नवीन वर्षांचं एक्सटेण्डेड सेलिब्रेशन अजूनही काही घरांमधून सुरू आहे. खरं तर थंडीच्या या दिवसात अधिकाधिक पौष्टिक खाण्यावर भर हवा. पण सेलिब्रेशन फूड पौष्टिक असतंच असं नाही. केक, पेस्ट्री, कटलेट म्हणजे भरपूर कॅलरी आणि पोषणमूल्य शून्य असं हे व्यस्त प्रमाण. पण या आवडीच्या पदार्थाचं पोषणमूल्य वाढवता येतं आणि तरीही ते तितकेच रुचकर लागतात. अशा हेल्दी रेसिपी सुचवणारं हे नवं पाक्षिक सदर. पहिल्या भागात ओट्सच्या तिखट– गोड रेसिपीज..
ओट्सपासून बनणारे दोन रुचकर पदार्थ देत आहोत. ख्रिसमस आणि नवीन वर्षांनिमित्त कॅरट केक हमखास बनवला जातो. पण नेहमीच्या मैद्याऐवजी ओट्स आणि गव्हापासून कॅरट केक बनवला तर एक टेस्टी आणि हेल्दी रेसिपी बनेल. सध्या बाजारात लाल गाजरंसुद्धा मुबलक प्रमाणात दिसताहेत. गाजरामध्ये असणारी व्हिटॅमिन्स मिनरल्स आणि गव्हामधील पोषणमूल्य, ओट्सचं फायबर हे एकत्र येऊन सुंदर आणि चविष्ट केक बनवता येतो. हा केक डिनर पार्टीच्या वेळी छान डेझर्ट ठरेल. तसंच चहाच्या वेळेत खायलादेखील पौष्टिक पदार्थ असेल. दुसरा पदार्थ -ओट्स आणि राजमा कटलेट. हा नेहमीच्या कटलेटला किंवा वडय़ाला हेल्दी पर्याय ठरू शकतो. राजमामुळे या कटलेटमध्ये मोठय़ा प्रमाणावर प्रथिने आहेत आणि ओट्समुळे पुरेसं फायबर मिळतं. घरगुती पार्टीसाठी किंवा इव्हनिंग स्नॅक्ससाठी हा परफेक्ट पदार्थ ठरतो. राजमा कटलेट मसाला चहासोबत रोज संध्याकाळीदेखील खाता येईल. हा परिपूर्ण पौष्टिक आहार ठरेल.
ओट्स आणि राजमा कटलेट
- साहित्य :
राजमा – १ कप (७० ग्रॅ), लो फॅट पनीर कुस्करून – १ कप (१०० ग्रॅ), ओट्स – ८० ग्रॅ, हिरव्या मिरच्या – २, आले – १ इंच (१० ग्रॅ), लसणीच्या पाकळ्या – ३ (१० ग्रॅ), गरम मसाला – अर्धा चमचा (३ ग्रॅम), बडीशेप पूड – अर्धा चमचा (३ ग्रॅम), कोथिंबीर – छोटा वाटा (१० ग्रॅम), चवीपुरते मीठ (३ ते ५ ग्रॅम), तेल – १ टीस्पून (५ मिली), अंडी (फक्त एग व्हाइट फेटून) – २, ब्रेड क्रम्स (कोटिंगसाठी)- एक कप.
बनवण्यासाठी लागणारा कालावधी – ४५ मिनिटं
- कृती :
राजमा किमान ८ तास पाण्यात भिजत घाला. रात्री टाकला तर सकाळी उपसून नंतर कुकरमध्ये थोडं मीठ घालून अगदी मऊसूत होईपर्यंत शिजवा. शिजवल्यानंतर जास्तीचे पाणी काढून टाका. आता एका मोठय़ा भांडय़ात राजमा घाला आणि पोटॅटो मॅशरचा वापर करून अगदी बारीक ठेचून घ्या किंवा फूड प्रोसेसरमध्ये बारीक करा. या भांडय़ात आता पनीर, मसाला ओट्स आणि (अंडी, तेल आणि ब्रेडक्रम्सखेरीज) उरलेले साहित्य घाला नीट एकत्र करून घ्या. गरजेनुसार मीठ घाला.
आता या घट्ट मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून त्याला कटलेटचा आकार द्या. २ अंडय़ांचा पांढरा भाग फेटून तयार ठेवा. त्या फेटलेल्या अंडय़ात हे कटलेट बुडवून ब्रेडच्या चुऱ्याच्या मिश्रणात घोळवा आणि श्ॉलो फ्राय करण्यासाठी तयार ठेवा.
फ्राइंग पॅन किंवा तवा मध्यम आचेवर गरम करून घ्या. त्यावर अगदी छोटा चमचा तेल घालून त्यावर हे अंडय़ात आणि ब्रेड क्रम्समध्ये घोळवलेले कटलेट भाजून घ्या. दोन्ही बाजूंनी लाल आणि कुरकुरीत होईपर्यंत कटलेट तव्यावर शेकून घ्या. कुरकुरीत झाल्यानंतर प्लेटमध्ये काढा. आंबटगोड चटणी किंवा टोमॅटो सॉससह सव्र्ह करा.
कॅरट केक
- साहित्य :
एक ते दीड कप गव्हाची कणीक, ८० ग्रॅम ओटचे पीठ, १ चमचा बारीक दालचिनी पावडर, अर्धा छोटा चमचा मीठ, २ छोटे चमचे बेकिंग पावडर, अर्धा कप पाम शुगर, पाव कप तेल, २ मोठी अंडी, १ कप गच्च भरून बारीक किसलेली गाजरे, अर्धा कप अक्रोडाचे काप, अर्धा कप बिनसायीचे दही (लो फॅट)
बनवण्यासाठी लागणारा कालावधी – ४० मिनिटे
- कृती :
गाजराचा केक बनवण्यास सुरुवात करण्याअगोदर ओव्हन १८० अंश सेल्सियसवर प्री-हीट करा. ९ इंची स्प्रिंग फोम पॅन किंवा ब्रेड लोफ पॅन किंवा कोणताही बेकिंग पॅन आतून तेल लावून आणि पीठ भुरभुरून बाजूला तयार ठेवा. ओट्स आणि कणकेचं पीठ, बेकिंग पावडर, मीठ आणि दालचिनी पावडर एकत्र करून ठेवा.
आता एका मोठय़ा बोलमध्ये तेल, साखर आणि अंडी चांगली फेटून घ्या. अंडी हलकी होईपर्यंत फेटून घ्या. हळूहळू पिठाचे मिश्रण घाला आणि हलवत राहा. आता यामध्ये गाजर घाला आणि चांगले एकजीव होईपर्यंत फेटत राहा. यात अक्रोड घाला आणि ग्रीझ करून बाजूला ठेवलेल्या केक पॅनमध्ये हे मिश्रण घाला. ओव्हनमध्ये ठेवा. ३५ ते ४० मिनिटे किंवा केकच्या मधोमध घातलेला टेस्टर स्वच्छ बाहेर येईपर्यंत बेक करा. केक तयार झाल्यावर ओव्हनमधून बाहेर काढा. थोडा थंड होऊ द्या आणि चहासोबत किंवा कॉफीसोबत किंवा अगदी दुधासोबत नाश्त्यासाठी द्या.
(‘फिट फूडी’च्या सौजन्याने)
viva@expressindia.com