सोशल मीडियामधलं लोकांचं चित्र असतं देखणं, पण त्यात दाखवलेला असतो सुखाचा, आनंदाचा अतिरेक किती खरा धरायचा? सुखी माणसाचा मुखवटा घालायच्या नादात आपण रिअॅलिटी विसरून जातो का? ..
‘द मास्क ऑफ हॅपीनेस’मागचं वास्तव..
ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली, हॉलीवूडमधलं एक गोल्डन कपल. ती दोघं, त्यांची स्वत:ची मुलं आणि वेगवेगळ्या देशांतून अॅडॉप्ट केलेली मुलं असं एक भलंमोठं, विलक्षण कुटुंब. कुणालाही हेवा वाटावं असं. सतत मीडियामध्ये त्यांचे एकमेकांबरोबरचे आणि मुलांबरोबरचे हसरे फोटो. एका आयडियल, सुखी कुटुंबाचं चित्र. अचानक एक दिवस कळलं की ते वेगळे होतायत. इतकंच नाही तर एकमेकांवर गलिच्छ आरोप-प्रत्यारोपही करतायत.
गिरिजा म्हणजे एक पॉप्युलर, स्मार्ट मुलगी. अनेक मुलं तिच्यावर मरायची आणि तितक्याच मुली तिच्यावर जळायच्या. डेटिंग, पार्टीज, फॉरिन ट्रिप्स असं फेअरीटेल आयुष्य जगणारी, कायम हसणारी गिरिजा अचानक कॉलेजमध्ये येईनाशी झाली. प्रचंड डिप्रेशनमध्ये बुडाल्यामुळे तिला ट्रीटमेंट द्यायला लागली होती.
वरवर सुखात असणाऱ्यांच्या बाबतीत या ज्या घटना घडतात, त्या का बरं होत असतील? आणि त्या एका दिवसात होतात का? या दिखाऊ देखण्या चित्रामागे काय असतं? सुखी माणसाचा मुखवटा घालण्याच्या नादात रिअॅलिटी विसरून जातो का आपण?
आनंदी, सुखी व्हायला सगळयांनाच आवडतं. फिलॉसॉफिकल मूडमधे असलो की आपण म्हणतोही, ‘ही संपत्ती, गॅजेट्स, कपडे या मटेरियल गोष्टींचा काही उपयोग नाही. शेवटी जीवनात आनंद महत्त्वाचा. आय जस्ट वाँट टू बी हॅपी!’ कितीदा तरी आईबाबा मुलांना म्हणतात, ‘अरे, तुम्ही आयुष्यात सुखी व्हावं यासाठीच चाललंय ना हे सगळं?’
नुकतंच ब्रिंकमन नावाच्या एका डॅनिश सायकॉलॉजिस्टचं जरा वेगळं मत वाचनात आलं. ते म्हणतात की, ‘आपण सतत आनंदी असायलाच हवं असं काही नाहीये. उलट तसं झालं तर आपण भावनिक दृष्टय़ा दरिद्री होऊ.’
कल्पना करू की, एका मुलाला गोड खायला भयंकर आवडतं. सकाळ-दुपार-संध्याकाळ त्याला फक्त गोड खायला दिलं तर? मिठाशिवाय अन्नाला चव नसते, पण म्हणून काही नुसतं मीठ खात सुटत नाही कुणी. प्रत्येक चवीचं जेवणात जसं स्थान तशी प्रत्येक भावनेची आपल्या आयुष्यात काही जागा आहे. मग सतत आनंदी राहायचा तरी अट्टहास कशाला? त्या सुखाला चव देणाऱ्या बाकीच्या भावनांनाही तितकंच महत्त्व द्यायला हवं. राग, दु:ख, हताशपणा, तिरस्कार, नैराश्य, वैताग या वरवर नकारात्मक वाटणाऱ्या भावना. नकोशा, टाळाव्याशा वाटणाऱ्या. पण आपण सायन्समध्ये शिकलोय युनिव्हर्समधल्या बँलन्सविषयी. चांगल्या-वाईट, हव्याशा-नकोशा, पॉझिटीव्ह-निगेटीव्ह अशा सगळया गोष्टी प्रपोर्शनमधे असाव्या लागतात. मग आपल्या भावना कायम सुखाच्या, आनंदाच्या दिशेनं झुकल्या तर हा नाजूक बॅलन्स बिघडणार नाही का?
शिवाय असंही आहे की आयुष्य रंगीबेरंगी आहे आपलं, एकसुरी, एकरंगी नाही. त्यात निरनिराळे प्रसंग, वेगवेगळ्या घटना असणार. दरवेळी आनंदच दाखवणं कसं अँप्रोप्रिएट असेल? म्हणजे समजा आपण पडलो आणि आपल्याला जखम झाली. अशा वेळी त्रास होत असतो, दुखत असतं. तेव्हा रडू येईल किंवा चेहरा वेडावाकडा तरी होईल. त्याऐवजी कुणी जोरजोरात हसत सुटलं तर? जेव्हा दु:ख होईल तेव्हा ते दु:खाच्या स्वरूपातच बाहेर पडायला हवं ना? उगीचच सुखाचा आवेश आणला तर ढोंगीपणा नाही का होणार तो? आणि त्या दाबून ठेवलेल्या भावना कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात उफाळून येणारच.
भावना अनुभवणं हा एक भाग झाला आणि त्या दाखवणं हा दुसरा भाग. आपलं दु:ख इतरांना दाखवायला आपल्याला सहसा आवडत नाही. दु:ख स्वत:पाशी ठेवावं आणि सुख जगाला दाखवावं असं आपल्याला लहानपणापासून सांगितलेलं असतं. त्यातून आपल्यामागे आता असतो सदा सोशल मीडियाचा बडगा. काय बिशाद कुणाची की आपलं अपयश, आपला कमीपणा जगासमोर मांडेल. लोग क्या कहेंगे? मीडियामधलं लोकांचं चित्र असतं देखणं, हेवा वाटण्याजोगं. त्यात निगेटीव्ह प्रतिमांना जागा नसते. त्यात दाखवलेला असतो सुखाचा, आनंदाचा अतिरेक. तो किती खरा धरायचा? त्यावर बेतायच्या का आपल्या सुखाच्या कल्पना?
सुखी समाधानी असावं ही इच्छा काही गैर नाही. इन फॅक्ट त्या लालसेमुळेच तर प्रगती झाली माणसाची. पण जेव्हा त्याचा अतिरेक होतो, मी सुखीच व्हायला पाहिजे, दु:खी व्हायलाच नको असा दुराग्रह होतो तेव्हा मात्र थांबून विचार करायला हवा. सुखी होण्यासाठी आपण फार ओढाताण करतोय, त्याचाच स्ट्रेस घेतोय असं झालं तर ते सुख हे मृगजळच ठरण्याची शक्यता अधिक. त्याच्या शोधासाठी अति आटापिटा केला तर आपल्या जवळ होतं ते निसटून गेलं तरी समजणार नाही. मग हळहळ वाटत राहील.
सुखी होण्याचा कानमंत्र काय कोण जाणे? पण जर असेल काही तर ‘सुखाच्या मागे न धावणं’ हाच असावा तो.
(लेखिका वैद्यकीय व्यावसायिक असून किशोरवयीन मुलांच्या समस्यांविषयीच्या तज्ज्ञ आहेत)
