आजच्या वेगवान जगात आपलं आयुष्य डेडलाइन्स, मोबाईल-लॅपटॉपच्या स्क्रीन आणि जबाबदाऱ्यांच्या ओझ्यात गुंतलेलं आहे. या धावपळीत संतुलित आहार, शांत झोप आणि स्वत:ची काळजी घेणं… या साध्या सवयी नकळत मागे पडल्या आहेत. आधुनिक जीवनशैलीनं आपल्याला सोयी दिल्या, पण त्याचबरोबर ताण, चुकीचा आहार आणि आरोग्याकडे दुर्लक्ष यांचं ओझंही दिलं. त्यामुळेच स्वत:कडे लक्ष देणं ही सवडीनं करायची गोष्ट राहिलेली नाही, तर गरज बनली आहे. आणि या असंतुलनाचं किंवा विस्कळीतपणाचं सर्वात स्पष्ट प्रतिबिंब आपल्या त्वचेवर उमटतं. ही समस्या विशेषत: तरुणाईला सध्या जास्त सतावते आहे.
नवी पिढी त्वचेची योग्य ती काळजी घेणे या बद्दल आग्रही आहे. जीवनशैलीसोबतच धूळ, प्रदूषण, अनियमित आहार, अशा अनेक कारणांमुळे साधारण स्किनकेअर रुटीन सांभाळणे गरजेचे झाले आहे. मुळात सध्या तरुणाईला भेडसावणाऱ्या त्वचेच्या नेमक्या समस्या कोणत्या हे आधी लक्षात घ्यायला हवं.
चेहऱ्यावर पुरळ आणि मुरुमं
त्वचेच्या तक्रारींमध्ये सर्वाधिक डोकेदुखी देणारी गोष्ट म्हणजे चेहऱ्यावर येणारी पुरळं. लहान मुलं, तरुण-तरुणी, पुरुष किंवा स्त्रिया सगळ्यांना या समस्येला तोंड द्यावंच लागतं. किशोरवयातील अवस्थेमुळे वा प्रौढपणात हार्मोनल चेंजेसमुळे येणारे पुरळ त्रास देत राहतात. आहारतज्ज्ञ ज्ञानदा चितळे पुसाळकर सांगतात, ‘हार्मोनल बदलांमुळे येणारे पुरळ, कोरडी आणि निस्तेज त्वचा अशा समस्या असलेल्या तरुण पेशंट्सने सध्या क्लिनिक भरलेले असते. तसेच, हायपरपिगमेंटेंशन, तेलकटपणा यानेही तरुणाई त्रासलेली आहे. अशा त्वचेचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे खूप जास्त प्रमाणात गोड आणि मैद्याच्या पदार्थांचं सेवन. फास्ट फूड, कोल्ड्रक्सिं, तेलकट पदार्थ हे सगळं हल्ली फूड डिलिव्हरी अॅप्सवरून सर्रास मागवलं जातं. अशा पद्धतीच्या खाण्याने त्वचेचे असंख्य प्रॉब्लेम्स तुम्हाला येऊ शकतात.
तेलकट त्वचा
तेलकट त्वचा ही सर्वात सामान्य समस्या असून ती केवळ सौंदर्याची अडचण नाही, तर शरीरात चालणाऱ्या नैसर्गिक प्रक्रियेचं लक्षण आहे. मुलं आणि मुली दोघांनाही हा त्रास होतो. आपल्या त्वचेत सेबेशस ग्रंथी असतात, ज्या सेबम नावाचं नैसर्गिक तेल तयार करतात. हे तेल त्वचेला ओलावा देतं, तिला सुरक्षित ठेवतं. पण या ग्रंथी जास्त प्रमाणात तेल तयार करू लागल्या की त्वचा तेलकट दिसते, रोमछिद्रं मोठी होतात आणि पुरळही वाढू शकतात. पुरळ येण्याच्या प्रक्रियेत जी कारणं लागू होतात तीच इथेही लागू होतात.
हायपरपिग्मेंटेशन : त्वचेवरचे डाग
चेहऱ्यावर किंवा शरीरावर अचानक दिसू लागलेले काळसर डाग अनेकांना त्रास देतात. वैद्याकीय भाषेत या समस्येला हायपरपिग्मेंटेशन म्हणतात. ही अत्यंत सामान्य त्वचारोगाची समस्या असून स्त्रिया-पुरुष दोघांनाही समान प्रमाणात भेडसावते. आपल्या त्वचेत मेलानिन नावाचं नैसर्गिक रंगद्रव्य असतं. तेच त्वचेला रंग देतं आणि सूर्यकिरणांपासून संरक्षण करतं. पण जेव्हा मेलानिनचं उत्पादन असंतुलित होतं किंवा काही भागात जास्त प्रमाणात तयार होतं, तेव्हा त्या जागी काळपट डाग दिसू लागतात.
सूर्यप्रकाशाचा अति संपर्क, हार्मोनल बदल, पुरळ किंवा जखमेनंतरचे डाग, औषधं आणि सौंदर्यप्रसाधनं अशा काही कारणांमुळे तरुणांना ही समस्या येऊ शकते.
कोरडी त्वचा
हिवाळ्यात त्वचा कोरडी होणं हे सर्वसाधारण मानलं जातं, पण काही लोकांची त्वचा वर्षभरच ओलसरपणा टिकवू शकत नाही. चेहऱ्यावर ताण जाणवणं, खरखरीतपणा, पांढऱ्या रेषा, खाज ही सारी कोरड्या त्वचेची लक्षणं आहेत. ही केवळ सौंदर्याची समस्या नसून शरीराच्या आतल्या आरोग्याशी जोडलेली बाब आहे. आपल्या त्वचेवर नैसर्गिक तेलांचा आणि लिपिड बॅरिअरचा थर असतो. तो त्वचेला ओलावा देतो आणि बाहेरच्या धोक्यांपासून संरक्षण करतो. पण जेव्हा हा थर कमजोर होतो, तेव्हा त्वचेतलं पाणी पटकन वाफ होऊन जातं आणि त्वचा कोरडी पडते.
नवीन पिढी किंवा आपण ज्यांना जनरेशन झेड म्हणतो त्यांना अशा काही त्वचेच्या समस्या जाणवत आहेत, पण त्यावर उपाय म्हणून फक्त कॉस्मेटिकस वापरणं योग्य नाही. त्यामुळे त्वचेला अजून हानी पोहोचू शकते. त्वचाशास्त्रज्ञ, तज्ज्ञ आणि या वयातल्या काही मुलं-मुलींशी बोलल्यानंतर योग्य आहार, नियमित व्यायाम आणि रोजचं स्किन केअर रुटीन याला खूप महत्त्व आहे हे जाणवलं.
पौष्टिक आणि योग्य आहार
स्किनकेअर म्हटलं की लगेच सीरम, क्रीम्स किंवा पार्लर ट्रीटमेंट्सची आठवण येते, पण तज्ज्ञ नेहमी एक गोष्ट ठामपणे सांगतात – निरोगी, तजेलदार त्वचेची खरी पायाभरणी स्वयंपाकघरातच होते. आपण दररोज जे खातो, त्यावरच आपल्या त्वचेचं आरोग्य आणि सौंदर्य अवलंबून असतं. त्वचा ही आपल्या शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे. इतर अवयवांप्रमाणेच तिलादेखील योग्य पोषणाची गरज असते.
ज्ञानदा पुढे सांगतात, ‘आपल्या स्वत:च्या स्वयंपाकघरात आपण डोकावून पाहिलं तर अशा असंख्य गोष्टी आहेत ज्याने या समस्या सहज मिटवल्या जातील. आवळ्यात व्हिटॅमिन सी भरभरून आहे जे आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक असतं. हळद एक नैसर्गिक पोषण आहे ज्याने शरीरातली आणि त्वचेची उष्णता, दाह कमी होतो. घरी लावलेलं अदमुरं दही याच्यात अनेक गुणधर्म आहेत, दह्याने चेहऱ्यावरचं पुरळ आणि डेड स्किन नाहीशी होती. तसंच, अळशी, तीळ यातून तुम्हाला ओमेगा फॅटी अॅसिड मिळतं जे त्वचेच्या आरोग्यासाठी फार गुणकारक असतं. सगळ्या प्रकारच्या डाळीतून आपल्याला प्रथिनं मिळतात, ज्याने संपूर्ण शरीरच तंदुरुस्त राहतं’. त्याचबरोबर मोठमोठे आणि महागडे सप्लिमेंट्स न घेता आपण अगदी रोजच्या जीवनात अडीच ते तीन लिटर पाणी, हंगामी फळं, पालेभाज्या (कारण त्यात फायबर, आयर्न आणि जीवनसत्त्व अ असतं), संपूर्ण धान्य म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी, ओट्स ज्याने ताटातली साखर संतुलित राहते, याचं सेवन केलं तर त्वचेचे विकार मोठ्या समस्या बनणार नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.
नियमित व्यायाम आणि हालचाल
व्यायाम म्हटलं की बरेचजण जिममध्ये तासनतास किंवा तीव्र व्यायामाची कल्पना करतात. साध्या, नियमित हालचालींची क्रियासुद्धा शरीर निरोगी ठेवते, पचनक्रिया सक्रिय ठेवते आणि त्वचेला हेल्दी बनवते. आणखी एक गोष्ट जी आपण हल्ली गांभीर्याने घेत नाही ती म्हणजे पुरेशी झोप. झोपलेल्या अवस्थेत संपूर्ण शरीर आणि त्वचासुद्धा आराम करत असते, त्यामुळे हार्मोन्स शांत राहतात. सततची अपुरी झोप झाल्याने कॉर्टिसॉल लेव्हल वाढते, परिणामी पुरळ, तेलकटपणा अशा समस्या निर्माण होतात.
त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी तुम्हाला जास्त व्यायामशाळा किंवा गुंतागुंतीच्या दिनचर्येची आवश्यकता नाही. २०-३० मिनिटे चालणे, सकाळी स्ट्रेचिंग किंवा योगसाधना करणे, हलकी घरातील कामे किंवा लिफ्टऐवजी पायऱ्या चढणे, कामाच्या वेळेत लहान हालचालींचे ब्रेक यानेही आपल्याला अगदी हलके आणि फ्रेश वाटते.
रोजचं स्किन केअर रुटीन
आधी म्हटलं तसं कॉस्मेटिक प्रॉडक्ट्सने त्वचेची काळजी घेतली जात नाही, पण याचा अर्थ तुम्ही हे प्रॉडक्ट्स वापरूच नयेत असं अजिबात नाही. वय वाढत जातं तसं काही प्रमाणात आपल्याला एका नियमित स्किन केअर रुटीनची गरज पडते.तुमची त्वचा ज्या प्रकारची आहे, म्हणजे तेलकट, कोरडी, नाजूक त्याप्रमाणे तुमचं रुटीन बदलू शकतं. परंतु एक सामान्य स्किन केअर रुटीन अशा पद्धतीचं असतं :
त्वचा स्वच्छ धुणे (क्लिंझिंग) : तुमच्या त्वचेच्या प्रकाराला अनुकूल असलेल्या उत्पादनांचा, फेसवॉशचा वापर करून दररोज सकाळी आणि रात्री चेहरा स्वच्छ धुणे. त्यामुळे दिवसभराची धूळ, जंतू, घाम सगळं धुवून काढलं जातं. किमान दोन वेळा तरी चेहरा स्वच्छ धुणं गरजेचं आहे.
मॉइश्चरायझिंग: तुमच्या त्वचेला हायड्रेट करण्यासाठी आणि त्याच्या नैसर्गिक अडथळ्याचे संरक्षण करण्यासाठी मॉइश्चरायझर लावा.
सनस्क्रीन : तुमच्या त्वचेला सूर्याच्या तीव्रतेपासून काळजी घेण्यासाठी किमान SPF३० असलेले ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन लावा. तुम्ही घरात असाल तरीही रोज सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे. याव्यतिरिक्त थोडं वय वाढल्यावर तिशीच्या आसपास असलेल्या स्त्रियांना सिरम आणि टोनर लावावे लागते. पण ते तुमच्या त्वचेच्या गरजेनुसार आणि तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे करा. तुम्ही रोज मेकअप करणार असाल तर या पुढच्या गोष्टी तुमच्या त्वचेला गरजेच्या आहेत का नक्की तपासा.
महागडं स्किन केअर रुटीन केलं तरी मुळात आपला आहारच चुकत असेल तर त्याचा परिणाम त्वचेवर जाणवणारच आहे. शरीर जर आतून तेजांकित असेल, तरच ते तेज बाह्यरूपावरही दिसेल. यासाठी योग्य आहार, संतुलित जीवनशैली, बेसिक स्किन केअर आणि नियमित व्यायाम या चार गोष्टी तरुणाईने सध्या गांभीर्याने घ्यायला हव्यात, असेही आवाहन ज्ञानदा यांनी केले.
तुमचा व्यवसाय जर चांगला राहण्याचा, चांगला दिसण्याचा असेल तर आपोआपच सगळ्या गोष्टी पाळल्या जातात. पण चांगलं दिसण्यासाठी कुठल्याही कारणाची आपल्याला गरज नसावी. धावती जीवनशैली, कॉर्पोरेट नोकरी सांभाळून इतर जबाबदाऱ्या पेलणाऱ्या तरुण पिढीनेही हे लक्षात घ्यायला हवं की चांगलं राहणं फक्त बाह्यरूपाचे सौंदर्य वाढवण्यासाठी नाहीतर सुदृढ शरीर, त्वचा आणि मन यासाठीही ते अत्यंत आवश्यक आहे.
viva@expressindia.com