वेदवती चिपळूणकर

कथ्थक नृत्याबद्दलची ओढ, प्रेम जोपासतानाच त्यात मास्टर होण्यासाठी सातत्याने धडपडणारा नकुल घाणेकर हा आज अभिनेता म्हणून घराघरांत परिचित आहे. सतत शिकण्याची वृत्ती ठेवून केलेला प्रवास कलाकाराला त्याच्या साधनेत निश्चित यश मिळवून देतो, याचे प्रत्यक्ष उदाहरण नकुलने त्याच्या नृत्यसाधनेतून सगळ्यांसमोर ठेवले आहे.

तो कृष्णाच्या रूपाने आला आणि सगळ्या गोपिकांच्या गळ्यातला ताईत झाला. ‘कृष्ण’ या शास्त्रीय कथ्थक नृत्याने बांधलेल्या नृत्यनाटय़ाचे आता शंभर प्रयोग पूर्ण होत आले आहेत. आतापर्यंत प्रेक्षकांनी त्याला वेगवेगळ्या रूपांत पाहिलं आणि आपलंसं केलं. ‘महाराष्ट्राचा नच बलिये’ या रिअ‍ॅलिटी शोमधून इंडस्ट्रीत पाऊल ठेवलेला आणि कधी ‘जय मल्हार’मधला विष्णू, कधी ‘घाडगे आणि सून’मधला जय दीक्षित तर कधी ‘आरण्यक’मधला युधिष्ठिर म्हणून प्रेक्षकांसमोर उभा राहिलेला नकुल घाणेकर! अगदी लहानपणापासून कथ्थकची आवड असणाऱ्या नकुलने पदवी मात्र विज्ञान शाखेतून घेतली. ‘मायक्रोबायोलॉजी’ या विषयात त्याने मास्टर्सही केलं. त्याच सुमारास सोनिया परचुरे यांच्यासोबत ‘कृष्ण’ हे नृत्यनाटय़ सादर करायला त्याने सुरुवात केली आणि त्याचा अभिनय व नृत्याशी संबंध पुन्हा जोडला गेला. घराघरांत त्याला ओळख मिळवून दिली ती ‘अजूनही चांदरात आहे’ या मालिकेने! त्यानंतर धावू लागलेल्या त्याच्या करिअरच्या गाडीने कोणत्याच क्षेत्रात मागे वळून पाहिलं नाही.

वयाच्या सातव्या-आठव्या वर्षीच कथ्थक शिकायला सुरुवात केलेला नकुल त्याच्या या नृत्यवेडाबद्दल सांगतो, ‘‘माझ्या अंगात ताल आहे, मला थोडं फार नाचता येतंय हे माझ्या बाबांच्या खूप लवकर लक्षात आलं. मी दुसरीत असतानाच त्यांनी मला कथ्थकच्या क्लासला घातलं. तेव्हापासून माझ्यात कथ्थकची गोडी निर्माण झाली आणि मग हळूहळू कथ्थक हे प्रेम बनलं! मुलगा आणि शास्त्रीय नृत्य हे कॉम्बिनेशन विशेष आजूबाजूला कोणाच्या पचनी पडणारं नव्हतं. मात्र बाबा त्यांच्या निर्णयावर ठाम राहिल्यामुळे माझ्यातल्या कथ्थकला वाव मिळाला. माझ्यातल्या नृत्यकलेला फुलवण्यात बाबांच्या या निर्णयाचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनी सगळ्या विरोधाला आणि टोमण्यांना तोंड देऊन त्यावेळी हा निर्णय घेतला नसता तर कदाचित नृत्याचं अंग असूनही माझा या क्षेत्राशी कधी परिचयच झाला नसता. इयत्ता आठवीपर्यंत मी कथ्थक शिकत होतो. नंतर मात्र इतर मुलांचं चिडवणं वाढायला लागलं आणि मीही अर्धवट वयात असल्याने ते बरंच सीरियसली घेतलं. त्यावेळी मी कथ्थकमधून ब्रेक घेऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं.’’ मात्र डान्सपासून मी विशेष लांब राहू शकत नव्हतो, असं सांगणाऱ्या नकुलने कंटेम्पररी, बॉलरूम, साल्सा असं शिकायला सुरुवात केली. हे असे नृत्यप्रकार होते जे एका मुलाने शिकू न घेतले तरी त्याला कोणी हसणारं नव्हतं. काही वर्ष मी ते शिकलो आणि त्यातही साल्सामध्ये मला विशेष आवड निर्माण झाली, असं त्याने सांगितलं.

नकुलच्या नृत्य क्षेत्रातल्या करियरच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचे दोन निर्णय म्हणजे सोनिया परचुरे यांच्यासोबत केलेलं ‘कृष्ण’ हे नृत्यनाटय़ आणि स्वत:चे डान्स क्लास! स्वत:चं काहीही सुरू करणं हा कोणत्याही सामान्य तरुणासाठी एक मोठा टप्पा असतो, एक मोठी जबाबदारी आणि तितकीच मोठी रिस्क असते. आठवीत सोडलेला कथ्थकचा रियाज ‘कृष्ण’च्या निमित्ताने पुन्हा सुरू झाला आणि हळूहळू नकुलने स्वत:चे क्लास सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रत्येक सामान्य माणसाच्या आयुष्यात ही परिस्थिती कधी ना कधी येतेच जेव्हा स्वत:ची आवड की नोकरीची गरज ही द्विधा परिस्थिती निर्माण होते. अशा प्रसंगात कोणताही निर्णय हा संपूर्ण आयुष्यावर मोठा परिणाम करतो. अशा वेळी थोडा स्वत:च्या मनाविरुद्ध निर्णय घ्यावा लागला तरी त्यात सकारात्मक विचार करत नकुलने स्वत:ची आवड कशी जोपासता येईल त्याचा मार्ग शोधला. नकुल म्हणतो, ‘‘माझे क्लास सुरू होऊन वर्ष झालं होतं. माझ्याकडे क्लासमध्ये दोन असिस्टंटही तयार झाले होते. त्यामुळे मी अजून धडपड करतच होतो. तेवढय़ातच कोणी तरी बाबांना एअर इंडियाच्या केबिन क्रूसाठीच्या सिलेक्शनचा फॉर्म आणून दिला. आणून देणाऱ्या माणसाला खात्री होती की मला ही नोकरी मिळू शकते. बाबांनीही मला नोकरीसाठी प्रयत्न करायचा आग्रह केला आणि माझी मात्र त्यावेळी अजिबात तयारी नव्हती. नाईलाजाने मी तो फॉर्म भरला, सिलेक्शन प्रोसेसला गेलो आणि मला नोकरीही मिळाली. तेव्हा मी यातून काही तरी वेगळं शोधायचं ठरवलं. मी फ्लाईटला असेन तेव्हा क्लास नीट चालवायची जबाबदारी माझ्या असिस्टंटवर येणार होती. त्यांना त्यासाठी मानसिकरीत्या तयार केलं. मी येईन तेव्हा मी शिकवेनच, मात्र मी नसताना क्लासला काही कमी पडता कामा नये याची काळजी माझे असिस्टंट घेतील अशी सोय केली, असं नकुल म्हणतो. कामाच्या निमित्ताने फिरतानाही तो शांत बसला नाही. मी सिंगापूर, न्यूयॉर्क अशा टूरवर असताना तिथे साल्सा शिकायला सुरुवात केली. आपल्यापेक्षा अधिक व्यवस्थित आणि तंत्रशुद्ध पद्धतीने त्यांची नृत्यशैली ते शिकवू शकतात. त्यामुळे तिथे मी जे शिकलो ते मला जास्त समृद्ध करणारं होतं. तसंच या नोकरीच्या बळावर मला डान्स क्लासच्या जागेसाठी कर्ज मिळू शकलं. डान्स स्टुडिओसाठी स्वत:ची जागा असणं यासारखं दुसरं सुख नाही. शोजच्या रिहर्सल, माझा रियाज, विद्यार्थ्यांना शिकवणं हे सगळंच तिथे करता येतं आणि कोणालाही उत्तरं देणं बंधनकारक राहात नाही. नोकरी करणं हे विशेष माझ्या आवडीचं नसलं तरी त्यातून मी माझ्या आवडीला पूरक गोष्टी शोधून काढल्या,’’ असं तो सांगतो तेव्हा अनुभवातून आलेला आत्मविश्वास तुम्हाला आणखी पुढेच नेतो, याची खात्री पटते.

नकुलने जरी मनाविरुद्ध नोकरी केली असली तरीही त्याने ती आठ वर्ष सातत्याने निभावली. त्यानंतर एका डान्स रिअ‍ॅलिटी शोसाठी त्याला विचारणा झाली तेव्हा मात्र त्याच्यासमोर पुन्हा जणू यक्षप्रश्न उभा राहिला. नकुल म्हणतो, ‘‘रिअ‍ॅलिटी शो म्हणजे त्याला प्रचंड वेळ देणं, रिहर्सल करणं या गोष्टी अनिवार्य होत्या. एवढी मोठी सलग सुट्टी मला मिळालीही नसती. तेव्हा स्टुडिओही हळूहळू पाय रोवत होता. मात्र तो अशा टप्प्यावर होता की मी तेव्हा लक्ष घातलं नसतं तर तो तेवढय़ाच लेव्हलला राहिला असता. त्यावेळी त्या क्लासमध्ये मी स्वत: मेहनत घेण्याची गरज होती. या दोन्ही कारणांनी मला नोकरी सोडायची इच्छा झाली आणि त्यावेळी बाबांनाही ते पटलं. माझी इच्छा आणि मेहनत ते बघत होते. त्यावेळी मी फायनली नोकरी सोडली आणि एका नवीन विश्वात प्रवेश केला. तेव्हापासून हळूहळू सीरियल, नाटक या क्षेत्रांत मी काम करायला लागलो. प्रत्येक माध्यमातून मला काही ना काही शिकायला मिळत राहिलं.’

पायात घुंगरू बांधले म्हणून चिडवलं जाण्यापासून प्रेक्षकांना त्याच घुंगरांच्या प्रेमात पाडण्यापर्यंतचा नकुलचा हा प्रवास सोपा कधीच नव्हता. जे करायचं ते ‘नृत्यार्पण’ या भावनेने आणि श्रद्धेने त्याने त्याच्या प्रत्येक कामाकडे, प्रत्येक प्रयोगाकडे पाहिलं. कलेतील शक्य तितक्या नवनवीन गोष्टी शिकणं याच उद्देशाने नकुल कलेची साधना करतो आहे.

कोणत्याही कामात आपली ओरिजिनॅलिटी आणि हार्डवर्क या दोन गोष्टी असल्याशिवाय काम यशस्वी होत नाही. कोणत्याच अवघड कामाला किंवा साधनेला शॉर्टकट नसतो. कोणतीही कला ही केवळ ऑनलाइन बघून शिकता येते असं होत नाही. कला ही साधना आणि रियाजानेच साध्य होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओरिजिनॅलिटी. कोणाचीही नक्कल करून त्याला आपली कला म्हणता येत नाही. त्यासाठी आपलं स्वत:चं त्यात योगदान असावं लागतं. मेहनत आणि शिक्षण याला कोणताही बायपास नाही.

-नकुल घाणेकर