एका क्लासमध्ये शिक्षकांच्या चर्चेत ‘संस्कृत काय कुणीही शिकवू शकतं,’ असा सूर लावला गेला होता. ‘तुम्ही टॉपर्स आणून दाखवा,’ असं म्हटलं गेलं. ‘ती’ म्हणाली, ‘मुलं घडतील.’ निम्न स्तरातून आलेल्या विद्यार्थ्यांशी ‘तिनं’ संवाद साधला. त्यांना कळकळीनं समजावलं.  शिकण्यामागचं तंत्रही शिकवलं. शिकवण्यासाठी स्वत: नोटस् काढल्या. वर्षभर पीपीटी प्रेझेन्टेशन्स केली. बोर्डाचा पेपर कसा लिहायचा ते सांगितलं. त्यांच्याशी गप्पा मारताना बोधकथा सांगत त्यांचा अभ्यास करून घेतला. त्यातल्या १६ जणांपकी १०-१२ जण टॉपर आले. त्यांनी त्यांचा स्कोअर वाढवून दाखवला. ‘कुणीच वाईट नसतं, आपली घडण आपल्याच हाती असते,’ असं ‘ती’ नेहमी म्हणते. ही सकारात्मक विचारसरणी आहे अश्विनी टाकळे हिची!
अश्विनीनं ‘रामनारायण रुईया महाविद्यालया’तून संस्कृतमध्ये पदवी घेतल्येय. पुढं ‘मुंबई विद्यापीठा’तून संस्कृतमध्ये एम.ए. करताना तिला डॉ. मंजूषा गोखले यांचं मार्गदर्शन लाभलं. अश्विनी सांगते की, ‘अकरावीपासून संस्कृत विषय घेतला होता नि पुढं ओघानं टी.वाय.लाही पूर्ण संस्कृतच घेतलं. घरात तशी संस्कृतची आवड होती असं नाही. माझ्या आजोबांना-वडिलांच्या वडिलांना संस्कृत ग्रंथवाचनाची आवड होती. त्यांचा दत्तसंप्रदायाचा अभ्यास होता. तो वारसा मला मिळाला असावा. संस्कृतची गोडी लागल्यावर त्यातील अधिकाधिक ज्ञान मिळवत राहिले.’  
संस्कृतमध्ये एम.ए. करतानाच इंडोलॉजीमध्येही एम.ए. करायचं होतं. पण तेव्हा एकाच वेळी दोन पदवी घेता येत नव्हती. मग ‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठा’चा (पुणे) पर्याय निवडून त्यातून इंडोलॉजीत एम.ए. केलं. तिला हडप्पा-मोहंजोदडो संस्कृतीत अधिक रस असल्यानं तिनं तो काळ निवडला. सुदैवानं मुंबई विद्यापीठाची परीक्षा एप्रिलमध्ये आणि पुणे विद्यापीठाची परीक्षा जूनमध्ये  होती. मग मे महिन्यातही अभ्यास करावाच लागला. पुण्यात अधूनमधून होणाऱ्या सेमिनार्स वगरेंना हजर राहण्याची कसरत मत्रीण मानसी केळकरच्या साहाय्यानं निभावली.
‘एम.ए.साठीच्या धावपळीची ही र्वष मोठी छान गेली. रात्रभर चालणाऱ्या गप्पांमध्ये कळतनकळत मानसीनं किती तरी गोष्टी शिकवल्या. अभ्यासाचं तंत्र, वेळेचं नियोजन वगरे वगरे. मुख्य म्हणजे सकारात्मक विचार करणं. एक किस्साच सांगते.. मानसीच्या मोबाइलवर तिनं ‘आय कॅन डू इट’ असा वॉलपेपर ठेवला होता. तो माझ्याही मोबाइलवर ठेवण्याचा तिचा फारच आग्रह होता. माझ्या आवडीचे वॉलपेपर्स सोडून मी तिच्या आग्रहाखातर ‘आय कॅन डू इट’ असं सेव्ह केलं. आज कळतंय की, तिनं एवढा आग्रह का धरला होता ते. मजा म्हणजे आता ती म्हणते, ‘यू कॅन डू इट.’ ‘आय’वरून ‘यू’वरचा हा जो प्रवास आहे, तो तिच्यामुळं झालाय. शिक्षकांचं मौलिक मार्गदर्शन आणि आई-वडिलांच्या भक्कम पािठब्यामुळं माझा हा सारा ज्ञानप्रवास घडतोय. माझी पहिली गुरू माझी आजी आहे. तिनं संस्कार आणि उच्चारणाची देणगी मला दिल्येय,’ असं अश्विनी सांगते.
ती शाळेत असताना ज्या क्लासमध्ये शिकायला जायची तिथल्या सरांनी संस्कृत शिकवण्याविषयी विचारलं नि ती एफ.वाय.पासून शिकवू लागली. घरूनही ‘शिकवण्याला’ पािठबा मिळाला. तेव्हा मानधनाचा फार विचार न करता मिळणाऱ्या अनुभवाचा विचार तिनं केला होता. पुढं काही महिन्यांनी सरांनी दिलेल्या लिफाफ्यात पाचशे रुपयांचं पहिलंवहिलं मानधन होतं. ‘पुढील वाटचालीसाठी हार्दकि शुभेच्छा,’ असं लिहिलेला तो लिफाफा तिनं अजूनही जपलाय. टी.वाय.ला असताना तिनं घरगुती टय़ूशन्सही घेतल्या.
महिन्याभराचा ‘शिक्षक प्रशिक्षण वर्ग’ पूर्ण केल्यानं तिचा आत्मविश्वास आणखी वाढला. दोन्ही एम.ए. करतानाच तिनं मराठी आणि इंग्रजी माध्यमांचे संस्कृतचे क्लासेस घेतले. विद्यार्थ्यांना शिकवताना त्यांच्यात कोणताही भेदभाव ती करत नाही.  
या सगळ्या धडपडीत तिला विभिन्न मनोवृत्तीच्या लोकांचे अनुभव आले. समोर आलेल्या संधीचा स्वीकार करत ती पुढं जात राहिली. ती सांगते की, ‘मला ओळखी वाढवणं आवडतं. आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येकात काही तरी चांगले गुण असतातच. ते आत्मसात करायला मिळतात. यासाठी माझे गुरू स्वामी समर्थाचं अमूल्य पाठबळ मला लाभतं. त्याच्या इच्छेनं ते माझ्याकडून हे शिकणं-शिकवणं करवून घेतात. जिज्ञासू वृत्ती, सकारात्मक दृष्टिकोन, आनंद, उत्साह, खरेपणा, विनम्रता, शिकण्याची वृत्ती आणि संवाद साधणं हे गुण अंगी बाणवण्याचा मी प्रयत्न करत्येय. दुसरीकडं वाचनाची आवड वृिद्धगत होतंय आणि लेखनाचीही गोडी लागल्येय.’
एम.ए.नंतर बी.एड्.ला अ‍ॅडमिशन मिळाली नाही. तेव्हा तिच्या परिचितांनी तिला धीर देत पुढचं शिक्षण सुरू ठेवण्याचा धीर आणि सल्ला दिला. तिनं मुंबई विद्यापीठात एम. फिल.ला अ‍ॅडमिशन घेतल्येय. विषयनिवड, संशोधनासंर्भात तिला मित्रमत्रिणींची खूप मदत झाली. एम.फिल.साठी डॉ. माधवी नरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तिनं ‘तीर्थक्षेत्र नाशिक : एक अध्ययन’ हा प्रबंधाचा विषय घेतलाय. ‘श्रीरामाचा उल्लेख आणि धार्मिक विधींमुळं ओळखल्या जाणाऱ्या नाशिकचा विचार नाशिक – नश हा मूळ धातू. म्हणजे नाश करणं. कशाचा नाश होतो, तर मनुष्याच्या अंगी असणाऱ्या षड्रिपूंचा तिथं नाश होतो, म्हणून ते नाशिक असेल का, असा विचार करत्येय. तिथल्या मंदिराच्या संदर्भातल्या अभ्यासात संस्कृत आणि इतिहासाची सांगड घालायचा प्रयत्न करत्येय,’ असं अश्विनी म्हणते.
प्रबंधासाठी तिची नाशिकला फिल्ड व्हिजिट होतेय. या प्रवासात तिला अनिता जोशी ही मत्रीण मिळाली. तिचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळतंय. ‘स्वत:ला कामात एवढं झोकून दे की, तुझ्याशिवाय पान हलता कामा नये,’ असं अनिता अश्विनीला सांगते. अश्विनीनं हस्तलिखितशास्त्राचा बेसिक आणि अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा पूर्ण केलाय. हा डिप्लोमा शनिवार-रविवार, दोन्ही एम.ए.चा अभ्यास आणि क्लासमधलं शिकवणं एकाच वेळी सुरू होतं हे विशेष.  
एम.फिल. दीड वर्षांत पूर्ण करायचं असतं. तिच्या प्रबंधाच्या कामात खंड पडलाय तो जॉबमुळं. ती सध्या ‘ग्यानटेक इंडिया प्रा. लि.’मध्ये ट्रान्सलेटर नि सबएडिटर म्हणून काम करत्येय. या प्रोजेक्टमधले तिचे सीनिअर नारायण हरळीकर यांच्यामुळं तिच्या व्यक्तिमत्त्वाला आणखी चांगले पलू पडले. ‘कामात साचेबद्धपणा येऊ देऊ नको. नवनवीन गोष्टी शिक,’ असं ते तिला नेहमी सांगतात. त्यांच्याकडून तिला संपादनाच्या कामातल्या खूप गोष्टी शिकता आल्या. जॉब असला तरी वीकएण्डजना क्लासमध्ये शिकवणं तिनं चालूच ठेवलंय.   
ती सांगते की, ‘सुरुवातीला इंग्लिशचं मराठी भाषांतर करताना थोडी तारांबळ उडाली होती. त्या वेळी नारायणाकाकांनी भाषांतरशास्त्राची कला शिकवली. पुढं त्यांनी सहा महिन्यांनी प्रकृतीच्या कारणामुळं जॉब सोडला. तेव्हा एरवी कधीही डोळ्यातून पाणी न काढणारे काका तेव्हा थोडे गहिवरले. ‘तू ही जबाबदारी व्यवस्थितपणं निभावशील,’ असा धीर त्यांनी मला दिला. अजूनही त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी मिळतंय.’
आजवर तिला खूप माणसं चांगली भेटल्येत आणि भेटताहेत. ‘ज्ञान दिल्यानं वाढतं,’ हा प्रत्यय तिला वेळोवेळी येतोय. कॉलेजपासून सूत्रसंचालनाची तिला आवड होती. ट्रेनमध्ये स्तोत्रंपठण, टीव्हीवरच्या बातम्या ऐकणं आणि यूटय़ूबच्या साहाय्यानं आवाजाचा अभ्यास ती करतेय. अलीकडंच तिनं दीपक वेलणकर यांच्याकडं सूत्रसंचालनाचा कोर्सही केलाय. ती सांगते की, ‘एवढं सगळं करताना घरी वेळ देत नाही, स्वयंपाक वगरे शिकत नाही, म्हणून आई थोडीशी वैतागते. पण होतं अ‍ॅडजस्ट. या बिझी शेडय़ूलमधल्या रिलॅक्सेशनसाठी मी मत्रिणींशी किंवा घरच्यांशी गप्पा मारते. राग आला तर सरळ शॉिपगला जाते. डान्स-गाणी-व्याख्यानांची आवड यूटय़ूबच्या साहाय्यानं जोपासते. डायरीत वैयक्तिक अनुभवांपेक्षा आवडत्या कविता, सुविचार, टिपणं लिहायला नि पेपर कटिंग्जचं फायिलग करायला आवडतं. मी सतत पुस्तकं, आध्यात्मिक दिवाळी अंक वगरे विकत घेते. आमचं अर्ध घर जणू लायब्ररी झालंय.’
आवाज आणि भाषेची सांगड घालून अश्विनीला प्रसारमाध्यमांत काम करायचंय. त्यासाठी तिला गुरूंचा कौल आणि त्यांचं पाठबळ महत्त्वाचं वाटतं. चांगल्या कामासाठी बुद्धी आणि वाणीचा वापर करण्यावर ती भर देते. तिनं पीएच.डी.चा विचार अजून केलेला नाहीये. तिचा २०१३चा संकल्प आहे प्रबंध पूर्ण करणं. ‘समोर आलेल्या संधीचा स्वीकार कर. सकारात्मक दृष्टिकोन ठेव. समोरच्याला समजून घे. तू तुझ्या ध्येयाप्रत नक्कीच पोहोचणार आहेस. ‘यू कॅन डू इट..’ हा तिच्या परिचितांनी दिलेला मोलाचा सल्ला ती आचरत्येय. तो वसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू पाहत्येय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लर्न अ‍ॅण्ड अर्न या नव्या कॉलममधून तुम्हाला तुमच्या अशा काही मित्रांना आणि मैत्रिणींना भेटायला मिळणारेय जे शिकताना स्वतची आवड जपत आहेत. अर्थात ही आवड म्हणजे केवळ छंद जोपासण्याइतपत मर्यादीत नाही तर ही आवड आर्थिकदृष्टय़ा सक्षम होण्याची आहे. तरूणांमध्ये अलीकडे लर्निग प्लस अर्निग हे चित्र दिसून येत आहे. पूर्वी केवळ समर जॉब करणारे चेहरे आता कॉलेजच्या लेक्चर्ससह इतर जॉबसाठीही वेळ देत आहेत. अशाच तरूणांची आणि त्यांच्या कामाची महती आपण जाणून घेऊया. यासंदर्भात आपणास मेल करावयाचे असल्यास viva.loksatta@gmail.com या संकेतस्थळावर माहिती पाठवावी.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Learn and earn story of ashwini takle