परवाच ‘ती’ मला भेटली. दिलखुलास गप्पा झाल्या. ‘ती’ नुकतीच दहावीत गेल्येय. दहावीत गेल्येय नि गप्पा मारत्येय, याबद्दलचं वाटणारं आश्चर्य तुमच्या चेहऱ्यावर साफ उमटलेलं दिसतंय. कारण हे हल्लीच्या काळात मुळीच न पटण्यासारखं आहे. दहावी म्हटल्यावर क्लिक होतं ते ढेरसाऱ्या क्लासेसचं भयंकर टाईट टाइमशेडय़ुल! पण ‘तिला’ हे शेडय़ुल मुळीच तापदायी ठरणार नाहीये. कारण शाळेतला अभ्यास नि स्वयंअध्ययनावरच ‘ती’ भर देणारेय. त्याखेरीज उरणाऱ्या वेळात ‘ती’ तिच्या कलाजाणिवा जोपासणारेय. ही दहावीची विद्याíथनी आहे, श्रुती सोमण!
श्रुती पूर्वी भावेकडं गेली ७ र्वष भरतनाटय़म शिकतेय. नृत्यक्षेत्रात तिच्या गुरू पूर्वी भावे याच तिच्या आयडॉल आहेत. लहानपणी ती ‘कलांगण’ या वर्षांताई भावे यांच्या संस्थेत गाणं शिकायला जायची. संस्थेतर्फे विविध कार्यक्रम असायचे. तेव्हापासून ती स्टेजवर जायला लागली. त्यामुळं तिला स्टेजफीअर अजिबात नाहीये. या सगळ्याची आवड निर्माण झाल्यामुळं ती विद्याताईंच्या कार्यशाळेत सहभागी होऊ लागली.
पाचवीत असताना श्रुती विद्याताई पटवर्धन यांच्या कार्यशाळेत जायला लागली. थोडे दिवस तिथं गेल्यावर त्यांना तिच्यातलं टायलेंट जाणवलं असावं. त्यांनी तिला ऑडिशनला पाठवायला सुरुवात केली. त्यामुळं पाचवीत असतानाच तिला ‘मी मराठी’वरची ‘एक झोका नियती’चा ही पहिली मालिका मिळाली. नंतर तिनं पाचवी-सहावीत ‘कुलवधू’, ‘मालवणी डेज्’ या ‘झी मराठी’वरील, ‘वृंदावन’ ही ‘मी मराठी’वरील या मालिका केल्या. सातवीत ‘स्टार प्रवाह’वरील ‘तुजविण सख्या रे’ या मालिकेत काम केलं.
ती आठवीत असताना ‘बालमोहन विद्यामंदिर’ या तिच्या शाळेतर्फे ‘राज्य बालनाटय़ स्पध्रे’साठी ‘फुलराणी’ हे नाटक बसवण्यात आलं होतं. त्यात तिनं ‘फुलराणी’ची भूमिका केली होती. श्रुती सांगते की, ‘फुलराणी’साठी मला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. तेच नाटक घेऊन आम्ही डोंबिवलीच्या ‘कलासाधना’ संस्थेच्या स्पध्रेत भाग घेतला. तिथंही मला उत्कृष्ट अभिनेत्री आणि एक लक्षवेधी अभिनेत्री म्हणून उत्स्फूर्त पारितोषिक मिळालं. शाळेतील विविध नाटकांमध्ये मी सहभागी होते. आकाशवाणीवर मी दोन वेळा श्रुतिका सादर केल्यात. यंदा मला ‘भक्ती बर्वे पुरस्कार २०१३’ हा पुरस्कार मिळालाय. बालकलाकारांना दिला जाणारा हा पुरस्कार भक्ती बर्वे यांच्या आईंनी १० वर्षांपूर्वी सुरू केलाय. या पुरस्कारासाठी २५ ते ३० जणांची नावं सुचवण्यात आली होती. या वर्षी ‘बालश्री पुरस्कारा’साठी मला शाळेतून नामांकन मिळालं होतं. इकडं आमची सगळी तयारी झाली होती. पण दुर्दैवानं आमच्या तपशिलांच्या संदर्भात काही गोंधळ झाला. त्यामुळं आम्हाला सहभागी होता आलं नाही. आता पुढच्या वर्षी पुन्हा प्रयत्न करू.
मागच्या वर्षी मार्चमध्ये श्रुतीनं ‘ग म भ न’ नाटकाची ऑडिशन दिली होती. त्यात ती सिलेक्ट झाली. या नाटकात काम करण्यासाठी बरीच चढाओढ होती. बरेच टप्पे पार करावे लागले होते. ती सांगते की, ‘‘शिरोडकरच्या भूमिकेसाठी आम्हा दोघी जणींमध्ये खूप स्पर्धा होती. दोघींकडून शिरोडकरचं काम करून घेऊन त्याची तुलना करून मग एकीची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली. अगदी शेवटच्या आठवडय़ात मला सांगण्यात आलं की, तू ‘शिरोडकर’ आहेस. हे नाटक रिओपन झाल्यापासून सध्या त्याचे मुंबईत प्रयोग होताहेत.’’
बोलता बोलता ती नाटकाच्या आठवणींत रमते. ती सांगते की, ‘‘नाटकाच्या तालमींदरम्यान माझ्याकडून खूप चुका होत होत्या. ‘शिरोडकर’ म्हणून मला नक्की काय करायचंय ते मला कळत नव्हतं. मी ‘शिरोडकर’च्या भावभावना कशा व्यक्त कराव्यात, मला कळत नव्हतं. नंतर आमची ग्रॅण्ड रिहर्सल सुरू होती. त्या दिवशी दिग्दर्शक संतोष वेरुळकर यांच्या मते मी खूप छान काम केलं. तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की, ‘पुढं जाऊन तू खूप मोठी अभिनेत्री होशील. आत्ता कुणी दिग्दर्शक हे नाटक बघायला आला तर नक्कीच तुला चित्रपट मिळेल.’ विद्याताइही मला नेहमी सांगतात की, ‘तू प्रिया बापटसारखी होशील पुढं. तुझ्यात तेवढं टॅलेन्ट आहे.’ या नाटकात मी आणि जोशीची भूमिका करणारा माझा सहकलाकार आशीषचे संवाद सुरू असताना आमच्या काही रिअ‍ॅक्शन्स आहेत. त्यातल्या काही काही रिअ‍ॅक्शन्स सारख्या सारख्या आहेत. त्यात प्रेक्षकही स्वत:हून रिअ‍ॅक्शन्स देतात. टाळ्या पडतात. इतका कधी कधी लाफ्टर पडतो की, आम्हाला थांबावं लागतं. म्हणजे आम्ही वाक्य सुरू करतो नि पुन्हा थांबतो.’’ मालिकेच्या शूटिंगच्या वेळची आठवणही सांगते. श्रुती म्हणते की, ‘एक झोका नियतीचा या मालिकेचं शूटिंग करायला आम्ही कुडाळला गेलो होतो. तिकडचे लोक शूटिंग बघायला आले होते. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की, खूप छान करताय तुम्ही नि हे सांगता सांगता ती शूटिंगच्या मध्येच आली होती. मग आम्हाला पुन्हा शूटिंग करावं लागलं होतं.’’  
तिला अभ्यास करायला खरंच खूप आवडतं. शाळेतल्या सगळ्या उपक्रमांमध्ये ती सहभागी होते. तिला गाणी ऐकायला खूप आवडतं. वाचावसं वाटलं तरी वाचायला फारसा वेळच मिळत नाही. सामाजिक जाणिवेचं भान पहिल्यापासून त्यांच्या घरात होतं. ‘आपण सामाजिक कार्य केलं पाहिजे,’ हे आईचं म्हणणं तिला पटतं. त्यादृष्टीनं ती प्रयत्नही करते. ती म्हणते की, ‘‘यंदा शाळेत सगळ्यांना पाण्यानं रंगपंचमी खेळायची होती. तेव्हा मी त्यांना पाण्याचं महत्त्व पटवून दिलं होतं. शाळेत ‘मराठी भाषा दिना’च्या निमित्तानं मी सामान्य माणसांना मराठी भाषेबद्दल बोलतं केलं होतं. त्यांची मतं शूट करून ते शाळेत दाखवलं होतं. यात माझे मित्र-मत्रिणीही सहभागी होते. पण ती आयडिया माझी होती. शिवाय स्त्री-भ्रूणहत्येसारख्या विषयांच्या अनुषंगानं पथनाटय़ातही मी सहभागी होते.’’
तिच्या या सगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीजना घरून सगळ्यांचा सपोर्ट आहे. तिच्या आवडीचं क्षेत्र तिनं निवडावं, असं त्यांना वाटतं. ती म्हणते की, ‘‘कुणी ऑडिशनला बोलवत असेल तरच मी जाते. कारण मला काही यात करिअर करायचं नाहीये. म्हणून मीहून कुणाला अप्रोच होत नाही. या क्षेत्रात एवढा चांगला अनुभव मिळतोय, तर हेच कंटिन्यू करावं असं वाटतं, क्वचित कधी तरी कुणाची मुलाखत वाचून किंवा त्यांना मिळणारी प्रसिद्धी वगरे बघून. पण ते तेवढय़ापुरतंच.’’   
शूटिंग नि इतर अ‍ॅक्टिव्हिटीजसाठी शाळा तिला खूपच सपोर्ट करते. ‘‘मी शूटिंगच्या ठिकाणी, नाटकाच्या प्रॅक्टिसच्या वेळी वेळ मिळेल तसतसा अभ्यास करते. यंदा दहावीचं वर्ष असलं तरीही सगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीज चालू ठेवणारेय. फक्त मीहून कुणाकडं न जाता समोरून काम आलं तर करेन. पण दहावीला चांगले मार्क मिळवण्याच्या दृष्टीनं अभ्यासाकडं अधिक लक्ष देणारेय. दहावी म्हणूनही कोणताही क्लास लावलेला नसून अभ्यास घरीच करणारेय. क्लास न लावल्यानं तो वेळ माझ्या हाती राहतो. घरी गेल्यावर मला अभ्यास करायला मिळतो. क्लास असता तर त्याचा अभ्यास, त्याच्या वेळा नि शूटिंग करणं हे जमलं नसतं. क्वचित कधी तरी इतरांनी क्लास लावलाय, आपलं कसं होईल, अशी भीती वाटते. पण मित्र-मत्रिणी ही भीती घालवतात. आत्ता मी त्यांच्यापेक्षा कुठंच कमी नाहीये. क्लास न लावताही त्यांच्याएवढेच मार्क मला मिळताहेत. क्लासमुळं त्यांना एक्स्ट्रॉकरिक्युलर अ‍ॅक्टिव्हिटीज करता येत नाहीत. मित्र-मत्रिणींचाही खूप सपोर्ट असून त्यांना माझ्या भूमिका आवडतात,’’ असं ती म्हणते.
ती दहावीनंतर आर्टस् घेणारेय. कॉलेजमधल्या एकांकिका आणि इतर अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होणारेय. तिला निवेदनाची आवड असून निवेदिका होण्याचीही इच्छा आहे. करिअर म्हणून तिनं ‘आयएएस’चा पर्याय निवडलाय. जमेल तेवढी लोकांना मदत करायच्येय. ती सांगते की, ‘‘आयएएस झाल्यावर भष्ट्राचार घालवायचाय. घालवायचाय म्हणण्यापेक्षा मी तो करणार नाही. भष्ट्राचाराची लोकांना जाणीव करून देणारेय. हे एकटीचं काम नाहीये. याची कल्पना मला आहे. पण आधी केलं नि मग सांगितलं, यावर माझा विश्वास आहे.’’ कलाजाणिवा जोपासतानाच सामाजिक संवेदनांना प्रत्यक्षात उतरवू पाहणाऱ्या श्रुतीची स्वप्नं पूर्ण होण्यासाठी तिला मन:पूर्वक शुभेच्छा देत आमच्या गप्पांना पूर्णविराम दिला.

लर्न अ‍ॅण्ड अर्न या नव्या कॉलममधून तुम्हाला तुमच्या अशा काही मित्रांना आणि मैत्रिणींना भेटायला मिळणारेय जे शिकताना स्वतची आवड जपत आहेत. अर्थात ही आवड म्हणजे केवळ छंद जोपासण्याइतपत मर्यादीत नाही तर ही आवड आर्थिकदृष्टय़ा सक्षम होण्याची आहे. तरूणांमध्ये अलीकडे लर्निग प्लस अर्निग हे चित्र दिसून येत आहे. पूर्वी केवळ समर जॉब करणारे चेहरे आता कॉलेजच्या लेक्चर्ससह इतर जॉबसाठीही वेळ देत आहेत. अशाच तरूणांची आणि त्यांच्या कामाची महती आपण जाणून घेऊया. यासंदर्भात आपणास मेल करावयाचे असल्यास viva.loksatta@gmail.com  या संकेतस्थळावर माहिती पाठवावी.