आपल्या कलेला वाव देण्यासाठी अनेक युवक कलाकार सध्या ‘यू-टय़ूब’चा वापर करू लागले आहेत. यू-टय़ूब कण्टेण्ट जनरेशन हे कलाकारांचं आवडीचं व्यासपीठ बनलं आहे. रंगार्त आणि cine maa या दोन नव्या यू-टय़ूब चॅनेल्सविषयी आणि या पटावरच्या तरुण मोहऱ्यांविषयी..
रेडिओ, टीव्ही आणि आता मनोरंजनाच्या घरगुती दुनियेत सोशल मीडियाचा त्यातही यू-टय़ूबचा समावेश झाला आहे. ‘गो ऑनलाइन’ असं म्हणत नव्या पिढीतली जनता या सोशल मीडियाच्या गावात गर्दी करू पाहात आहेत. पण टीव्हीसारखं यू-टय़ूब हे माध्यमदेखील केवळ रिसिव्हिंगचं नाही. प्रेक्षक म्हणून या दुनियेचा भाग होणं जितकं सोपं आहे, तितकंच कलाकार म्हणून पुढे येणंही या माध्यमातून सहज शक्य आहे. आपल्या कलेला वाव देण्यासाठी अनेक युवर कलाकार सध्या ‘यू-टय़ूब’चा वापर करू लागले आहेत. यू-टय़ूब कण्टेण्ट जनरेशन हे कलाकारांचं आवडीचं व्यासपीठ बनलं आहे.
नव्याने कला साकारणाऱ्या किंवा सादर करणाऱ्या तरुणाईचा कल सध्या टीव्हीपेक्षा यू- टय़ूबकडेच जास्त आहे. त्यातलाच एक ग्रुप म्हणजे एस के सोमैय्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा ‘नाटय़ांकुर’ नावाचा गट. चित्रपट आणि अभिनयाची आवड असणाऱ्या काही ‘अॅक्टोहोलिक’ मुलांनी सुरू केलेल्या नाटय़ांकुरनं आता स्वतचं यू-टय़ूब चॅनेल बनवलंय- ‘मदर cine maa. मदर सिनेमा या चॅनेलसाठी शशांक सिंग, करण कृष्णा बेलोसे, सुमित चव्हाण, दीप नाईक आदी अभिनय क्षेत्राकडे करिअरच्या दृष्टिकोनातून पाहणारी मंडळी अॅक्टिव्ह असतात. या ग्रुपचे नाटकांबरोबरच शॉर्टफिल्म बनवण्याचेही उद्योग सुरू असायचे. यातूनच त्यांची पहिली शॉर्टफिल्म बनली आणि त्यांनी ती यू-टय़ूबवर पोस्ट केली. पहिल्याच फिल्मला यू-टय़ूबकरांनी जोरदार प्रतिसाद दिला. या फिल्मला अनेक दर्शक लाभले. तेव्हाच यू-टय़ूब चॅनेल बनवण्याचा विचार या मुलांनी सुरू केला. या टोळीतले बहुतांशी सर्वच जण अभिनय, फिल्म मेकिंगच्या अगदी प्रेमातच आहेत असं म्हणायला हरकत नाही.
या टोळीतले बहुतांशी सर्वच जण अभिनय, फिल्म मेकिंगच्या अगदी प्रेमातच आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे हेच प्रेम व्यक्त करण्यासाठी एखादी आई ज्याप्रमाणे मुलांसाठी सर्वस्व बहाल करते त्याच भावनेने नव्याने समोर आलं नवं कोरं यू-टय़ूब चॅनल ‘मदर सिनेमा’ (सिनेमाचं स्पेलिंग ते cine maa असं करतात ते त्यातल्या माँसाठीच!).. असं शशांक म्हणाला. दीप नाईक म्हणतो, cine maa म्हणजे माझ्यासाठी खूप काही शिकण्याचा, अनुभवण्याचा आणि काहीही न गमावता बरंच काही मिळवण्याचा हक्काचा कट्टाच आहे.’
नेहमीच्या टीव्हीवर चालू असणाऱ्या कौटुंबिक रडकथा नव्याने न करता विविध सामाजिक विषय, वैयक्तिक अनुभव स्मार्टपणे हाताळून या नव्या करमणुकीच्या साधनाचा अचूक वापर ही मंडळी करत आहेत. ही मुलं अभिनय तर करतातच; पण बरोबरीने लेखन, दिग्दर्शन, बॅकग्राऊंड म्युझिक, एडिटिंग, डीओपी अशी सगळी प्रक्रिया या ग्रुपमधले तरुणच करतात. या चॅनलवर आतापर्यंत ‘अ लेट कॉल’ आणि ‘द स्टोरी.. दॅट नेवर एंड्स’ अशा दोन शॉर्टफिल्म आल्या आहेत.
या फिल्म्सचे टिझर्सही आकर्षक आहेत. सप्टेंबर २०१५ला सुरू झालेल्या या cine maa चे सध्या एक हजारपेक्षा जास्त व्ह्य़ुअर्स आहेत, तर शेकडो सबस्क्रायबर्सही आहेत. हा आलेख अशाच वेगाने उंचावत नेण्याचा ‘सिनेमा’करांचा मानस आहे.
फिल्म्स, अभिनय याबद्दल असणारं प्रेम, निष्ठा, आदर या भावनांचा संमिश्र दुवा म्हणजे Cine maa. सिनेमाचं माझ्या आयुष्यातील स्थान फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे माझ्या आईप्रमाणेच आदर व प्रेम मी या कलात्मक Cine maa वर करतो.
– शशांक सिंग
जिनं मला जन्म दिला ती माझी आई. त्यानंतर ज्यामुळे मला जगण्याचं ठोस कारण मिळालं, कलासाधनेची प्रेरणा मिळाली ते म्हणजे आमचं ‘मदर सिनेमा’.
– सुमित चव्हाण
सामाजिक जाणिवेचं ‘रंगार्त’
आरोहने यापूर्वी रंगभूमीवर काम केलंय. ‘रेगे’ या मराठी चित्रपटात त्याची प्रमुख भूमिका होती. नवीन संकल्पना, नवे संगीतकार, नवे कलाकार या साऱ्या नवलाईच्या शोधात असताना सामाजिक जबाबदारी व करमणूक यांना जोडणारा भक्कम दुवा म्हणूनही रंगार्त काम करत आहे. नाना पाटेकरांच्या दुष्काळग्रस्तांना मदत करण्याच्या निर्णयाप्रमाणेच टेक्नॉलॉजीचा वापर करून महाराष्ट्रातील आणि सबंध भारतातील शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात देण्याचा निर्णय रंगार्तने घेतला आहे. या चॅनलवरील व्हिडीओज बघा, लाइक, शेअर, सबस्क्राइब करा, कारण या मार्गाने ‘रंगार्त’ला होणारा फायदा हा देणगी स्वरूपात शेतकरी कुटुंबांना देण्यात येणार आहे. त्यामुळे सबस्क्राइब करा, असं आवाहन आरोहने ‘व्हिवा’शी बोलताना केलं. चाहत्यांचा आकडा वर जाईल तसतसा मदतीचा ओघही वाढेल अशी रंगार्तची अपेक्षा आहे. बरेच कलात्मक सरप्राइजेस देण्यासाठी रंगार्त पूर्णपणे सज्ज आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. अनेक ओळखीचे चेहरे आता कामाला लागले आहेत. काही अनोळखी चेहऱ्यांना व त्यांच्या कलेला प्रसिद्धी आणि ओळख देण्यासाठी हे नवंकोरं रंगार्त सज्ज आहे.
‘रंगार्त’ला होणारा फायदा देणगीस्वरूपात शेतकरी कुटुंबांना देण्यात येणार आहे.
– आरोह वेलणकर
viva.loksatta@gmail.com