नवं दशक नव्या दिशा

सौरभ करंदीकर

सिरी आणि अ‍ॅलेक्सा यांना मूर्त स्वरूप नाही. ते केवळ आपल्या फोनवर आणि संगणकावर ऐकू येणारे आवाज आहेत, पण उद्या कदाचित त्या प्रणालीची सांगड एखाद्या यंत्रमानवाशी घातली गेली तर?

प्रसिद्ध इंग्लिश शास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि आधुनिक संगणकाच्या शिल्पकारांपैकी एक – अ‍ॅलन टय़ुरिंग – यांनी एखादा कॉम्प्यूटर माणसाप्रमाणे विचार करू शकतो का? त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) प्राप्त आहे, असं म्हणावं का, हे ओळखण्यासाठी १९५० साली एक चाचणी तयार केली. त्याला टय़ुरिंग टेस्ट असं नाव पडलं.

ही चाचणी तशी साधी-सोपी, प्रश्नोत्तरांवर आधारलेली आहे. तीन वेगवेगळय़ा खोल्यांमध्ये तीन परीक्षार्थीना बसवलं जातं. ते एकमेकांना पाहू शकत नाहीत, परंतु संगणकाच्या माध्यमातून ते एकमेकांशी संवाद साधू शकतात. त्यातील एक प्रश्नकर्ता आहे. दुसऱ्या दोघांनी त्याच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची आहेत. प्रश्न तसे साधे-सोपे, पण ठरलेल्या क्रमाचे आणि आशयाचे आहेत. थोडक्यात, प्रश्नकर्ता अवांतर गप्पा मारू शकत नाही की स्वत:च्या मनाचे प्रश्न विचारू शकत नाही. यात गंमत अशी की, उत्तर देणाऱ्यांपैकी एक माणूस आहे तर दुसरा कृत्रिम बुद्धिमत्ता असलेला संगणक! कोणत्या खोलीत कोण आहे, हे प्रश्नकर्त्यांला माहिती नाही. आणि दोन्ही खोलीतून येणाऱ्या उत्तरांवर त्याला ते ओळखायचं आहे. माणूस कोण आणि संगणक कोण, हे प्रश्नकर्त्यांला (अर्ध्यांहून अधिक प्रश्नांची उत्तरं पाहूनसुद्धा) समजू शकलं नाही, तर तो संगणक माणसाप्रमाणे विचार करण्यास सक्षम आहे असं मानलं जाऊ शकतं.

स्वत: टय़ुरिंगच्या हयातीत कुठलाही संगणक टय़ुरिंग टेस्ट पास करू शकला नाही. गेल्या ७० वर्षांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर अनेक वेगवेगळी संशोधनं झाली. संगणकीय तंत्रज्ञान अधिकाधिक प्रगल्भ झालं. तरीही (निदान हा लेख लिहिला जाईपर्यंत तरी) कुठलीही संगणकीय प्रणाली टय़ुरिंग टेस्ट पास झालेली नाही. गूगल असिस्टंट, अ‍ॅलेक्सा, सिरी, आयबीएम वॉटसन या सर्वाना या टेस्टमधल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देता आली, असं ऐकिवात नाही. सिरी किंवा अ‍ॅलेक्सा कुठल्याही प्रश्नाचं एका वाक्यात उत्तर देत असेल, आपल्या हाकेसरशी जगातील कुठलीही माहिती आपल्यापर्यंत आणत असेल, परंतु स्वत:च्या बळावर विचार करून दीर्घ संवाद साधण्याची क्षमता या कुणातच नाही.

सिरी आणि अ‍ॅलेक्सा यांना मूर्त स्वरूप नाही. ते केवळ आपल्या फोनवर आणि संगणकावर ऐकू येणारे आवाज आहेत, पण उद्या कदाचित त्या प्रणालीची सांगड एखाद्या यंत्रमानवाशी घातली गेली तर? यंत्रमानव, रोबोट असं म्हटलं की धातूंच्या विविध आकाराच्या पार्टसने बनलेले हात-पाय-डोकं असावेत अशा आकाराची, यांत्रिक आवाजात बोलणारी आणि खटक्या खटक्यांनी हालचाल करणारी आकृती आपल्या डोळय़ासमोर येते. याचं श्रेय अर्थातच विज्ञानकथांना आणि त्यांच्यावर आधारित चित्रपट आणि टीव्हीवरील मालिकांना जातं. १९६० मध्ये प्रदर्शित झालेली ब्रिटिश मालिका फायरबॉल एक्स एल ५ असो, २००४ सालचा आय रोबोट नावाचा चित्रपट असो किंवा २०२१ साली अ‍ॅपल टीव्हीवर प्रदर्शित झालेला फिंच नावाचा चित्रपट असो, मनोरंजन क्षेत्रातलं यंत्रमानवाचं रूप यांत्रिकच दर्शवलं गेलं.

ख्रिस्ती धर्मग्रंथ बायबलमध्ये परमेश्वराने मानवाची निर्मिती आपल्या स्वत:च्या स्वरूपात केली, असा उल्लेख आहे. आपल्या मुलाने आपल्यासारखे दिसावे, वागावे अशी प्रत्येक बापाची नैसर्गिक इच्छा असते. स्वत:ची प्रतिकृती निर्माण करण्यात एक अहंकारी आनंद आहे. त्यापासून यंत्रमानवाची रचना करणारे तंत्रज्ञ तरी कसे वंचित राहतील?

खरं सांगायचं तर रोबोट म्हणजे यंत्र – मानव नव्हे. रोबोट म्हणजे माणसाचं काम आपल्या हालचालींनी करू शकणारं यंत्र. कारखान्यांमध्ये, खाणींमध्ये काम करणारे रोबोट हे मुळीच माणसासारखे दिसत नाहीत. गाडय़ांचे विविध पार्टस उचलून त्याची एकत्र जुळणी करणारे, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया स्थिरतेने करणारे रोबोटिक आर्मदेखील माणसाच्या हातांसारखे दिसावेत अशी अजिबात गरज नसते. मनुष्यासारख्या दिसणाऱ्या रोबोटला अँड्रॉइड म्हणतात. (तुमची लाडकी मोबाइल प्रणाली नव्हे). हा शब्द म्हणजे ग्रीक भाषेतील अँड्र – पुरुष, पुल्लिंग हा शब्द आणि ऑईड – आकाराचा, हा प्रत्यय यांचं एकत्रीकरण आहे.

आपल्यासारखा वागणारा-बोलणारा रोबोट साहित्यकृतीत, नाटकात एकोणिसाव्या शतकापासूनच दिसायला लागला. विसाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या, भविष्याचं नकारात्मक चित्रण करणाऱ्या काही विज्ञानकथांमध्ये मनुष्य आणि अँड्रॉइड यांच्यात असलेल्या कमालीच्या साधम्र्यामुळे आलेले पेचप्रसंग दर्शवले गेले. यांत्रिक शरीर असणारा, मनुष्याहून बलवान असणारा, परंतु वरवर माणसासारखा दिसणारा रोबोट आपल्या वरचढ ठरून आपला नायनाट करेल काय? अशी भीती या कथांनी रुजवली. आयझॅक अ‍ॅसिमोव्ह या सुप्रसिद्ध लेखकाने थ्री लॉज ऑफ रोबोटिक्स नावाची काल्पनिक नियमावली लिहिली. या नियमावलीनुसार कुठल्याही रोबोटला मनुष्यास ईजा करणं शक्य होणार नाही, अशी खबरदारी घेता येईल असं दर्शवलं.

आयझ्ॉक अ‍ॅसिमोव्ह यांना श्रद्धांजली म्हणून की काय २००० साली होंडा कंपनीने अ‍ॅसिमो नावाचा, मनुष्याच्या आकाराचा, परंतु निव्वळ मनोरंजन करणारा रोबोट निर्माण केला. २०१६ साली हाँगकाँगच्या हॅन्सन रोबोटिक्सने निर्माण केलेल्या सोफिया नावाच्या रोबोटला (स्त्रीप्रमाणे दिसत असल्याने तिला गायनॉइड म्हणावं लागेल) सौदी अरेबियाने चक्क आपलं नागरिकत्व प्रदान केलं! इतकंच नाही तर युनोने २०१७ साली सोफियाला जागतिक दारिद्र निर्मूलन कार्यक्रमात एक सल्लागार म्हणून नेमलं (आधुनिक तंत्रज्ञानाची जाहिरात म्हणून). सोफियाचा चेहरा जरी एखाद्या युवतीसारखा दिसत असला, तिच्या चेहऱ्यावर थोडेफार हावभाव असले, तरी तिची विचार करण्याची क्षमता एखाद्या चॅटबॉटसारखीच दिखाऊ आहे.

इंजिनीयिरग आर्टस नावाच्या ब्रिटिश संस्थेने काही दिवसांपूर्वी ‘अमेका’ नावाचा अँड्रॉइड निर्माण केला आहे. या रोबोटचे हावभाव मनुष्याच्या हावभावांशी कमालीचे मिळतेजुळते आहेत. इतके की त्याची भीती वाटावी! आनंद, आश्चर्य, चिंता, भय, हास्य इत्यादी भाव त्याच्या चेहऱ्यावर सहजी उमटतात. अमेका सध्या तरी चालू शकत नाही (पूर्ण शरीर असूनदेखील), सध्या तरी त्याची जुळणी कृत्रिम बुद्धिमत्तेशी केलेली नाही, परंतु ती झाली तर तो आजपर्यंत सर्वाधिक ‘मानवी’ वाटणारा रोबोट ठरेल.

भविष्यात आपण अशा अँड्रॉइड्सची आणि गायनॉइड्सची पिढी जन्माला घालणार असू आणि त्यांना गर्दीत हुडकून काढणं कठीण होणार असेल, तर त्यांना ‘जागृत’ करण्यापूर्वी त्यांच्या प्रणालीत आयझ्ॉक अ‍ॅसिमोव्हने लिहिलेली नियमावली न चुकता घालू या, अन्यथा कठीण आहे.

viva@expressindia.com