फुटबॉल मॅच लाइव्ह दाखवणारी भलीमोठी स्क्रीन, फुटबॉलप्रेमी मित्रमंडळींची संगत आणि लज्जतदार खाना-पिना.. फुटबॉल फॅन असाल तर अशा माहौलमध्ये मॅच बघायला कुणाला आवडणार नाही? म्हणूनच पुण्या-मुंबईच्या स्पोर्ट्स कॅफेमधली तरुणाईची गर्दी वाढते आहे.
सध्या कॉलेज कट्टय़ांवर आणि नाक्यावरच्या ग्रूपमध्ये सगळ्यात जास्त कसली चर्चा होत असेल तर फुटबॉलची. परीक्षेच्या वेळी होणाऱ्या रात्रीच्या जागरणांचा त्रास होतो तसा सध्याच्या जागरणांचा त्रास अजिबात होत नाहीय. उलट कुणाकडे मॅच बघायची, कुठे जायचं याचे प्लॅन्स बनताहेत. गेल्या काही वर्षांत आपल्याकडे आलेली स्पोर्ट्स बार ही कन्सेप्ट आता चांगलीच रुजलेली दिसतेय. फिफा वर्ल्डकपच्या निमित्ताने स्पोर्ट्स बार कॅफेकडे वळणारी पावलं वाढली आहेत.
मुंबईत चर्चगेट, खार, बांद्रा, अंधेरी, लोअर परेल अशा अनेक ठिकाणी लाउंजमध्ये आणि पब्जमध्ये मोठमोठे स्क्रीन लावले गेले आहेत. पुण्यात कँप, कोरेगाव पार्क, औंध, बाणेर, विमान नगर, मगरपट्टा इथले स्पोर्ट्स क्लब आणि बार गजबजले आहेत. मुंबईतल्या जगहेड्स, लिओपोल्ड, स्मॅश, बिग बँग कॅफे, रॉयल्टी कॅफे,आयरिश हाऊस, स्पोर्टस्बार एक्स्प्रेस अशा अनेक ठिकाणी सध्या रात्रीनंतरच गर्दी वाढते. मोठय़ा स्क्रीनवर फुटबॉलचा लाइव्ह सामना, फुटबॉलप्रेमी मित्रमंडळी आणि खाना-पिना असा माहौल या ठिकाणी असतो. यातील काही पब्जनी तर तरुणाईला आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजनाही आणल्या आहेत. काही जण आकर्षक डिस्काऊंट देतात.
तरुण मुलं जिथे रहातात, तिथेच जवळ असलेल्या पब्जमध्ये जाताहेत असं मात्र नाही. जिथे चांगल्या सुविधा आहेत, चांगलं म्युझिक आहे अशा ठिकाणी जाण्याकडे त्यांचा कल असतो किंवा हॅपी अवरसारख्या योजना आहेत अशा ठिकाणीही गर्दी होते. विशेषत: कॉलेजच्या मंडळीं अशा ठिकाणी जाणं प्रीफर करतात. ‘एक हजार रुपये भरा आणि त्यात मॅच पाहणं, खाण-पिणं, डान्स फ्लोअर सर्व सामील असेल’ अशा योजना दिसला की, तिथेच मॅच पाहण्याचा प्लॅन बनतो. स्मॅश या आíकडमध्ये व्हच्र्युअल गेम प्लेस तयार करण्यात आली आहे. म्हणजे फुटबॉल स्पध्रेसारखं वातावरण तिथे निर्माण करण्यात आलं आहे. थेट ब्राझीलला जाऊन फिफा अनुभवत असल्याचा भास तिथे होतो. अंधेरीच्या बिग बँग कॅफेमध्ये १२ जून ते १३ जुलैदरम्यान फुटबॉल फॅन फेस्ट आयोजित केलाय. या कॅफेमध्येदेखील भल्यामोठय़ा स्क्रीनवर हे फुटबॉलप्रेमी आपापल्या आवडत्या टीमला फॉलो करत असतात. त्या त्या टीमच्या जर्सीसारखे टीशर्ट घातलेले ग्रूप स्पोर्ट्स बारमध्ये हमखास भेटतात. त्यांच्याकडे खेळाडूंची, त्यांच्या खेळाची इत्थंभूत माहिती असते. ग्रूपबरोबर गेल्यावर तिथे गरमागरम चर्चा रंगतात. आपल्या आवडत्या टीमची महती, आवडत्या खेळाडूच महत्त्व पटवून देण्यात सगळे रमतात. खारच्या युनिकॉन्टिनेंटलमध्ये भेटलेला पार्थ आंबेरकर राजीव गांधी इन्स्टिटय़ूटमधला इंजिनीअरिंगचा विद्यार्थी आहे. पार्थ म्हणतो, ‘अशा डेडिकेटेड आणि हॅपनिंग प्लेसमध्ये बसून मॅच बघायला आणखी मजा येते. मी माझ्या ग्रूपबरोबर तिथे जातो. सेमी फायनल – फायनलचे आमचे प्लॅन्स आत्ताच बनताहेत.’’ पार्थ अर्जेटिना टीमचा फॅन आहे.
पोर्ट ब्लेअरमधून मरीन इंजिनीअरिंग करणारा इशान खोत सुट्टी असल्याने मुंबईत परत आलाय. इशान जर्मनीचा फॅन आहे. ‘मी आणि माझा ग्रूप महत्त्वाच्या मॅचच्या दिवशी ‘जगहेड्स’ला जातो. अशा ठिकाणचा माहौल फुटबॉलमय असतो. तिथे मॅच बघायला आणखी मजा येते’, तो म्हणतो. स्पोर्ट्स बारची वर्दळ आत्ता कुठे वाढायला लागली आहे. १३ तारखेच्या रात्रीपर्यंत ही वर्दळ उत्तरोत्तर वाढत जाणार हे निश्चित.
मुंबईच्या तरुणाईचे लोकप्रिय स्पोर्ट्स कॅफे
हार्ड रॉक कॅफे (वरळी)
लिओपोल्ड कॅफे (कुलाबा)
द डेन (खार)
मँचेस्टर युनायटेड कॅफे बार (लोअर परेल, मुलुंड)
स्पोर्ट्सबार एस्प्रेस (कुलाबा)
संग्रहित लेख, दिनांक 4th Jul 2014 रोजी प्रकाशित
फुटबॉल नजारा
फुटबॉल मॅच लाइव्ह दाखवणारी भलीमोठी स्क्रीन, फुटबॉलप्रेमी मित्रमंडळींची संगत आणि लज्जतदार खाना-पिना.. फुटबॉल फॅन असाल तर अशा माहौलमध्ये मॅच बघायला कुणाला आवडणार नाही? म्हणूनच पुण्या-मुंबईच्या स्पोर्ट्स कॅफेमधली तरुणाईची गर्दी वाढते आहे.

First published on: 04-07-2014 at 04:33 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Live football match