होता. त्याच्या भोवती खूपच गर्दी जमली होती आणि लोक त्याच्याबरोबर सेल्फीही घेत होते. तेव्हाच मी ठरवले आपण ‘चोटीवाला रेस्टोरंट’ इथे जायचेच. हे नाव त्याने तयार केलेल्या वातावरणाला अगदी न्याय देणारे आहे. त्या रेस्टॉरंटचे वातावरण खूपच पवित्र असे होते. मी तिथे गेल्यावर एक ‘व्हेज थाली’ ऑर्डर केली. कारण हातात आलेल्या मेन्यूकार्डमधून नक्की काय मागवावे हेच मला कळेना. त्या थाळीमध्ये मला सगळ्यात जास्त जो पदार्थ आवडला तो म्हणजे ‘डाल’. दिसायला अत्यंत साधी अशी ती डाळ असली तरी त्याची चव चाखल्या चाखल्या मी प्रेमात पडलो. मी त्या हॉटेलच्या मालकाशीही बोललो आणि ज्या शेफने ती डाळ बनवली होती त्याचे आभारही मानले. त्याला रेसिपीदेखील विचारली. उकडलेली चणाडाळ, टोमॅटो, आले, लसूण, कांदे आणि त्यावर तूप जिरे याचा तडका त्याने दिला होता. साधी पण चविष्ट अशी डाळ अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळते आहे.

दुसऱ्या दिवशी मी अगदी साधा ब्रेकफास्ट केला आणि एका मॉडर्न रेस्टॉरंटमध्ये भरपूर चीज आणि ब्रेड खायचा असे ठरवूनच गेलो. हॉटेलपासून काही अंतरावर चालत मी ‘चस्तंग कॅफे’मध्ये शिरलो. या कॅफेतील वातावरण आणि तिथला मेन्यू बघून मी हृषीकेशमध्ये आहे हेच पूर्णपणे विसरलो होतो. तिथे  ‘पिझ्झा’ ऑर्डर केला. पिझ्झाचं पीठ अगदी ताजं होतं. वरचे व्हेज टॉपिंग्सही तितकेच चवदार होते. आणि तुळशीचा फ्लेवर त्यात दिला होता, ज्यामुळे तो पिझ्झा आणखीनच चविष्ट लागत होता. तिथेच मी ‘पास्ता’ आणि ‘फ्रुट सॅलड’ही मागवले आणि एकटय़ाने काही मिनटांत संपवले. मुळातच हृषीकेशसारखे पवित्र ठिकाण जिथे केवळ भारतीयच पदार्थ असतील, अशीच आपली धारणा असते तिथे खाद्यपदार्थामधील इतके वैविध्य पाहूनच मी भारावून गेलो. एवढंच नाही तर पर्यटकांच्या गरजांनुसार अगदी अत्याधुनिक सोयींसह नवनवीन पाश्चात्त्य पदार्थही त्याच दर्जेदार पद्धतीने सव्‍‌र्ह केले जातात, हे पाहून थक्क व्हायला होतं. एकू णच, हृषीकेशसारख्या ठिकाणी खाद्यभ्रमंतीसाठी जाऊन नक्कीच माझ्या जिभेचे चोचले पुरवले गेले. पोटभर पदार्थाचा आस्वाद घेता आला आणि त्याचबरोबर अशी अनेक वेगवेगळी ठिकाणं केवळ आपल्या पोटासाठी आपण फिरायला हवीत असा संकल्पही मी त्यानिमित्तानेच सोडला..!

संकलन : विपाली पदे

viva@expressindia.com