सायली जोशी

परदेशी जाणं हे स्वप्नच असू शकतं; ते आपल्यासाठी नाहीच असा पक्का समज असणाऱ्या अनेकांप्रमाणे मध्यमवर्गीय विचारसरणीत माझं बालपण गेलं. मी लहानपणापासूनच आई-वडिलांना प्रचंड मेहनत करताना बघत मोठी झाले. अनेकांप्रमाणे त्यांच्या धावपळीत पाळणाघरात बालपण गेलं. ही तक्रार नव्हे तर माझा ठाम विश्वास आहे की, त्यामुळेच माझ्या व्यक्तिमत्त्वात मोठी भर पडली. अभ्यास शिकण्यासाठी करावा, गुणांसाठी नाही असा दृष्टिकोन ठेवल्याबद्दल मी आई-बाबांचे आभार मानते. त्यामुळेच मला मनाजोगत्या विषयाचं- संख्याशास्त्र (स्टॅटिस्टिक्स) शिक्षण घेता आलं. मी बी.एस्सी. पहिली दोन वर्ष डोंबिवलीच्या ‘के. व्ही. पेंढारकर महाविद्यालया’त आणि तिसरं वर्ष ‘डी. जी. रुपारेल महाविद्यालया’तून पूर्ण केलं. त्यानंतर वर्षभर ‘आयसीआयसीआय’च्या टेलीबँकिंगमध्ये नोकरीचा अनुभव घेतला. संख्याशास्त्राच्या आवडीमुळे मी एम.एस्सी. अ‍ॅक्च्युरिअल सायन्समध्ये केलं. अ‍ॅक्च्युरिअल सायन्स हे क्षेत्र भारतात नवीन असल्याने ‘आयएआय’मध्ये  (इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅक्च्युरिअल सायन्स) तीन पेपर क्लिअर करूनही या क्षेत्रात मनासारखी नोकरी मिळत नव्हती. त्या सुमारास मला ‘टय़ुटोव्हिस्टा’ नावाच्या ऑनलाइन एज्युकेशन कंपनीमध्ये नोकरी मिळाली. त्यांच्यामार्फत मी अमेरिकेतल्या विद्यार्थ्यांना संख्याशास्त्र शिकवत होते.

त्याच सुमारास आदित्य केतकर (त्या वेळी होणारा आणि आता नवरा) अमेरिकेला पीएचडी करण्यासाठी गेला. मला अमेरिकेत डिपेण्डण्ट नाही तर स्वतंत्र जायचं होतं. त्यामुळे लग्नाच्या आधी जीआरई, टोफेल आदी परीक्षा देऊन जायची तयारी आदित्यच्या मार्गदर्शनाखाली सुरू केली. त्यासाठी आई (अंजली जोशी), बाबा(गणेश जोशी), ताई (प्रांजली कुबेर) आणि मोठे जिजू प्रवीण यांनी मोलाचा पाठिंबा दिला. अमेरिकेत मी रॉचेस्टर, मिसिसिपी, ह्युस्टन आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ नेवाडा’ या विद्यापीठांमध्ये अर्ज केला होता. त्यात आदित्यच्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ नेवाडा’ सोडून सगळीकडे प्रवेश मिळाला होता. त्या वेळी ‘मिसिसिपी स्टेट युनिव्हर्सिटी’मध्ये प्रवेश घ्यायचा निर्णय कठीण वाटला होता, पण त्याचमुळे मी स्वावलंबी होऊ  शकले. मिसिसिपीला येताना केला तो पहिला विमानप्रवास. शैक्षणिक कर्ज घेतलं होतं, पण पुढे प्राध्यापकांशी बोलून मला असिस्टंटशिप मिळाल्यामुळे काही प्रमाणात फी माफ झाली. दरमहा स्टायपेंड मिळू लागला. विद्यार्थ्यांना शिकवणं, लॅबमध्ये प्रॅक्टिकल घेणं, पेपर ग्रेड करणं अशा स्वरूपाचं ते काम होतं. माझा एम.एस.चा अभ्यासक्रम अजून सुरू असून त्याला ‘डय़ुएल डिग्री’ असं म्हणतात. म्हणजे पीएचडी करता करता एम.एस. पूर्ण करणं. आपल्याकडे कॉन्सेप्ट अर्थात संकल्पनेला महत्त्व दिलं जातं. एखादा सिद्धांत कसा आला ते शिकवण्यावर भर असतो. तर इथे अ‍ॅप्लिकेशन्सवर भर असतो. सॉफ्टवेअर्स वापरून तो सिद्धांत ‘का’ आणि ‘कुठे’ वापरायचा हे शिकवण्यावर ते भर देतात.

मी या विद्यापीठात एम.एस.साठी आले असले तरी एका अमेरिकन मैत्रिणीमुळे मला पीएचडीची गोडी लागली. मग काही प्राध्यापकांशी संशोधनासंदर्भात भेटीगाठी घेऊन चर्चा केली. प्राध्यापक डॉ. जुंफेंग मा यांना संख्याशास्त्र नीट येणाऱ्या विद्यार्थिनीला पीएचडीसाठी मार्गदर्शन करायचं होतं. त्यामुळे मी आता ‘इंडस्ट्रीअल अ‍ॅण्ड सिस्टम्स इंजिनीअरिंग’मध्ये पीएचडी करते आहे. पीएचडीचा कालावधी ३ ते ५ वर्ष असतो. पीएचडीच्या अभ्यासक्रमात काही अभ्यासक्रम सोडले तर शिकवणारं कुणीच नसतं. संशोधन कधी संपत नाही. तर ‘कसं शिकावं’ हे शिकून घ्यावं लागतं. अ‍ॅडव्हायझर हा गाइडच असतो. आपला मार्ग आपणच शोधावा लागतो. ‘इन पीएचडी यू डोण्ट वर्क फॉर प्रोफेसर, यू वर्क विथ देम’ असं इथ म्हटलं जातं. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं काम स्वत:च करणं अपेक्षित असतं. माझ्या संशोधनाचा विषय ‘फजी लॉजिक अ‍ॅण्ड बेसियन नेटवर्क ’ असा आहे. मी सध्या काही सॉफ्टवेअर्स (बेसियालॅब, पायथॉन) शिकून त्याद्वारे माझ्या विषयाचा डाटा अ‍ॅनालिसिस शिकते आहे. सध्या मी लिहीत असलेले पेपर्स त्यावरच आहेत. संख्याशास्त्र विषयातून थेट इंजिनीअरिंगला येणं हे अमेरिकन शिक्षणपद्धतीमुळे शक्य झालं. कारण पीएचडी करताना त्याच क्षेत्रातली पदवी, पदव्युत्तर शिक्षणच हवं असं काही इथे अपेक्षित नसतं. वेगवेगळ्या अ‍ॅडव्हायझर्ससोबत काम केल्याने थोडा अनुभव गाठीशी जमा झाला. माझ्या मार्गदर्शकांमुळे काम करण्याची चिनी पद्धत कळली. चिनी लोक खूप मेहनती असतात. प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे आणि परिपूर्ण पद्धतीने करण्यावर त्यांचा भर असतो. सुरुवातीला याचा काहीसा त्रास होतो, प्रत्येक गोष्टीत कुणी तरी काही तरी सतत सांगण्याचा. पण त्याच बारकाव्यांनी दर वेळी प्रोफेशनल म्हणून घडण्यात मदत केली. इंग्रजी प्राथमिक भाषा नसल्याने आणि मराठी माध्यमात शिकल्याने दोन वर्षांपूर्वीचं माझं लिखाण आणि आताचं लिखाण यात प्राध्यापकांनी लावलेल्या शिस्तीचं आणि भाषिक कौशल्याचं प्रतिबिंब ठळकपणे दिसतं.

या दरम्यान फेलोशिपसाठी अनेक संधी शोधल्या. एक वर्ष मला शिकता शिकता अमेरिकन प्रिकास्ट कॉन्क्रिट इंडस्ट्रीसाठी एका प्रोजेक्टवर काम करता आलं. म्हणजे स्टॅटिस्टिक्सचं शिक्षण सुरू असताना व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी कोडिंग हा प्रकल्प समोर आला. पीएचडी करताना स्वत:हून शिकण्याखेरीज मार्ग नसतो. त्यामुळे या वर्षभरात मी कोडिंगही शिकले आणि कॉन्क्रिट इंडस्ट्रीच्या कामगारांसाठी व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी ट्रेनिंग प्रोग्रॅम तयार केला. त्यांना माझं काम आवडलं. कदाचित अजून एक वर्ष काम सुरू ठेवता येईल म्हणून निधी वाढवण्याचे प्रयत्न चालू आहेत. आपल्या प्रगतीसाठी आपणच पावलं उचलणं अपेक्षित आहे, हे खरं असलं तरी ज्या संधी मला इथे उपलब्ध झाल्या ते माझ्यासाठीही आश्चर्य होतं. या संधी मिळवण्यासाठी माझ्या मार्गदर्शकांनी चांगलं मार्गदर्शन केलं. त्यांच्यासोबत मी या प्रकल्पाची कल्पना मांडली आणि ती स्वीकारली गेली. या कामामुळे नवनवीन लोकांना भेटणं, त्यांच्या कामाच्या पद्धती बघणं, शिकणं आणि अनुभवणं हेही सुरू होतं. सगळं सुरळीत सुरू असताना बाबांना बरं नसल्याची बातमी कळली. आई आणि ताईची काळजी आणि इकडे मी काम सोडून भारतात जावं की काय करावं अशी परिस्थिती निर्माण झाली. जिजूंनी पुढाकार घेतला आणि मला बघून बाबा बरे होतील, या विचाराने भारतात बोलावलं. या तातडीने निघण्यात विद्यापीठानेही खूप मदत केली. महिन्याभराची सुट्टी घेऊन आले खरी, पण अनपेक्षितपणं बाबा दोनच दिवसांत गेले. त्यानंतर महिनाभराने इथं परतल्यावर हळूहळू या धक्क्यातून मी स्वत:ला सावरलं. रिस्क घ्यायला शिकणं या आईकडून शिकलेल्या गोष्टीमुळे मला जीवनात मार्गस्थ व्हायला मदत झाली. मनापासून काही करायची इच्छा असली आणि त्यासाठी पाऊल उचललं की सगळं शक्य होतं. माणसं जोडण्याची कला बाबांकडून शिकले. केवळ आर्थिक नव्हे तर मानसिक बळ पुरवत निर्णय घेण्यासाठी विलास सहस्रहबुद्धे, अनिल तऱ्हाळकर, मिलिंद केतकर (माझे सासरे), प्रवीण कुबेर (जिजू), विजया कुबेर (बहिणीच्या सासूबाई) यांनी कायम भक्कम पाठिंबा दिला.

इथे आल्यावर बसणारे सांस्कृतिक धक्के पचवतानाच इथली जीवनशैली समजून घेऊन ती आत्मसात करणं, ओळखी वाढवणं आदी गोष्टी केल्या. माझी टीचिंग असिस्टंटशिप संपली असून आता रिसर्च असिस्टंटशिप सुरू झाली आहे. त्यामुळे अभ्यासाव्यतिरिक्त संशोधनामध्ये खूप वेळ जातो. त्याचे तासही ठरलेले नसतात. प्रसंगी वीकएण्डलाही काम पूर्ण करावं लागतं. कामाव्यतिरिक्त विद्यापीठातर्फे विद्यार्थी शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा सुदृढ राहू शकतील यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे बॅडमिंटन, जिमला जाणं हा आता रुटिनचा भाग झाला आहे. मात्र आणखी काही छंद जोपासायला वेळ मिळत नाही. कॅम्पसवर अनेक भारतीय सणवार साजरे होतात. केवळ अमेरिकनच नव्हे तर मेक्सिकन, चायनीज, इराणी आदी देशांमधले सणही साजरे केले जातात. गेल्या वर्षी विद्यपीठातील ‘इंडियन स्टुण्डण्ट ऑर्गनायझेशन’ची उपाध्यक्ष असल्याने आयोजनात पूर्ण सक्रिय होते. यंदा लागेल तशी मदत करते आहे. व्यक्तिगत आयुष्य असो किंवा व्यावसायिक आयुष्य असो, वेगवेगळ्या देशांचे, जातीधर्माचे मित्रमैत्रिणी मदतीला धावून येतात. काही काळाने या विविधतेचा विसर पडतो आणि फक्त माणूस म्हणून सगळे एकमेकांसाठी उभे राहतात. या काळात मी स्वावलंबी झाले. वागणं, बोलणं आणि स्वयंनिर्णय घ्यायला शिकले. येत्या दीडएक वर्षांत पीएचडी पूर्ण होईल. त्यानंतर नोकरी करण्याचा विचार आहे. काही पेपर्स प्रसिद्ध होतील आणि काही प्रसिद्धीसाठी पाठवले असतील. स्वप्नपूर्तीच्या दिशेने मार्गस्थ व्हायचा टप्पा सुरू होतो आहे..

कानमंत्र

* भाषाप्रभुत्व हवं. अमेरिकेत माफक, प्रभावी आणि आत्मविश्वासाने केलेल्या संभाषणाला महत्त्व दिलं जातं. त्यामुळे मिळालेल्या संधीचं चीज करणं हे आपल्या मेहनतीवर अवलंबून असतं.

* घरापासून लांब राहताना भावना आणि व्यावहारिकपणात समतोल राखायला शिकावं. वेळेचं व्यवस्थापन ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ठरते.

संकलन : राधिका कुंटे

viva@expressindia.com