शेफ देवव्रत आपल्याला जगाच्या सफरीवर घेऊन चाललेत. ही खाद्यसंस्कृतीची सफर असेल. प्रत्येक देशाची ओळख त्यांच्या ‘खाने’सुमारीतून आपल्याला होईल. या सफरीत सध्या आपण कोरियाला हॉल्ट घेतलाय. कोरियन खाद्ययात्रेतला हा लास्ट कोर्स.
तुम्हाला माहीत आहे का? कोरियामध्ये असे आढळून आले आहे की, ९९ टक्केलोकांना पुरेसे न्युट्रिशन त्यांच्या डायटमधून मिळते. भरपूर प्रमाणामध्ये फळे, भाज्या, सी फूड इथे खाल्ले जाते. त्यामुळे आवश्यक ते न्युट्रियंटस् भरपूर प्रमाणात मिळतात. कोरियामध्ये मोठय़ा प्रमाणावर मुळा आणि कोबी याचे उत्पादन होते. (मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे यांचा ‘किमची’ या डिशमध्ये उपयोग होतो.) मला असे वाटते की निसर्गाने जे काही त्यांना दिले आहे, त्यांचा पुरेपूर वापर त्यांच्या जेवणात करतात आणि मुलांनाही लहानपणापासून सगळे खाण्याची सवय लावतात.
एकंदरीतच गोड खाण्याचे प्रमाण तिकडे कमी आहे. गोडामध्ये राइस केक्स हा एक पॉप्युलर गोडाचा प्रकार आहे. पण तो जास्त करून स्पेशल ऑकेजनलाच केला जातो.
शिपवरचा माझा कोरियन मित्र सांगायचा, ‘‘आमच्याकडे शाळेत जाणाऱ्या मुलांचे लंच बॉक्सेस वेगळे असतात. आमच्या इथे बरेच छोटे छोटे कप्पे असलेले टिनाचे लंच बॉक्स असतात. त्यात भात, ड्राय फिश, पिकल, सॅलड, सी फूड, चॉपस्टिक अशा गोष्टी ठेवल्या जातात. लहान मुलांना लहान चॉपस्टिक्स असतात आणि जसे ते मोठे होतात, तसे चॉपस्टिक्सची साइज पण वाढत जाते.’’ मला ऐकून गंमत वाटली. मी त्याला म्हणालो, ‘‘आमच्याकडे पण तसेच आहे. जशी मुले वाढत जातात तशी जेवणाच्या थाळीची साइज वाढत जाते.’’ तो पण हसला.
पौष्टिक कोरियन लंच बॉक्स: स्वीट पोटॅटो राइस डोनटस
साहित्य : उकडलेले रताळे – २ (मध्यम), तांदळाची पिठी – अर्धी वाटी, गव्हाचे पीठ – २ चमचे, साखर – ४ टेबलस्पून, बेकिंग पावडर – १ टीस्पून, मीठ – २ चिमूट, गरम दूध – आवश्यकतेनुसार (साधारणपणे ३-४  कप), तळण्यासाठी तेल, पिठी साखर – १ वाटी, दालचिनी पावडर – दीड टीस्पून.
कृती : रताळ्याची साल काढून रताळ्याला ठेचून घ्या. त्यामध्ये तांदळाचे पीठ, गव्हाचे पीठ, मीठ, बेकिंग पावडर, दूध घाला व कणकेसारखे मळून घ्या. आता याचे छोटे गोळे करून ते तेलात मंद आचेवर तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्या. पिठी साखरेमध्ये दालचिनी पावडर टाकून मिक्स करा. आता तळलेले गोळे या मिश्रणात घोळून सव्‍‌र्ह करा.
कोरियन हार्वेस्ट पंच (सुज्यॉग गॉ)
साहित्य : नासपती (ढीं१) – १ (तुकडे केलेले), आले ठेचलेले- १ इंच, दालचिनी – १ तुकडा, खारीक -३ ते ४ ( तुकडे केलेले) साखर – ३ चमचे, पाइन नटस् – १ चमचा (आवडीनुसार – ऑप्शनल), पाणी – दीड लिटर
कृती : पाणी उकळत ठेवा. त्यामध्ये दिलेले साहित्य टाका. अर्धा तास उकळून घ्या. आता हे गाळून फ्रिजमध्ये ठेवा. पाइन नटस् टाकून चील्ड सव्‍‌र्ह करा.
टीप : कोरियामध्ये त्यांचा वेगळा ताज खजूर असतो ते या रेसिपीजमध्ये वापरतात.
डिझाइन : संदेश पाटील