कॉलेजच्या कट्टय़ावर, कॅन्टीनच्या अड्डय़ावर दिवसभराच्या चळवळींचा आढावा देता-घेताना अनेक गोष्टींना जन्म दिला जातो. कधी नव्या कल्पनांना धुमारे फुटतात, कधी नवी स्वप्ने भरारी घेतात. पण इथे जन्माला येणारे शब्द मात्र या कट्टावासीयांबरोबर पुढे पुढे जात राहतात. तरुणाईचे विचार समजून घेताना, त्यांची भाषा, त्यांचे शब्द हे गमतीशीर जग अनुभवण्यासारखं असतं. या सदरातून कट्टय़ावरचे असे अनेक शब्द त्यांच्या अर्थासकट उलगडणार आहेत.
‘स्वॅग’ हा शब्द इतका सर्रास वापरला जातोय की त्याचा खरा अर्थ नक्की काय आहे याच्या मुळाशी जायचा कोणाचाच विचार दिसत नाही. एखादा शब्द कट्टय़ावर लोकप्रिय झाला की मग पहिल्यांदा बॉलीवूड त्याला आपलंसं करतं. या प्रथेप्रमाणे सध्या ‘स्वॅग’चा बोलबाला हिंदी चित्रपटातील गाण्यांमधूनही वाढत चालला आहे. त्यामुळे तर हा शब्द अगदी घरचा वाटू लागला आहे. या शब्दाचा सध्या केवळ एकच अर्थ गृहीत धरला जातो आहे आणि त्याच अर्थाने त्याचा वापर केला जातो. हा अर्थ जो अमेरिकन आहे तो म्हणजे ‘अॅटिटय़ूड’. अर्थातच, अॅटिटय़ूड दाखवण्यात तरुणाईला जास्त रस असल्याने सध्या त्यांना ‘स्वॅग’चा हा अर्थ चांगलाच भावला आहे, मात्र या शब्दाचे अनेक अर्थ आहेत ज्यांचा कदाचित काही वेळा संदर्भ गृहीत धरला जातो. या शब्दाचं मूळ हे स्कॅन्डेनॅव्हियन मानलं जातं. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला याचा उगम मानला गेला आहे.
एक किंवा अनेक पडदे किंवा फुलं अशा गोष्टी डेकोरेशनसाठी बांधल्या जातात, सजावटीच्या उद्देशाने फुलांच्या माळा टांगल्या जातात, पडदे वेगवेगळ्या पद्धतीने बांधले जातात त्याला ‘स्वॅग’ म्हणतात. लग्नाच्या मांडवाला फुलांच्या माळा, रंगीबेरंगी कापडाने सजावट केली जाते, ज्याला आपण अनेकदा ‘आरास’ असंही म्हणतो, त्यालाच स्वॅग म्हटलं जातं. याच संदर्भाने स्वॅगचा क्रियापद म्हणूनही वापर केला जातो. ‘टू स्वॅग’ म्हणजे अशा पद्धतीची कलात्मक आरास करणे किंवा सजावट करणे.
स्वॅग हा शब्द ‘सामान’ या संदर्भातही काही वेगवेगळ्या पद्धतीने वापरला जातो. ज्यावेळी कोणत्या कंपनीचं किंवा ब्रँडचं प्रमोशन करण्यासाठी तो ब्रँड काही वस्तू मोफत देतो त्यावेळी अशा वस्तूंना ‘स्वॅग’ म्हटलं जातं. याच्या संदर्भात ‘स्वॅग’ हे ‘स्टफ वुई ऑल गेट’ याचं संक्षिप्त रूप म्हणून घेतलं जातं. चोरीच्या, दरोडा घालून आणलेल्या वस्तूंनासुद्धा स्वॅगच म्हणतात. ऑस्ट्रेलियन इंग्रजीच्या अर्थानुसार स्वत:जवळच्या सामानालाही ‘स्वॅग’ असं म्हणतात. त्याच ऑस्ट्रेलियन अर्थाने स्वॅग म्हणजे विशेषण आहे. ‘खूप’ हे विशेषण आणि गंमत म्हणजे हे फक्त सामानाचा उल्लेख करण्यासाठीच वापरलं जातं. उदा. स्वॅग्ज् ऑफ गुडीज म्हणजेच खूप साऱ्या वस्तू. आपण सामान्यत: ज्या अर्थाने स्वॅग वापरतो तो अर्थ अमेरिकन असला तरीही तो केवळ एकच अमेरिकन अर्थ नाही. ‘कॅनाबिस’ किंवा ‘भांग’ ज्याला म्हणतात त्यालाही अमेरिकन इंग्लिशमध्ये स्वॅगच म्हटलं जातं. मात्र हा शब्द सरसकट सगळ्याच प्रकारच्या कॅनाबिससाठी वापरला जात नसून केवळ हलक्या दर्जाच्या कॅनाबिससाठी ‘स्वॅग’ हा शब्द वापरला जातो.
आपल्या वापरात असलेला ‘स्वॅग’ हा त्या मूळ शब्दाचा ‘अॅटिटय़ूड’ हा केवळ एक अर्थ असून त्याचे इतर अनेक अर्थ अनेक ठिकाणी आपल्याला वापरता येऊ शकतात. एखादा शब्द तरुणाईच्या वापरात वारंवार यायला लागला किंवा तरुणाईने नव्याने कोणता शब्द घडवला की त्यांच्या या शब्दकोशात शिरून त्याची माहिती, त्याचा मूळ अर्थ, त्याची पाश्र्वभूमी, संदर्भ असा खास देशी शब्दांचा ‘कट्टा’ तुमच्यासमोर खुला करण्याचं काम या सदरातून होणार आहे. सर्व वाचकांना ‘स्वॅग’से नववर्षांच्या शुभेच्छा!
viva@expressindia.com