साप म्हटले की अजूनही अनेकांच्या अंगावर काटा येतो. भीती, अंधश्रद्धा आणि अज्ञान यांच्या भोवऱ्यात अडकलेल्या समाजात एक असा युवक पुढे आला, ज्याने सापांना केवळ जीवदानच दिलं नाही, तर त्यांच्याविषयीचा गैरसमजही दूर केला. जाणून घेऊया ऑफिओलॉजिस्ट शिवराज शिंदे याच्याविषयी…

मूळचा सोलापूरचा असलेल्या शिवराज याने कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली आहे. लहानपणापासून क्रिकेटपटू राहुल द्रविड यांना आदर्श मानणाऱ्या शिवराजला राहुल नावानेच ओळखतात. बारावीत असताना मित्रामुळे पहिल्यांदा सापांशी परिचय झाला, असं शिवराज सांगतो. सापांना मारणे गरजेचेच असते, असा समज बाळगणाऱ्या शिवराजने एक दिवस स्वत:च एका कवड्या सापाचा जीव वाचवला. ही घटना त्याच्यासाठी आयुष्य बदलणारी ठरली. ‘सोलापूरच्या कृषी विद्यालयातील सरकारी वसाहतीत मी राहात होतो. एकदा वसाहतीतील एका घरात साप आल्याचे समजले. मी तेथे पोहोचेपर्यंत तेथील एका व्यक्तीने सापाच्या डोक्यावर मोठा बांबू ठेवून त्याला जोरात दाबले होते. हा बिनविषारी कवड्या साप आहे हे मला लक्षात आले आणि त्याचक्षणी मी त्या व्यक्तीला थांबवून साप हातात घेतला. तिथल्या लोकांनी मला सापाला मारायला सांगितले होते, पण त्यांना न जुमानता मी साप घेऊन तिथून निघालो’ अशी आठवण सांगणारा शिवराज या प्रसंगानंतर पुढे सर्पमित्र म्हणून ओळखला जाऊ लागला. या एका प्रसंगानंतर त्याने सापांबद्दल प्रबोधन सुरू केले, सर्पदंशापासून लोकांना वाचवले. सर्पदंश झालेल्या लोकांना योग्य मार्गदर्शनही केले. सापांचे जग जवळून पाहिल्याने सुरुवातीला वाटणाऱ्या भीतीची जागा नंतर कुतूहलाने घेतली, असे शिवराज सांगतो.

सापामुळे महाविद्यालयातही शिवराजची वेगळी ओळख निर्माण झाली. त्यामुळे त्याला समाजात एक वेगळा आदर प्राप्त झाल्याचे तो सांगतो. शिवराज राहायलाच मुळात कृषीतंत्र विद्यालयाच्या आवारात. त्यामुळे साहजिकच तेथे अनेक झाडी, झुडपे व गवत विपुल प्रमाणात असल्याने येथील वातावरण म्हणजे सोलापूरसारख्या दुष्काळग्रस्त भागात आल्हाददायक जागा. या परिसरात वारंवार साप दिसायचे. लोकांना सापाबद्दल योग्य माहिती मिळावी तसेच सापांचा जीव वाचावा, या उद्देशाने कृषीतंत्र विद्यालयातील व दयानंद महाविद्यालयामधील ग्रामीण भागातून आलेल्या हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांना तंत्रशुद्ध व शास्त्रोक्त पद्धतीने साप पकडण्याचे प्रशिक्षण शिवराजने द्यायला सुरुवात केली. आधीपासूनच साप पकडणे व त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडणे यापेक्षा सापांच्या अभ्यासात मला जास्त रस होता, त्यामुळे या मुलांमध्येही मी सापांच्या अभ्यासाबद्दल गोडी निर्माण केली. पुढे या सर्वांनी मिळून हजारो सापांना जीवदान दिले आणि यामुळे सापांना जीवदान देण्याची एक चळवळच उभी राहिली, असे शिवराज सांगतो. यामुळेच ग्रामीण भागात सापांबद्दलच्या अंधश्रद्धेचे निर्मूलन करण्यात बऱ्यापैकी यश प्राप्त झाल्याचेही तो सांगतो.

शिवराजला महाराष्ट्रातील पहिले सर्पमित्र बाबुराव टक्केकर यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. त्याचा सापांकडे बघण्याचा दृष्टिकोन शास्त्रीय होता. नुसते साप पकडणे आणि सोडणे यापलीकडे सापांचा अभ्यास करणे त्याला फार महत्वाचे वाटायचे. यामुळे सापांबाबतची योग्य माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचविणे ही गरज त्याने ओळखली. करोनाकाळातील लॉकडाउनचा उपयोग त्याने पुस्तक लिहिण्यासाठी केला आणि ‘महाराष्ट्रातील साप’ हे पुस्तक लिहिले. चार महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर शेवटी तो दिवस उजाडला. २५ जुलै २०२० मध्ये नागपंचमीच्या दिवशी लोकांसाठी ‘महाराष्ट्रातील साप’ हे ईबुक मोफत उपलब्ध करून दिलं. या पुस्तकाचा अनेकांना फायदा झाला. लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचल्याने सापांचा व लोकांचाही जीव वाचत असल्याचे वारंवार कानावर येऊ लागले. मोठ्या स्तरावरून पुस्तकाचं कौतुक झालं. त्या काळचे सहाय्यक प्रधान मुख्य वन संरक्षक सुनील लिमये यांनी पुस्तक वाचून वन विभागाच्या लेटर पॅडवर पान भरून पुस्तकाचं कौतुक केल्याचे शिवराज सांगतो. सोलापूरमध्ये २०१२ साली आढळलेल्या विनाखवल्याच्या नागाचा संशोधनात्मक अभ्यास अनेक वर्षे शिवराज करत होता. २०२१ मध्ये ‘रेपटाइल्स अँड अम्फिबियन्स’ या अमेरिकेतील प्रतिष्ठित जर्नलमध्ये त्याच्या या अभ्यासाची संशोधन पत्रिका प्रकाशित झाली आहे. ही जगातील खवले नसलेल्या नागाची पहिली संशोधन पत्रिका ठरली होती. या घटनेमुळे खऱ्या अर्थाने मी करत असलेल्या कार्यास संशोधनात्मक न्याय मिळाला, अशी भावना शिवराजने व्यक्त केली. यानंतर इंग्रजीमध्येही पुस्तक असायला हवे म्हणून त्याने २ ऑगस्ट २०२२ रोजी नागपंचमीचे औचित्य साधून ‘स्नेक्स ऑफ महाराष्ट्र’ हे इंग्रजी पुस्तक प्रकाशित केले.

जगभरातील सर्पदंश मृत्यूंपैकी अर्धेअधिक मृत्यू भारतात होतात. सुमारे पन्नास हजार लोक दरवर्षी सर्पदंशाने मृत्युमुखी पडतात. यामुळेच भारत सर्पदंशाची जागतिक राजधानी म्हणून ओळखला जातो. सर्पदंश जनजागृती ही काळाची गरज असल्याने वन्यजीव क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांना सर्पदंशावर शिवराजने मार्गदर्शन केले आहे. सर्पदंशावर काम करणारी एक तुकडी तयार करण्यात आली असून त्यात महाराष्ट्रातील ३० वन्यजीव अभ्यासकांचा समावेश आहे. यामध्ये देवेंद्र भोसले, अनिल अलदार, पप्पू खोत, युनूस मणेर, अक्षय मगदूम, विरुपाक्ष शेजुळ व अनेक डॉक्टरांचा समावेश आहे. ही मंडळी सर्पदंशावरील उपचारावर शिवराजकडून मार्गदर्शन घेतात. आजवर अनेक सर्पदंश झालेल्या व्यक्तींना या सदस्यांनी वाचवलं आहे. नाग फाउंडेशनच्या सदस्यांचाही मोलाचा वाटा आहे. सध्या शिवराज दोन ते तीन विषयांवर संशोधन करतो आहे. सर्प जनजागृतीपर पुस्तकाचे कामही चालू आहे. याचबरोबर त्याचे सर्पदंशावर मार्गदर्शनाचे कामही सुरूच आहे ‘मिशन स्नेक बाइट डेथ फ्री इंडिया’चा महाराष्ट्राचा प्रमुख म्हणून शिवराजवर जबाबदारी आहे. हे मिशन भारतातील सर्पदंश मृत्युदर कमी करण्यासाठी असून यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक तज्ज्ञ मंडळी काम करतात.

शिवराजला निलिमकुमार खैरे पुरस्कार, द रिअल हिरो पुरस्कार, गार्डियन ऑफ नेचर पुरस्कार, अण्णा भाऊ साठे वन्यजीवनातील सर्वोत्तम साहित्य पुरस्कार तसेच वन्यजीव सप्ताह, पक्षी सप्ताह व इतर पर्यावरणविषयक महत्त्वाच्या कार्यक्रमांदरम्यान वन विभागातर्फे २०२३ व २०२४ मध्ये उल्लेखनीय कार्याबद्दल गौरविण्यात आले आहे. शिवराजने आत्तापर्यंत पंधरा हजारहून अधिक सापांना तसेच अनेक पक्षी-वन्यप्राण्यांना जीवदान दिले आहे. याचबरोबर अनेक प्रकारच्या सापांच्या अंड्यांचे योग्य प्रकारे संगोपन करून पिल्लांची जन्मप्रक्रिया नेटाने पार पाडली आहे. आत्तापर्यंत ३००० हून अधिक सर्पदंशबाधितांना वाचविण्यात यश आणि २००० हून अधिक सर्प जनजागृती कार्यक्रम शिवराजने केले आहेत. सापाबद्दल मनात भीती बाळगून असलेला तरुण आज सर्पविज्ञान अभ्यासक म्हणून ओळखला जातो, शिवराजने मिळवलेल्या विलक्षण यशाची ही कथा तरुणाईला निश्चितच नवा दृष्टिकोन देणारी आहे.

viva@expressindia.com