लग्नाचा जोडीदार निवडताना तरुणाईच्या मनात गोंधळ असतोच. पालकही साशंक असतात, तणावात असतात. या विषयावरील लेखांवर अनेकांनी आपली मतं नोंदवली. त्यापैकी काहींची दखल..
तोलामोलाचा पार्टनर शोधण्यासाठी कराव्या लागणाऱ्या आटय़ापिटय़ाविषयी तुमच्याकडून खूप साऱ्या मेल्स आल्या. खूप मनमोकळे, बॅलन्स्ड आणि त्याचवेळी परस्परविरोध दाखवणारे विचार तुम्ही त्यात मांडलेत. मागच्या दोन आठवडय़ात सांगितलेल्या गोष्टींमधल्या अनिशाच्या बाजूचे काही जण, तर काही मधुराच्या. काही दोघींचंही बरोबर म्हणणारे होते. अनिशाच्या आईशी बरेच जण सहमती दर्शवत होते. आजच्या लेखात यातली प्रातिनिधिक मतं पाहू या. या मतांमधून एकूण तोलामोलाच्या पार्टनरविषयी असलेल्या वेगवेगळ्या भावना लक्षात येतील आणि आपले विचार अधिक क्लिअर व्हायला आणि त्यातून निर्णय सोपा व्हायला मदत होईल. या लेखांना आलेल्या प्रतिक्रियांपैकी काहींचा उल्लेख केलाय. काही नावं पत्रलेखकांच्या इच्छेनुसार बदलली आहेत.
लग्न म्हटलं की, सगळीच इक्वेशन्स एकदम बदलतात. उपवर मुलींच्या घरांमधली कुठलीही चर्चा ‘लग्न’ या स्टेशनवर येऊन थांबते. आत्ताआत्तापर्यंत आपल्या शिक्षणाविषयी, कमावण्याविषयी अभिमान बाळगणाऱ्या मुलींना ही लग्नाची बोलणी चालू झाली की हेल्पलेस वाटायला लागतं. शूरपणे प्रेमाच्या आणाभाका घेतलेले मुलगे ‘जाऊ दे गं, आईबाबा म्हणतायत ना, मग सांग तुझ्या आईवडिलांना एवढं करायला’, अशी नांगी टाकतात. लग्नाच्या संदर्भात दैव, नशीब, योगायोग असे शब्द आपण नेहमीच वापरतो त्यातून दिसते ती लग्नाबद्दलची अनिश्चितता!
स्वभाव, वृत्ती, संस्कार हेच सहजीवनात महत्त्वाचे, हे जरी कितीही खरं असलं तरी स्वभाव पूर्णपणे समजणं खूप अवघड आहे. आयुष्य गेलं तरी काही वेळा समजत नाही. त्यामुळे लग्न ठरवताना काही व्यावहारिक ठोकताळे वापरावे लागतात. संध्याताई तर म्हणतात की, आपल्या अपेक्षांची चक्क एक चेकलिस्ट करावी, त्यातल्या त्यात आवश्यक वाटणारे गुण जुळवावेत आणि त्यानंतर मात्र हे नातं यशस्वी करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करावेत.
शेखरकाकांचा त्यांच्या मुलाचं लग्न ठरवण्याचा अनुभव जरा निराशाजनकच होता. नवऱ्यामुलाचे वडील म्हणून त्यांच्या लक्षात आलं की, मुलींच्या अपेक्षा, शिक्षण, पगार हे सगळंच खूप आवाक्याबाहेर वाढलंय. आपण आता मुलाचं कुटुंब, त्याचे नातेवाईक यांना तितकंसं महत्त्व न देता फक्त फायनॅन्शियल बाबींनाच नको इतकं महत्त्व देतो ही समाजाच्या दृष्टिकोनातून काही फारशी बरी गोष्ट नव्हे. शिवाय इतक्या सगळ्या अटींना पुरे पडताना मुलं-मुली दोघांचीही लग्न ठरण्याची वयं खूप पुढे गेलीयेत. लग्न ठरता ठरता तिशी ओलांडली की, आईबाबांचं हतबल होणं साहजिक आहे. कारण एकीकडे आपलं बायॉलॉजिकल क्लॉक टिकटिकत असतं. मुलं, त्यांचं संगोपन हे सगळं कधी करणार मग? त्यामुळेच सुधाताईंना अनिशाच्या आईचं कासावीस होणं पटतं.
राधाच्या मते, फक्त पुरुषांनाच नव्हे, तर स्त्रियांनाही पुरुषी वर्चस्वाची इतकी सवय झालीये की, नवीन काही पचनी पडणं कठीण जातं. मग तो मुलाचा कमी पगार असो की मुलीची परदेशवारी असो की कमी-जास्त शिक्षण, वय असो. परदेशी जाऊन आलेल्या मुलीसंदर्भात, ‘मुलीनं तिकडे काय अनुभव घेतले असतील कोण जाणे’ अशा शंकेखोर वृत्तीतून नकार दिला जातो. पण एखाद्या कडू अनुभवातून तमाम सुनांवर शंका घेत राहिलं तर कुणाविषयीच भरवसा वाटणार नाही. इनफॅक्ट या नव्या नात्याचा पायाच मुळी भुसभुशीत राहील. जर तुम्ही असे ठाम पारंपरिक विचारांचे असाल तर तसं लग्नाआधी स्पष्टपणे सांगून हे पटणारा पार्टनर शोधावा हे उत्तम. पण मनात संदेह असेल तर समुपदेशकाची मदत घेण्यातही काही कमीपणा नाही, असं त्या म्हणतात. लहानपणापासून आपल्याला ज्या पद्धतीनं वाढवलं जातं, त्यावर आपले मोठेपणीचे विचार ठरतात असं सायलीला वाटतं. बाबा जर घरकामात आईला मदत करताना दिसले तर मुलं आपोआपच हा रोल स्वीकारतील. नाही तर लग्न ठरण्यापुरता लिबरल असल्याचा मुखवटा धारण करतील आणि नंतर त्यांचे खरे रंग दाखवतील.
सुमेधचा ‘तोलामोलाचा’ या शब्दाला आक्षेप आहे, पण त्याचबरोबर अरेंज्ड मॅरेजमध्ये तुलनेला पर्याय नाही हेही तो मान्य करतो. त्याला लहानपणापासून ओळखत असलेल्या मुलीशी त्याचं लग्न ठरत होतं. पण त्यावेळी तुलना झालीच तेव्हा आड आला तो त्याचा तिच्यापेक्षा कमी पगार.
आरती म्हणते की, शिकलेली मुलगी डोईजड होईल अशी फक्त भावी नवऱ्यांनाच नाही तर सासू-सासऱ्यांनाही उगीचच भीती वाटत असते. पण फक्त या कारणासाठी करिअर, शिक्षणाची अपॉच्र्युनिटी सोडणं बरोबर नाही, असं तिचं आणि दीपाचं मत. मात्र शिक्षण आणि पगार बरोबरीचा असावा. कारण त्यातली तफावत विसंवादाला कारणीभूत ठरू शकते, दोघांची विचारप्रक्रिया अशावेळी भिन्न असू शकते. सुनीताला वाटतं की, शिक्षण कमी असेल तरी चालेल, पण सुसंस्कृत असणं आणि व्यवहारज्ञान असणं महत्त्वाचं. मनोजचंही म्हणणं आहे की, शिकूनही विचार बुरसटलेलेच राहिले तर काय उपयोग त्या शिक्षणाचा? काही मुलांच्या अशा एकोणिसाव्या शतकातल्या विचारांमुळे नाईलाजानं आईबाबा मुलींवर बंधनं घालतात आणि मग एक पाऊल पुढे गेलेला आपला समाज दोन पावलं मागे जातो.
तुमच्या सगळ्यांच्या या प्रतिक्रिया आजची स्थित्यंतराची परिस्थितीच अधोरेखित करतात असं नाही वाटत? लग्न, जीवनसाथी यांबाबतच्या अपेक्षा आता पूर्वीसारख्या राहिलेल्या नाहीत, हे खरं आहे. मुला-मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी आता आपल्या ठाशीव कल्पना बदलायची वेळ आलीय. हे सगळ्यांनाच पटतंय बदल व्हायला हवेत, नव्हे ते होणारच. आपल्या जगण्याच्या पद्धतीमध्ये इतकं परिवर्तन होतंय तर लग्नव्यवस्था तरी तशीच कशी राहील? पण ते बदल सडन, क्रांतिकारक असतील तर गोंधळाची परिस्थिती उठवण्याची शक्यता जास्त. याउलट, ते स्लो आणि स्टेडी असतील तर अधिक अॅक्सेप्टेबल, जास्त टिकाऊ राहतील. आपल्या पुढच्या-मागच्या काही पिढय़ा या ट्रान्झिशनमध्ये काहीशा भरडल्या जातील, बऱ्या-वाईट अनुभवांच्या शिकार ठरतील, हे खरंय. पण एक वेळ अशी येईल की, जेव्हा स्त्री-पुरुष समानतेसारख्या काही स्वप्नवत वाटणाऱ्या गोष्टी खऱ्या होतील कदाचित. तेव्हा लग्नसंस्था अस्तित्वात तरी असेल की नाही कोण जाणे? या साऱ्या घडामोडींना आपण साक्षी असू हे काय कमी आहे?
viva@expressindia.com
