परीक्षा, अभ्यास, रिलेशनशिप, मैत्री, करिअर, लुक्स.. तरुणाईच्या आयुष्यात यातलं काहीही हल्ली तणाव निर्माण करतं. असुरक्षितता, घाई, धावपळ, स्पर्धा आणि तणाव.. यातून सुटका नाही का? हे सगळं नसेल तर आयुष्यात मजा काय? यातली खुमारी तर राहिली पाहिजे पण तोलही जायला नको. करता येईल असं? स्ट्रेस मॅनेजमेंटच्या टिप्स देणाऱ्या गोष्टी

‘खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक राजा होता. त्याला एक गोरी गोरी पान, सुंदर राजकन्या होती. ती खूप सद्गुणी, हुशार होती. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी एक चेटकीण आली. काळीकुट्ट, कुरूप.  तिनं राजाला शाप दिला..’ अशा स्वरूपाच्या गोष्टी आपण लहानपणी ऐकलेल्या असतात.  इतकंच नव्हे, तर लहान मुलांना गोष्ट सांगायची वेळ आली तर आपली गोष्टही थोडय़ा फार फरकानं अशीच असते. कधी खटकत नाही त्यातलं काही आपल्याला. या गोष्टींमधल्या राणी, राजकन्या वगैरे नेहमी गोऱ्या गोऱ्यापान असतात. त्या सद्गुणी, सुंदर आणि हुशार असतात. त्याउलट राक्षस, चेटकिणी..  नेहमी काळे, कुरूप आणि दुष्ट. लहानपणी, काहीही न कळण्याच्या काळात अशा गोष्टींचा भडिमार झाल्यावर आपल्या डोक्यात घट्ट बसतं, की काळी माणसं चांगली नसतात. गोरी माणसं मात्र हुशार आणि सज्जन असतात.

या रंगाशी संबंधित नुकत्याच दोन बातम्या आल्या होत्या पेपरमध्ये. एक होती आपल्या एका पोलिटिशियनच्या कमेंटची. आपला रेशियल टॉलरन्स दाखवण्यासाठी या महाशयांनी दिलेलं उदाहरण म्हणजे विरोधाभासाची कमाल होती. ते म्हणाले, ‘आम्ही वर्णभेदी कसे? आम्ही तर काळा रंग असलेल्या साऊथ इंडियन्सनाही सामावून घेतो.’

दुसरी बातमी होती अभय देओल या बॉलिवूडच्या अ‍ॅक्टरच्या मतांविषयी.  मोठमोठय़ा हीरो-हिरॉइन्सनी केलेल्या फेअरनेस क्रीम्सच्या जाहिरातींवर त्यानं टीका केली. तरुणाईवर प्रचंड प्रभाव असणाऱ्यांनीच अशी गोऱ्या रंगाची भलामण केली तर त्याचा किती वाईट परिणाम होईल, हे त्याचं म्हणणं अगदी विचार करण्यासारखं आहे.

बहुतेक सगळे लोक जिथे चॉकलेटी ते काळ्या रंगाचे असतात, त्या आपल्या भारत देशात गोरा रंग नसणं हा इतका मोठा इश्यू का असतो? खरं तर त्वचेमध्ये असणारं मेलॅनिन या द्रव्याचं प्रमाण ठरवतं आपल्या स्किनचा कलर. भारतासारख्या उष्ण देशात हे मेलॅनिन अ‍ॅक्च्युअली आपलं सूर्याच्या प्रखर किरणांपासून रक्षण करतं.

माझ्या अनेक तरुण मित्रमैत्रिणींशी या संदर्भात बोलणं झालं. त्यांना स्वत:ला काही प्रॉब्लेम नसतो, पण आजूबाजूचे लोक इतक्या सातत्यानं रंगाविषयी बोलतात, सल्ले देतात, की तो विषय कानाआड करणं अशक्य होऊन बसतं. अगदी निग्रो माणसांना अमेरिकेत मिळायची तशी नाही मिळत वागणूक, म्हणजे बसायला वेगळी जागा, वेगळं टॉयलेट, काही ठिकाणी प्रवेश नाही वगैरे. पण हळूच, स्वत:च्याही नकळत, काही वेळा जाणून बुजून डार्क रंगाच्या लोकांना कमीपणा दाखवून दिला जातो.  ‘हा रंग तुला नाही सूट होत’. ‘अरे हा तुझा नवीन बॉयफ्रेण्ड? बरा तुला गोरा बॉयफ्रेण्ड मिळाला.’ , ‘वहिनी, हिच्यासाठी आत्तापासूनच नवरा शोधायला सुरुवात करा.’ , ‘अरे, फ्लॅश ऑन करा, नाही तर याचा फोटोच नाही निघणार.’..  परीकथांमधून, गाण्यांमधून, समारंभांतून असं सगळीकडेच सारखं सारखं कुणी हॅमर करत राहिलं, अगदी न कळत्या वयापासून, तर काय होणार. मूव्हीजमध्ये, जाहिरातींमध्ये तर दाखवतात की गोरा रंग नसेल तर आयुष्यात काहीही करणं शक्य नाही.  मग तुम्हाला नोकरीही मिळणार नाही आणि छोकरीही. खेळाच्या मैदानावरही तुम्हाला चमकता येणार नाही. लग्नाच्या अपेक्षांबद्दल तर न बोलावं तितकं बरं.

काही मुलं जिद्दीनं अभ्यासात, करिअरमध्ये, एखाद्या कलेत काहीतरी स्पेक्टॅक्युलर अचिव्ह करतात, त्यांना सापडतं आपलं विश्व. अपमानांच्या उरावर चढून ते त्यातून असे बाहेर पडतात खरे, पण जणू काही रंगाची कमतरता असं काही मिळवून भरून काढणं त्यांच्यासाठी आवश्यक ठरतं. शिवाय प्रत्येकालाच हे जमेल असं नाही. बऱ्याच जणांना कॉम्प्लेक्स येतो. अनेक जण मनानं खचतात, निराशावादी होतात. त्यांचा आत्मविश्वास ढळतो.  कितीतरी जणांनी मला सांगितलं की, शाळेत त्यांना नावं ठेवली गेली (यात शिक्षकही सामील होते), चिडवलं गेलं, बाजूला टाकलं गेलं. कित्येकांना चांगला अभिनय येत असूनही नाटकात साईड रोल दिला गेला. मोठं झाल्यावरही हे सगळं विसरणं सोपं नसतं.

ग्लोबलायझेशनचा वेग भंजाळून जाण्यासारखा असला तरी त्याचा या बाबतीत मात्र फायदा होतोय. जगात इतकी वेगवेगळ्या प्रकारची, रंगांची, आकारमानांची लोकं असतात हे दिसलं की या वरवरच्या गोष्टींना आपोआपच फारसं महत्त्व दिलं जात नाही.  तुमचं कौशल्य, कामाचा उरक, कामातलं नावीन्य हेच इथे महत्त्वाचं ठरतं. रंग, उंची या सगळ्याच्या पलीकडे जाऊन विचार करणं शक्य होतं.  ‘मी आहे हा असा आहे किंवा अशी आहे, प्रॉब्लेम माझ्यात नाहीये तर बघणाऱ्यांच्या नजरेत आहे, बदलायचं असेल तर त्यांना बदलायला हवं’ अशा विचारप्रक्रियेतून आत्मविश्वासाचं तेज चेहऱ्यावर आपोआप येतं.

आपल्याकडे दोनच पर्याय असतात. एक तर सोसायटीचा अ‍ॅटिटय़ूड बदलायचा आणि दुसरं, स्वत:चा अ‍ॅटिटय़ूड बदलायचा. यातला कुठला पर्याय शक्य आहे? आपल्यालाच ठरवायला लागेल. सोसायटीचा जबाबदार घटक म्हणून माझा स्वत:चा आणि त्याबरोबर इतरांचा अ‍ॅटिटय़ूड बदलायला मला काय करता येईल? वरवरच्या आवरणापलीकडचा माणूस शोधता येईल का? यावर कॉन्शसली विचार करत राहू. रंगाच्या या अननेसेसरी मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणं आवश्यक आहे आपल्याला. हो ना?

viva@expressindia.com