वयाच्या सोळाव्या वर्षी एका छोटय़ा अपघातामुळे खेळातलं करिअर संपतंय का, असं वाटत असतानाच एका नव्या व्यायाम प्रकाराकडे ‘तिने मोर्चा वळवला आणि आज देशातली सगळ्यात तरुण ‘पिलाटीज इन्स्ट्रक्टर म्हणून ती नावारूपाला आली आहे. सेलिब्रिटी ट्रेनर नम्रता पुरोहितशी बातचीत.
रुटीन व्यायामाचा कंटाळा असणाऱ्यांना हल्ली वेगवेगळे नवे, कल्पक व्यायाम प्रकार खुणावू लागले आहेत. या व्यायाम प्रकारांच्या गर्दीमध्ये नव्याने आलेला पण हळूहळू लोकप्रियतेकडे जाणारा एक व्यायाम प्रकार आहे- पिलाटीज. १९२० च्या दशकात जोसेफ पिलाटीज यांनी तयार केलेल्या या व्यायाम प्रकाराचा शरीराची लवचीकता वाढवण्यासाठी, स्टॅमिना वाढवण्यासाठी वापर करण्यात येतो. या व्यायाम प्रकाराच्या जन्माची कथासुद्धा तितकीच गमतीशीर आहे. पहिल्या महायुद्धाच्यावेळी इतर अनेक ब्रिटिश सैनिकांप्रमाणे जोसेफसुद्धा जर्मनीमध्ये अडकून पडला होता. या वेळीस या सैनिकांच्या व्यायामामध्ये कसर राहू नये म्हणून त्याने तिथे सैनिकांना वेगळे व्यायामप्रकार शिकवायला सुरुवात केली आणि तिथून हा पिलाटीज जगासमोर आला.
भारतात अजूनही हा व्यायाम प्रकार फारसा परिचयाचा झाला नसला तरी सेलेब्रिटीजमध्ये मात्र याची बऱ्यापैकी क्रेझ आहे आणि अनेक सेलिब्रिटीजना पिलाटीजच्या स्टेप्सवर वाकवणारी ट्रेनर जगातली सगळ्यात कमी वयाची पिलाटीज इन्स्ट्रक्टर ठरली आहे. तिचं नाव आहे नम्रता पुरोहित. वयाच्या विशीत असणाऱ्या नम्रताच्या शिष्यांमध्ये लिसा हेडन, नेहा धुपिया, तनिषा मुखर्जी, रिचा चड्डा अशा तारका तसंच अभिषेक नायर, धवल कुलकर्णी या क्रिकेटर्स आणि मनदीप सिंग यांसारखे फुटबॉलपटू अशा कित्येकांचा समावेश आहे.
अपघातातून सावरल्यावर शरीराच्या दुखापतग्रस्त भागाची हालचाल पूर्ववत करण्यासाठी पिलाटीजचा वापर होत असल्याचं ती सांगते. त्यामुळे खेळाडू, अॅक्टर्स यांच्यासाठी हा व्यायाम प्रकार उत्तम आहे. याबद्दल एक उदाहरण देताना ती अॅक्टर ब्रुना अब्दुल्लासोबत झालेला एक किस्सा सांगत. ‘एका सादरीकरणाच्या वेळी ब्रुनाचा पाय घसरला आणि ती पडली. त्यानंतर तिला नाचण्यामध्ये अडचणी येऊ लागल्या होत्या. ती दोन वर्षे आपल्या पायावर उपचार करून घेत होती, परंतु कोणत्याच पद्धतीने गुण आला नाही. शेवटी थकून ती माझ्याकडे आली आणि जी दुखापत दोन वर्षांमध्ये बरी झाली नाही, ती पिलाटीजच्या चार सेशनमध्ये पूर्णपणे बरी झाली.’ पिलाटीजसाठी कोणतीही वयोमर्यादा नाही, स्टॅमिना पाहिजे वगैरे बंधनं नाहीत. तसंच प्रत्येकासाठी खास ‘कस्टमाइज्ड’ व्यायाम डिझाइन करून घेता येतो. त्यामुळे एका अर्थाने हा ‘युनिव्हर्सल’ व्यायाम प्रकार आहे, असं नम्रता सांगते. शक्यतो हा व्यायाम करताना आठवडय़ाचे तीन दिवस पिलाटीज, दोन दिवस कार्डियो आणि दोन दिवस विश्रांती अशी आखणी करावी, असा सल्ला नम्रता देते.
अजूनही हा व्यायाम प्रकार भारतात नवीन असल्याने लोकांमध्ये तो तितकासा प्रसिद्ध नाही. पण लोकांमध्ये याबाबत उत्सुकता नक्की आहे. पिलाटीज इन्स्ट्रक्ट्रर म्हणून करिअर करायला म्हणूनच तरुणांना वाव आहे. ‘त्यासाठी आधी तुम्ही स्वत: फिट असणं गरजेचं आहे. हा व्यायाम प्रकार युनिव्हर्सल असल्यामुळे प्रत्येकाच्या व्यवसायानुसार, शरीरयष्टीनुसार त्यांना कसा व्यायाम सूट होऊ शकतो, याचा अभ्यास असणं गरजेचं आहे. मुख्य म्हणजे तुम्हाला लोकांशी संवाद साधण्याची कला यायला हवी,’ नम्रता सांगते. कारण शेवटी हादेखील व्यायाम प्रकार आहे. अचानक काही दिवसांमध्ये कोणताही चमत्कार होईल असा गैरसमज त्यांच्या मनामध्ये तयार होणं चुकीचं आहे आणि हे त्यांना समजावून सांगण्याची जबाबदारीही तुमच्यावर असते, नम्रता आवर्जून सांगते. एवढय़ा कमी वयात एका नवीन व्यायाम प्रकारात करिअर करण्याची जिद्द ठेवणारी, अपघातामुळे खचून न जाता त्याकडे वेगळी संधी म्हणून बघणारी नम्रता पुरोहित पिलाटीजबद्दल सांगतानाही बरीच प्रेरणा देऊन जाते.